शुक्रवार, 10 मार्च 2017

नित्य - लीला -- फणीश्वरनाथ रेणू

नित्य - लीला
(मूळ हिंदी लेखक: फणीश्वरनाथ रेणू)
अनुवाद: लीना मेहंदळे

किसन गल्लीच्या तोंडावर येऊन थबकला. नंदबाबा आणि यशुमाई गोशाळेसमोर अंगणात बसून आहेत. काही गंभीर गोष्टी चालू आहेत.
बाबाच्या मुद्रेवरून स्पष्ट दिसतंय की आज जुन्या दाढदुखीने डोके वर काढले आहे. सांजप्रहर घालवण्यापूरतेच इथे येऊन बसले आहेत. पलीकडे ओटयावर आईने धाबळी घालून तयार करून ठेवली आहे.
- किसन विचारात पडला.
देवा,   माझ्याबद्दल आज पुनः किती गोपींच्या तक्रारी आल्या असतील ! तक्रार, आरोप... नाही नाही.
आज ज्योतिष -शिरोमणी गर्ग आले होते. तर मग बाबाची दाढदुखी तीन- चार दिवस टिकणार.
- हा गर्ग पंडित कुठल्या कुठल्या आडवाटेने येतो? नारद तर... जाऊ दे, त्याचा स्वभाव आता सर्वांनीच ओळखला आहे. पण हा गर्ग , असा बरोबर यात्रेचा हिशोब करून निघतो. की गोकुळात शिरताना किसनची गाठच पडू नये. घरी येऊन जे काही सांगतो त्याने तीन- चार दिवस कसल्याशा दुःखाची सावली घरादारावर पसरून जाते. सगळीकडे उदास बापुडवाणेपणा भरून राहतो.
- आता एक दिवस तरी त्याला वाटेत अडवून बजावलं पाहिजे ! परत कधी ब्रजगावी येऊन मेष-वृष केलं तर किसनलाच त्याची भविष्यवाणी सांगावी लागेल. आजच सांगायला हवी होती.
-गर्गमुनींच काय! एकाचे दोन करून सांगत असतो. दक्षिणा घेत घेत त्याची झोळी कधीच भरून जाते.
- आजच नाही का ?
किसनने पाहिल होत चार- चार गोप डोक्यावर तूप, तांदूळ आणि केळीचे घड लादून त्याच्या शिष्यांसोबत जात होते... भोगावं मात्र लागत किसनलाच.
बाकी सगळे चालेल किसनला. पण बाबा आणि माईचे उतरलेले चेहरे पाहून त्याचाही जीव कोंडतो त्या दिवशी तर गायी, वासंर पण दुःखाचे कढ गिळत लांब लांब निःश्वास टाकत असतात.
गोपींच्या तक्रारी येतात त्या वेळची गोष्ट वेगळी असते. इकडे अंगणात गोपीकन्यांची झुंड उभी असते. एक एक पुढे येऊन अभियोग ऐकवत असते. मोढा टाकून बसलेल्या माईला किसनकडून उत्तर हवं असतं .
" बोल किसन , ही काय म्हणते... तिला काय सांगू ? तुला काही शरम ? छी : छी: ! हात टेकले रे तुझ्यापुढे ! "
किसन प्रत्येक आरोपाचं स्पष्टीकरण देऊ शकतो. गायींची आणि वासरांची साक्ष काढतो-
- "काय ग धौली मी म्हणतो ते खरं आहे ना? "
गोशाळेतून लगेच धौलीचा हुंकार येतो- हूँक, हूँ ... !
कुणाच्या आरोपावर किसनने एवढं म्हणायची खोटी की सलोना पण तिथे होता ! मग त्या छोट्या वासराच्या हंबरण्यामध्ये तक्रार करणारीचा आवाज कुठच्या कुठे हरवतो. तार स्वरात फिर्यादिच्या विरूद्ध साक्ष देतो सलोना !
मग किसन हसून म्हणतो,
" माई , ऐक ! हा सलोना पण सांगतोय की सार झूठ ! किती खोटारडी आहे ही गोपी! तूच सांग माई, बिचारा पशू कशाला कुणासाठी खोटं बोलेल? ?"
त्या तिखट -मीठ लावणा-या गोपी तोंडावर हात ठेऊन हसू दाबायचा प्रयत्न करत असतात.
