फणीश्वरनाथ रेणू
(जन्म १९२९ , मृत्यू १९७७)
नित्यलीला चा लेखक
अंतर्नादच्या १९९७ च्या दिवाळी अंकात मी अनूवाद केलेली 'नित्यलीला' ही कथा
प्रसिद्ध झाली, तेव्हापासून
माझ्या मनात होते, की कधीतरी
या कथेच्या लेखकाचा परिचय मराठी वाचकांना करून दिला पाहिजे . लेखक म्हणजे पद्यश्री फणीश्वरनाथ रेणू. हिंदी
साहित्यजगातले एक महत्तवाचे नाव.
खरे तर
फणीश्वरनाथ रेणू यांचा परिचय मराठी
वाचकाला अजिबात असणार नाही, असे नाही,
राज कपूरची प्रसिद्ध फिल्म 'तिसरी
कसम ' चे कथा लेखक रेणू होते.
पण हे फार कदाचित फार कमी
लोकांना माहित असणार. कारण भारतीय फिम्मजगतात कथालेखकाला फारसे मानाचे स्थान
दिले जात नाही, गाजावाजा तर फारसा होतच
नाही. शिवाय मुंबई -पुणे यांच्यासारख्या औद्योगिक वातावरणातल्या वाचकाला (किंवा सिनेमा प्रक्षेकाला)
'तिसरी कसम " मधले खास "गावाकडचे " वातावरण - ते देखील
बिहारमधल्या मिथिलासारख्या पक्क्या ग्रामीण
भागातले वातावरण -समजेल किंवा भावेल, असेही नाही.माझ्या
माहितीप्रमाणे फणीश्वरनाथांच्या कथा, कादंब-या किंवा कवितांचा मराठीत अनुवादही झालेला नाही. हिंदी
साहित्य जगात मात्र त्यांना अत्यंत
मानाचे स्थान असून त्यांची गाजलेली कादंबरी "मैला आंचल " ही
प्रेमचंदांच्या 'गोदान' नंतरची त्या
तोडीची अस्सल ग्रामीण
कादंबरी मानली जाते.
भारतीय ग्रामीण पार्श्वभूमीचे चित्रण
अत्यंत समर्थपणे त्यांच्या
साहित्यामध्ये दिसून येते.
बिहारमधील उत्तर -पूर्व टोकावरचा अररिया जिल्हा. त्या काळात हा पूर्णिया या मोठ्या जिल्ह्याचा एक
भाग होता. उत्तरेला लागून
नेपाळचा विराटनगर हा जिल्हा, तर पुर्वेकडे लागून बंगाल. पूर्णिया
जिल्ह्याची भाषा मैथिली.
फक्त
अठ्ठेचाळीस वर्षांचे आय़ुष्य
लाभलेल्या रेणू यांनी
आपल्या जीवनकाळात दोन कादंब-या ,
पाच, लघू-कादंब-या, साठ-सत्तर कथा,
शंभराच्या आसपास रिपोर्टस आणि पन्नास व्यक्तिचित्रे लिहिली . थोड्याफार कविता लिहिल्या , काही इतर छोटी-मोठी पत्रे, गोष्टी , निबंध वगैरे
लिहिले.
पण या
सर्वांपेक्षा विशेष म्हणजे विराटनगरच्या कोईराला परिवाराबरोबर त्यांचे घनिष्ठ
संबंध होते. लहानपणी घरातून
पळून जाऊन ते कोईरालांकडे राहिले होते. त्याच बांधवांबरोबर बनारसला येऊन त्यांनी कॉलेजशिक्षण घेतले. साम्यवाद आणि
समाजवाद शिकले, बेचाळीसच्या
आंदोलनात भाग घेतला. त्याआधी त्यांचा विराटनगरमधील जूट मिल्स
आणि कॉटन मिल्स युनियनच्या संघटनेत
आणि क्रांतीत सहभाग होता.
तसाच पुढे १९५१ साली नेपाळच्या
प्रजातंत्राची स्थापना झाली, त्या सशस्त्र क्रांतीतही त्यांनी भाग घेतला. एकीकडे सशस्त्र हल्ल्यांमध्ये भाग
घेणे , दुसरीकडे रेडिओ ट्रान्समिशनची जबाबदारी संभाळणे आणि
त्यांचे रिपोर्टिंगदेखील बिहारमधल्या
वर्तमानपत्रांतून करणे, या
सगळ्यांमुळे त्यांना क्रांतीचे
वाल्टेयर म्हटले जाते.