बाहेरून नंदनबाबा त्यांना रागावतात- "काय ग पोरींनो , दुसरे उद्योग नाहीत? का रोज रोज येऊन त्या बिचा-या मुलावर दोष लावता? "
गोपी हसत हसत पळ काढतात.
आईचं मन द्विधा असतं हा किसन सांगतो त्यातलं तरी किती खरं , किती खोटं ?
गर्ग पंडिताच्या येण्याने मात्र एक वेगळंच दुःख वातावरणात थिजून रहातं, निचरा न होणारं!
किसन आज गोधूलीच्या आधीच मधूबनातून परतला आहे. आताच वातावरणातलं विष घालवून शुद्ध करायला हवं पण त्या आधी गर्गमुनी काय सांगून गेला ते तरी कळायला हवं !
गल्लीच्या दुस-या बाजूने सलोना चौखूर दौडत येतोय! मधुबनात किसन दिसेनासा झाल्याबरोबर तो शोधत घरी येतोय!  गळयातल्या घंटिका वाजताहेत
- टिनिंग टिनिंग ! उं - याँ -याँ !
किसनने हाक दिली - , सलोने! व तळहात त्याच्यासमोर दिला !
सलोन्याने हातावर एक ढुशी दिली
- उँ- याँ- याँ!
निघून का आलास?
किसन पण सलोन्याबरोबर दौडत निघाला.
सलोना सरळ गोशाळेकडे जाऊ लागला. टिनिंग- टिनिंग !
य़शुमाई तुळशीला दिवा दाखवायला निघाली होती. तिला पण एक हलकीशी ढुशी दिली! कणकेच्या दिव्यातलं तूप डचमळलं!
" ओ सलोन्या, कन्हाई...! "
माईच्या वाणीतील व्याकूळता किसनने ऐकली . तो हतप्रभ झाला.
देवाला निरंजन दाखवून य़शुमाईने शंखध्वनी करायला घेतला तर सलोन्याने पण आवाज केला- उँ याँ याँ !
किसननं त्याल दटावलं - एं! शंखाची नक्कल करणार तू! बोलणी खाणार मी! "
पाण्याने शंख धुता धुता यशुमाईने जरांस स्मित केलं . " नक्कल नाही ! शंखासोबत तो पण जयध्वनि करतोय! "
किसनने माईच्या तोंडावर हसू पाहिलं आणि मनातल्या मनात जय जय केलं ‍! गर्गमुनींच्या लंब्या -चौडया बातांना तो आता फू: फा: करून उडवून लावेल.
यशूमाई म्हणाली, " काही खा! "
किसनने आपले कुरळे केस झटकले. "जरा थांब. दाऊ आला की त्याच्याबरोबर खातो! "
माई आता पाटयाजवळ बसून चंचीतून काही जडी- बूटी काढू लागली.
किसनने हळू आवाजीत विचारलं ,
"बाबांची दाढ खुप दुखतेय का ?"
पण माई चुप्प. म्हणजे गर्गावर वार करायची ही वेळ नव्हे!
तिला एक अत्यावश्यक सूचना देत असल्यासारखं किसन कन्हाईने सांगून टाकंल- " ऐकून ठेव माई , आजपासून मी दूध पिणार नाही, हाँ ! "
नंदराणीने औषध उगाळता उगाळता म्हटलं -ही रोजचीच धमकी ! तिने किसनकडे प्रश्नवाचक नजरेने पाहिलं .
" आज नवीन कारण काय? "
किसनने आवेशात कारण सांगायला सुरवात केली-
" काय का म्हणतेस? सांगू? हा जो तुझा सलोना आहे ना, हा कधी दात- तोंड धुतो? दातांना मातीने घासतो?"
माई औषध घोटत किसनला थोपवून म्हणाली-
" दातांवर घासण्याच्या नादात माती खायची सवय लागली तर ?"
क्षणभरच नंदनलालच्या तोंडावर लाजल्याचा भाव आला. लहानपणी आईने माती खाताना धरलं होत, तो प्रसंग आठवला. पण लगेच सहज होत तो म्हणाला,
" याच्या तोंडाला असा वास येतो की कुणी जवळ बसू शकत नाही याच्या ! मग याच्या आईच्या आचळांना पण याच्या तोंडातील थूक- लाळ लागते- ऊ याक् ! "
- उँ- याँ- याँ !
- अमृत का असेना ! मी सलोन्याच्या आईचं दूध नाही पिणार! "
किसनने झटकन सलोन्याचं तोंड पकडून माईच्या बाजूला फिरवलं-
" बघ बघ माई, मी आज यमुना किना-याच्या मातीने याचे दात घासले. कसे चमकताहेत बघ. पण तोंडाला वास अजून कायम आहे."
उँ- याँ- याँ! सलोना स्वतःला सोडवत दूर जाऊन उभा राहिला !
नंदराणीच्या चेह-यावर हसू फुटत होत . किसनने हळूच डोळ्याच्या किना-यातून पाहून घेतलं . मग एक मोढा तिच्या जवळ सरकवत, म्हणाला, " आणि माई , हा असभ्य पण आहे. नंगा फिरत असतो .एकदा मी माझी कमरेतली साखळी याला घालून त्यावर पितांबर बांधून दिला. काय केलं माहित्येय् तुझ्या लाडक्याने? सगळं शेण!"
- उँ- याँ- याँ !
किसनबरोबर भांडायला तयार झाला सलोना.
किसन हसला.
- " पहा तरी, माझ्याशी भांडणार म्हणे! आत्ता कुठे छोटी छोटी शिंग फुटतायत. वारे वीर ! "
सलोन्याने एक - दोन ढुश्या देत यशुमातिच्या पदरात तोंड लपवलं.
-उँ- याँ -याँ !
" हरला, हरला..."
सलोना रडीला आला आहे. बिचारा ! यशुमातिने त्याचे लाड केले आणि म्हणाली.
- " कोण रे मोठा लागून गेलाय् याचे दात घासून द्यायला ? - हे! म्हणे याने पुतना राक्षसिणीचं मुलं काय केशर- चंदनाने दात घासायची होय? म्हणे तोंडाला वास येतो. तर मग रात्रभर गालाला गाल टेकवून कोण कोणाजवळ झोपलेला आसतो? "
किसन आपल्या बंशीतली छिद्रं तपासू लागला.
यशोदेचं औषध तयार झालं होतं. उठता उठता म्हणाली,
- "बघ हा सलोना माझ्या कानात काय सांगतोय. म्हणतोय की मी तर नंदीचा वंशज आहे. गोपाळलाच ठेऊ दे त्याच पितांबर आणि घोंगडी आणि धाबळी आणि लंगोटी ! मला नाही लाज बिज वाटत!"
गोपाळ लाजला.
माई मुग्ध होऊन त्यांच रूपडं पहात राहिली -एकटक!
किसनला बरं वाटलं -
चला गर्गमुनिनी फार काही वाईट सुनावलं नसेल आज‍!
तो पण उठून उभा राहिला
-" उद्यापासून याला गोशाळेत खुंटीला बांधून जाईन.
' आणि तो दिवसभर उं याँ याँ करून हंबरत राहिल! "
" मग मी काय करू ? हा मधुबनात तरी कुठे स्वस्थ बसतो? कुठे झाडाझुडपात शोधत बसू याला? इकडून हाकलंल तर तिकडे यमुनेत उडी मारायला तयार ! आणि माई गंमत सांगू तुला- यमुनेच्या काठी उभा राहून वाहत्या पाण्याकडे आश्चर्याने बघत असतो आणि आपलं प्रतिबिंब दिसलं की भडकतो- पळून येतो. ''
" मग त्याची काय चूक ? हा तर संग - दोष ...! "
औषधाची ताटली घेऊन माई गेली नंदनबाला देण्यासाठी . बाहेरून कोणीतरी हाकारंल
-''ओ ए कन्हैया, तुझ्या गाई घेऊन आलो रे! "
पळत कान्हा बाहेर गेला. गोपसखा म्हणाला, "बलराम मावशीकडे गेलाय्... उद्या येईल."
उदास झाला कान्हाई! आज दादा पण नाही!
एकेक करून गाई आल्या. त्याच्या अंगाला घासू लागल्या . पण त्याची उदासी बघून आपणहून गोशाळेत जाऊ लागल्या .
फक्त सलोना इकडून तिकडे पळतोय- टिनिंग- टिनिंग.
तक्रारी सांगायला आलेल्या गोपीबालांनी डोकावून पाहिल. गोशाळेच्या अंगणात कन्हाई एकटाच बापुडवाणा उभा आहे:
आज सावळ्याला दटावणी मिळालेली दिसते जोरदार!
गोपीबाला तशा परतून गेल्या क्षणभर सगळ गाव उदास होऊन बसलं !