नेपाळमध्ये प्रजातंत्राची स्थापना
झाल्यानंतर रेणू पुढे पूर्णिया आणि पटना येथेच राहिले. एव्हाना समाजवाद्यांबाबत
त्यांचा मनोभंग झाला, होता. ते
पूर्ण लेखनाकडे वळले. मात्र आणिबाणी लागू
झाली. तसे ते पुन्हा एकदा अस्वस्थ झाले आणि जयप्रकाश नारायण यांच्याबरोबर त्यांनी
बिहारच्या छात्र आंदोलनात भाग घेऊन
कैदही भोगली. या काळात त्यांनी पद्यश्री हा सन्मान आणि स्वतंत्र्यसैनिक पेन्शनही सरकारला परत केले.
पुढे निवडणुका झाल्या . जनता सरकार आले. पंतप्रधानांच्या निवडीच्या मानापमानाचे नाटक
झाले. त्याच दिवशी सकाळी
त्यांनी स्वतःच्या
ऑपरेशनसाठी परवानगी दिली होती. आधी तीन महिन्यांपासून चाललेल्या डॉक्टरांच्या आग्रहाला ते नाकारत
होते. निवडणुकिचा निकाल त्यांना पाहायचा होता. मात्र ऑपरेशन
टेबलावरूनच ते उठलेच नाहीत. काही दिवस बेशुद्धावस्थेत राहून त्यातच
त्यांची जीवनलीला संपली.
अशा
त-हेचे अनुभवसमृद्ध जीवन ज्याचे असेल, जो
स्वतः शेतकरीही असेल, किंबहुना शेती हेच
त्याच्या भाजी-भाकरीचे साधन असेल, पण तरीही जो एक संवेदनशील लेखक , एक आदर्शवाही , एक विद्रोही
आणि रामकृष्ण परमहंसांचा भक्त असेल, अशा
लेखकाचे लेखन काय तोडीचे आणि कशा
प्रकारचे असेल, याचा आपल्याला अंदाज येऊ शकतो.
रेणूंच्या कथांची पात्रे सगळी
त्यांच्या रोजच्या
वावरायच्या समाजातली, त्यांच्या व इतरांच्याही परिचयाची अशी असत. इतकी
की, त्यांची नवीन गोष्ट किंवा कादंबरी प्रसिद्ध झाल्यावर
लोक एखाद्या व्यक्तीकडे बोट
दाखवून म्हणत- 'रेणूंच्या अमक्या कथेतला तो अमूक
ना! तो हा! त्यामुळे
त्यांच्या साहित्यातून एका
परीने बिहारमधल्या दारिद्रयाने उलगडला
जातो आणि आपण म्हणून जातो.- 'हे कदाचित आपल्या जवळपास कुठे भोर , कुठे
पिंपरी खुर्दमध्येही घडलेले
असू शकते.'
साहित्यिक फणीश्वरनाथ रेणू
यांचे मूल्यांकन ब-याच इतर साहित्यिकांनी केले . बोकारो येथील भारत
यायावर यांनी एकंदर पाच खंडात
त्यांचे समग्र साहित्य संकलित करण्याचा
प्रयत्न केला आणि 'राजकमल ' या हिंदीतील
अग्रणी प्रकाशम संस्थेने हे खंड
प्रकाशित केले . तरीपण त्यांचे
काही लेखन अजूनही अप्रकाशित किंवा
आता दुर्मिळ झालेले असल्याने ते या खंडात येऊ
शकले नाही. इतरांनीही
त्यांच्या साहित्याबद्दल बरेच
काही लिहिले . पण एक राजकारणी
किंवा समाजकारणी व्यक्ती
म्हणून रेणू यांच्या जीवनाबाबात
फारसे कुणी लिहिलेले दिसत नाही.
त्या अर्थाने त्यांचे
मुल्यमापन राहून गेलेले आहे. हे मी भारत यायावर तसेच
फणीश्वरनाथ यांचे चिरंजीव पद्यपराग
रेणू यांच्याकडे बोलूनही
दाखवेल. पण असले लेखन
करायला अशी व्यक्ती
हवी की, जिची स्वतःची सामाजिक व राजकीय विवेचनाची जाण प्रगल्भ असेल. हिंदी लेखकजगाला माझे
हे म्हणणे कितपत रुचेल कुणास ठाऊक! -लीना मेहेंदळे -- अंतर्नाद ऑक्टोबर २००१
------------------------------------------------------------------------------