नंद - यशुमाईच्या या लाडक्या लेकाला ब्रज गावाला एक एक माणूस ऐकेका नावांन हाका मारतो. प्रत्येकाने दिलयं स्वतःच वेगंळ नाव! सावळा, मोहन ,कन्हाई, गोपाळ, केशव, मुरारी, बंशीधर, चोर वनमाळी, हरि... हरीची हजार नाव, हजार रूपं!
मनसुखची आई काठी टेकत टेकत आली,
-" बांके, ए बांके बिहारी! " किसनने इशा-यानेच तिला समजावलं आज इथे सगळ्यांचीच दाढ , नाक, कान, पाय दुखताहेत .. तू जा ! पण मनसुखाच्या आईला किती दिवसांनी संधी मिळत्येय्- किसन बरोबर एकटीने बोलायची . ती कसली जातेय्.
बांकेच्या अगदी जवळ जात कानात फुसफुसली, गर्ग आला होता ना! मी आले दुपारी तेव्हा काही तरी खुसर-फुसर सांगत होता. नंदबाबाला .मला या कानाने कमी ऐकू येत. पण कोणी माझ्या बांकेच्या चहाडया सांगेल तर मी ऐकणार नाही होय? तो गर्ग पंडित सांगत होता
- किसनने तिच्या कानाशी तोंड नेऊन विचारलं.
- '' अजून काय काय सांगत होता?"
"पेरत होता काही तरी इरिंग बिरिंग तुझ्याबद्दल . मी तरी भिंतीआडून किती ऐकणार ? आणि तेही या फुटक्या कानाने? म्हणून तर तुला विचारते- काही औषध आहे का ? लोक म्हणता, बांके चांगला वैदू पण आहे. बरं औषध जाऊ दे - तू नुसतं माझ्या कानात काही तरी बोल! त्या गर्गपंडिताचं म्हणणं खरं आहे का?"
किसनने तिच्या कानाजवळ नेऊन हलक्या स्वरात फुंकली - सीं ई ई ई!
म्हतारीच्या ह्दयात जाऊन तो सूर भिडला!
म्हणाली , 'खरच रे बांके, य़ा कानाला कसं बरं वाटतयं थोडं थोडं ऐकू यायला लागलायं आता एकदा या दुस-या कानात पण... ''
तेवढ्यात य़शुमाई बाहेर आलेली पाहून तिने डोळ्यांनीच खुणावलं- गर्गपंडिताच्या बाबतीत माझं नाव घेऊ नकोस.
मग तिची वाणी एकदम बदलली हातातली काठी सावरत उठली. म्हणाली,
माझा मनसुख असा नव्हता हां, बांके सांगून ठेवते. तुझ्याच संगतीने बिघडलाय्. सांगायला कुणाची डर आहे का ? मी बोलणार! , अरे, जो आपल्या आई- बाबांचा होऊन राहणार नाही, तो कोणाचाच होणार नाही, कोण्णाचाच! "
"ए मनसुखाची आई, काय बडबडतेस सांजच्या प्रहरी?" यशोदेने चिडून विचारल.
"हो, हो, मी बडबडतेय..."
आतून चिडक्या स्वरात नंदराजाने दटावलं, "मनसुखाची आई- "
म्हातारी काठी टेकत टेकत निघून गेली . त्याला उदास बघून यशोदा म्हणाली, "चल मोहना! तु बलदाऊसाठी बसून राहिलास आणि तो गेला मावशीकडे ! चल काहीतरी खाऊन घे! "
"नाही मी खात! "
- उं -यां- यां!
"कान्हू, चल ! मी ताजी दह्याची हंडी लावून ठेवलीय!"
" उंहूं! मग ती गर्गपंडीताबरोबरच पाठवून द्यायची होतीस !"
" अरे, तो बिचारा ब्राह्मण...''
" हो ,सगळेच बिचारे! मी एक छिछोरा ! माझा कोणीच विश्वास करत नाही आज! "
"कोण म्हणतं तुला छिछोरा ? चल ये सावळ्या! "
सलोना धावत आला आणि किसनला धक्का देऊ लागला.
-ऊठ . आईचं ऐकत नाहीस होय?

रात्री किसन उठून बसला.
''माई , रडतेस? डोकं दुखंतंय का खूप मी चेपून देऊ ? "
यशोदाने त्याचे हात अडवले.
" नाही बाळा, रडत नव्हते! काही तरी वाईट स्वप्न पडंल वाटंत! जा तू झोप!"
-म्हणजेच मनसुखाच्या आईने सांगितलंय त्यापेक्षाही कितीतरी जास्तच काही बोलून गेलाय हा गर्ग पंडीत!
आईचे निःश्वास आणि उमाळे स्पष्ट ऐकू येत आहेत किसनला! तिच्या ह्दयात खोल कुठेतरी कळ उठतेय !
बरोबर! पोटाच्या संतानासाठी कोणत्या आईचं काळीज तळमळणार नाही?
तर मग खरंच किसनचं कोणीच नाही का?
---------------------------------------------------------
गोकूळाच्या गल्लीबोळातून आज दुपारपासून कुणी नवीनच किशोरी भटकतेय. गोरा पान रंग, अभिमानी स्वरूप . नंदाची हवेली शोधत्येय.
"सांगा कुणी जरा! नंदबाबाची गढी कुठे आहे?"
''- हे ! कोण कुठली गं तू? इतकी अभिमानी ! स्वतःचं नाव-गाव सांगांव . मग विचारावं कुणांच घर! "
"मी नाही सांगत आपल नाव कुणाला फुकाफुकी ! तुम्हा चोंबड्य़ांना काय पडलेय गं माझ्या नावाशी ?"
"बापरे ! पहा कशी विषभरली बोली बोलत्येय ! काय ग, तुझ्याबरोबर कुणी पुरूषमाणुस नाही का?"
"नाही रे बाबा ! त्याची काय गरज? पण इथले लोक मात्र तनानेच नाही तर मनाने पण काळेच दिसतायत मला! कोण कुठंल गोकूळ ! कुठे आले मी रे देवा ! "
"ऐका ग सयांनो हिची बोली ! "
गोकूळातल्या मोठ्या गोपीपण गोळा झाल्या.
"काय ग पोरींनो, काय गर्दी केलीय?"
अपरिचिता गर्दीतून बाहेर आली. म्हणाली,
- "हो ना ! काय तुम्ही वळणं लावतच नाही का घरातल्या लेकी -सुनांना ? मला परदेशीला कुणी सांगतच नाही नंदराजाचं आंगण कुठचं ते ! "
त्या वृद्ध गोपी पण चिडल्या -
'' आम्ही नाही वळण लावलं?  आणि तू कोण ग राजकन्या लागून गेली आहेस? नाव गाव का सांगेनास ? "
रागाने लाल झाली ती किशोरी.
" आहेच मुळी राजकन्या ! राजा वसुदेवाची मुलगी आणि महाराजाधिराज कंस यांची भाची आहे म्हटलं मी."
"भाची? कंस महाराजांची~~?" कित्येक गोपी चित्कारल्या!
- " अरे , कोँणी कंसाने पाठवलेली डाकीण असेल ग बायांनो! "
- " अरे , बोलवा रे कुणी यदुरायाला, मुरारी~~!"
नवागता हसली ! " बोलवा, एकच का ? सगळ्य़ाजणी मिळून बोलवा."
" तू गप्प बस ग ! अगं लक्ष ठेवा. पळू देऊ नका हिला, कशी गावात घूसून आली आहे! "
किशोरी त्वेषाने हसली. आपल गाठोडं जमिनीवर ठेऊन त्यावर बसून शांतपणे बोलली,
-" म्हणजे तो छोकरा बरोबर सांगत होता."
"काय सांगत होता? कोणत्य़ा छोक-याबद्दल बोलतेस तू ? "
"तोच तो काळू होडीवाला!' सैल पडलेले बाजूबंद आवळीत किशोरी म्हणाली.
"काळा होडीवाला? नदीच्या इकल्या पारावर की तिकडल्या?"
" तिकडच्या पारावरचे लोक काळे नसतात.' किशोरी हातवारे करून सांगू लागली. " इकडचाच होता. होडी घेऊन धावत पळत आला माझ्याकडे. किती माझी मिनतवारी केली, मी कशाला त्याची होडी धरू ? यमुना पार य़ायला काय होडी लागते? पायीपायीच पार करून आलेय मी खोट वाटत असेल तर विचारा त्याच होडीवाल्याला."
"पण तो काय सांगत होता? आणि नाव काय सांगितललं?"
"काय सांगणार मला? काही तरी बोलत होता तर मी सांगून टाकंल " महाराजाधिराज कंसाची भाची आहे मी. पण तो एक मात्र बरोबर सांगत होता."
" काय ते? सांग ना !"
"ते ना ! इथल्या गोपींच्या खोटारडेपणाचे किस्से सांगत होता- की गोकूळात जातेस तर जरा जपुन . तिथे अशा मुली चोर आहेत की भांडणांच नाटक करून बघता बघता तुमंच सामान पळवतील."
"चोर मुली? नाव पण बोलला तुला? "
किशोरच्या कपाळावर आठया पडल्या.
" काय बरं नावं सांगत होता? हां, एक वृषभानुची मुलगी आणि दुसरी तिचीच सखी! "
- म्हणजे राधा आणि ललिता!
सर्व गोपींनी त्यांच्याकडे पाहिलं- ऐकतेस ना!
कित्येक गोपी एकासुरात बोलल्या,
"छे: छे: किसन अस नाही सांगणार कुणाला! काय ग नाव काय म्हणालीस त्यांच?"
" त्याने मला बंशीधर हेच सांगितल. मला बंशी वाजवून थोडा वेळ अडकवू पहात होता. मी काय त्याचं री , री पीं पीं ऐकायला आलेय गोकूळात?" असं म्हणत ती गौरबाला उठली आणि गाठोड झटकून तिने डोक्यावर घेतलं -
" आणि हो, मला म्हणाला, तू पण सावध रहा! माझी बासरी. अशीच चोरतात त्या दोघी ! कितीदा तरी चोरलीय."
सर्व गोपीकन्या चुप्प झाल्या. राधा ललिता अपमानाने क्षुब्ध होऊन गेल्या. डोळ्यात आसू आले. पण त्याहीपेक्षा एक वेगळीच आग सगळ्यांच्या मनाला येऊन भिडली. ही नागरकन्या निश्चितच त्या सर्वांपेक्षा सुंदर होती. आणि ही किसनच्या घरी राहणार ?
मनसुखाची आई तिच्या पाठी जाऊ लागली.
" अग ए पोरी , तुझ्या त्या गाठोड्यात काय आहे,? काही जडी-बुटी ठेवतेस की नाही? कानावर औषध देण्यासाठी? चल मी दाखवते तुला नंदराजाची हवेली ."
सर्व गोपींनी राधा आणि ललिताला समजावलं!
" एकदा जाऊन किसनला विचारायला हवं, का अशा गोष्टी करतो आमच्याबद्दल? आता मात्र त्याच्याशी कट्टीच घ्यायची. य वेळी खरंच , जी कोणी बोलेल त्याच्याशी तिला शप्पत... खोटारडा कुठला."
आपापली घागर घेऊन सगळ्या निघाल्या नदीच्या घाटावर.


यशोदा चकित आणि अवाक् होऊन बघत बसली. ही कोण पोरगी- न कधी ऐकली न पाहिली आणि एकदम आपली आई म्हणत पाय पकडून बसलीय.
" आई ग. तू आपल्या सख्ख्या मुलीला पण ओळखत नाहीस? "
अपरिचितेला आपले अश्रू आवरेनात.
" आई, मी तुझी योगमाया! "
" योगमाया? " यशुमातिचं आश्चर्य वाढतच होत. " कुठून आलीस?"
"घ्या ! अग मथूरेहून! :  मला समजलं . म्हमजे ती अफवा इथपर्यंत येऊन पोचली म्हणायची."
" कोणती अफवा?"
" आई, ते सगळं खोटं आहे गं! लोकांनी उठवून दिलं नंद- यशोदेची मुलगी योगमाया आकाशात उडून गेली. कुणी म्हणे कंसाने मारून टाकली . मला माहित आहे. मथुरेत एक गर्गपंडित आहे. तो इकडे पण येतो का? त्याच्यावर विश्वास ठेऊ नकोस गं! माझा हात बघून काही बाही सांगून टाकंल त्याने आईला बस्! तेव्हापासून आईने मला..."
तिने पाहिला . यशोदेच्या चेह-यावर अजूनही अविश्वास कायम होता. तिने अचानक यशोदेच्या गळ्याला मिठी मारली.
" आई, तूच माझी खरी आई आहेस, ना? ती मथुरेतली देवकी आई ! ती काही माझी खरी आई नाही. गर्गपंडितच सांगत होते.  होय ना?"
तरीही यशोदा गप्पच बसून राहिली. शेजारची एक गोपी ओरडून सगळ्यांना सांगत होती, "सावधान कंसाची भाची गावात आली आहे रे ! कंसानेच पाठवली आहे वाटतं! "
यशोदेने झटकन त्या अपरिचित लहानगिचे हात धरले.
"कोण आहेस तू? कंसाने पाठवलं तुला? राक्षसीण ! "
योगमाया रडू लागली. त्या आसवांनी य़शोदेच्या क्रोधाग्निवर जणू पाणीच शिंपडलं.
देवा, काय मी अभागी! सख्खी आई विश्वास ठेऊ शकत नाही माझ्यावर.  कंसाचा भाचा तुझ्या घरात चालतो पण स्वतःची मुलगी नाही चालतजन्मापासूनच सगळ्यांनी मला दूर लोटलं..."
तेवढयात नंदबाबा बाहेरून आले. "अग गोपाळची आई-"
योगमाया उठून धावत त्यांच्याजवळ गेली. चरणस्पर्श करून म्हणाली-
"बाबा, मी आले. ओळखा तर मी कोण? आई, तू सांगू नको हं!"
नंदबाबा पण आवाक् झाले. यशोदेकडे पाहिलं. ती त्यांच्यासाठी चटई घालत होती-
"म्हणतेय मी योगमाया आहे!"
"हो, योगमाया! आणि माझं दुसरं नाव विध्यंवासिनी पण आहे. मथुरेची आई मला विंध्या म्हणूनच हाक मारते."
विंध्या येऊन नंदबाबाच्या मांडीवर बसली . तिला दूर लोटणं नंदबाबाला जमेना.
यशोदा म्हणाली- " आल्यापासून असंच काही बाही बोलत्येय. म्हणजे , ज्या गोष्टी आपण ऐकत आलो,  त्या सर्वच खोट्या . ही जिवंतच होती."
योगमायाने नंदबाबाची मनःस्थिती ताडली . त्यांच्या मनात मुलीबद्दल कणव होती. त्यांचा हात हातात घेऊन म्हणाली,
"बाबा, मी त्या घरातून पळून आली आहे. पुनः मला तिकडे पाठवू नका."
नंदाच्या चेह-यावर विश्वासपणा होता. ती सांगत गेली-
"बाबा, त्या गर्गपंडित आणि नारदानेच खूप काही त्यांच्या मनात भरवलंय .मथुरेची आई हल्ली रोज मला टाकून बोलायची. आणि बाबांनी मला बेटी म्हणणंच बंद केल. म्हणतात कोण बेटी, कुणाची बेटी? कुठून आली?"
"कुठून आली?"नंदबाबा उसळून बोलले. "मला भेटला तर सांगतो कुठून आली ते!"
"पण का? असं का वागले ते तुझ्याशी? कधीपासून वागताहेत?" यशोदेने विचारले.
लहानगीने यशोदेच्या प्रश्नानांना उत्तर दिलं नाही. ती नंदबाबाच्या जपमाळेतील रूद्राक्षांशी खेळत राहिली.
नंदराजाने तिला उत्तर दिलं,
"तू का चिडतेस तिच्यावर पोरगी काय म्हणते ते ऐकून तरी घेशील की नाही? हं, काय बेटी, त्या गर्गपंडिताने काही सांगितलं का?"
" हो बाबा, इतक्या गोष्टी ..."
योगमायाने हात पसरून दाखवले.
"की या मुलीपायी भीक मागावी लागेल, म्हणे गावंढळ आई- बापाची गावंढळ मुलगी घेतलीस . सोन्यासारख्या मुलाच्या बदल्यात ही मातीची पुतळी घेतली.''
"ऐकलसं का, आता आपण गावढंळ झालो!"
यशोदा जमिनीवरच बसली . त्या पोरीकडे बघत राहिली. आता तिच्या तोंडावर अनाथ मुलीचा दीनवाणेपणा होता. मघाचा तोरा कधीच संपला होता. म्हणाली-
''आता ती आई मला सतत टाकून बोलते. दही वीक, शेणगोठा काढ, तीच तुझी लायकी. एक दिवस म्हणालीतिथे माझ्या मुलाकडून गाय-बैलांची कामं करून घेतात. इथे तुला साधी बाग सांभाळता येत नाही? शेवटी मी पळून आले आई!"
ती पुनः येऊन यशोदेच्या गळ्यात पडली. तिच्या पाठीवर हात फिरवत यशोदा तिला उगी करू लागली. "बरं केलंस बेटा."
योगमायेला धन्य झालं ! यशोदेच्या खांद्यात आपली हनुवटी रूतवत तिने वदवून घेतलं-"आई, तु मला परत नाही ना धाडणार?"
नंदराज आवेशाने उठत म्हणाले -"मुळीच नाही. कोण मागायला येतो तो मी पाहिन!"
मग आपला सोटा घेऊन ते निघाले . गावात बातमी द्यायला- त्यांची पोरगी मेली नव्हती. जिवंत आहे. आज पुनः मंगलवाद्य वाजू देत या ब्रजभूमीत. रात्री उत्सव करा सर्वांनी . कन्याप्राप्तिचं खरं पुण्य आज मिळणार नंदराजाला.
जाता जाता यशुमाईला सांगून गेले, "अग नुसती बसून नको राहूस आता. तिला काही गोड-धोड कर. केव्हाची उपाशी असेल बिचारी!"
तिला घेऊन यशुमाई आत गेली. मांडीवर बसता बसता ती बोलली-
"एक सांगू आई मी तुला ! किसनला आता परत पाठवून दे मथुरेला!"
यशोदेचं काळीज लककन् हालंल. योगमायेला तिने जवळजवळ ढकललंच.
पडता पडता ती विव्हळली- "आई गं!"
"पुन्हा असलं अशुभ नको बोलूस बेटी."
योगमाया आपला मुरगळलेला पाय धरून बसलीयशुमाई भानावर आली. जवळ जाऊन तिचा पाय हातात घेऊ लागली. तोच तिने आपले पाय आकसून घेतले.
"एकदा फेकलंस तिला दहा वेळा फेका मांडीवरून,पण कुंवर कन्हाई मात्र एक क्षणभरही मनातून जाणार नाही तुझ्या! असंच ना?"
"बघ बाळ, तू अजून कुंवरला पाहिलंच नाहीस. एकदा बघ मग बोल. त्याला कसं कुणी बाहेर काढेलये इथे माझ्याजवळ."
"राहू दे तुझी कुशी. ती फक्त तुझ्या किसनसाठीच असणार. मी विचारते- कधी त्याला ढकलंल होतसं असं मांडीवरून?"
यशुमाई निरूत्तर तिच्याकडे पहात राहिली. एवढीशी चिमुरडी! या वयात ही तिखट जीभ आणि हा मत्सरी स्वभाव कुठून आला?
योगमाया बोलतच होती.
-"मी काय बघू त्या किसन्याला? इथे त्याचं राज्य. तिथे त्याची राजधानी. तिथे पण दिवसभरात त्याचे सहस्र पाठ ऐकावे लागतात. आणि इथे तर सगळं ब्रजच कृष्णमय आहेवारे नशीब! तरी बघं रंग काळाच आहे. गो-या रंगाला तर विचारायलाच नको. आता माझ्याच रंगाचं पहामी गोरी आहे. माझे आई-बाप गोरे आहेत म्हणून मी गोरी झाले. यात माझी काय चूक? पण याच गो-या रंगामुळे तिथे सगळी मला गोरी गाय म्हणून हिणवतात. ठिक आहे. किसनच राहील इथे. माझं काय, मी तर फेकलेली. मी मेलेली. मी आकाशात उडालेली ! तो कुठला बाहेरून आला त्याची पूजा होते आणि आपल्या पोटच्या पोरीला रस्ता दाखवला जातो!"
"योगमाया बेटी, असं बोलू नकोस. चल आधी काहीतरी खाऊन घे." यशुमाई तिचे लाड करू लागली.
"नको मला कुणांच उरलं-सुरलं लोणी -साखर ! इथे म्हणे किसनने उष्टावल्याशिवाय कोण काही खातच नाही. शीः काय घाणेरडी सवय आहे!"
यशोदा निरूत्तर झालीखरंय पोरगी म्हणतेय ते. काहीच अनुच्छिष्ट नाही. किसन मुळे सा-या गावात कुणाघरंच गोरस निरुच्छिष्ट राहिलेले असेल अशी आशाच नाही!
बाहेर गोप परत येऊ लागल्याने ध्वनि वाढत गेले. यशुमाई लगबगीने उठली. तिच्याकडे पाहत योगमाया म्हणाली -
"माझी काळजी नको करूस! जा तू! किसन परत येण्याची वेळ झाली. त्यांच खाणं-पिणं करायला जा. मी माझी माझी खिचडी करून घेते. तिथे पण रोज हेच खायला मिळायच. खिचडी. नाव फक्त वेगळं होतं- खेचरान्न!"
बाहेरचा कलकलाट वाढला. योगमाया जाऊन अंगणात उभी राहिली. तिला पाहताच आत आलेल्या गोपींची झुंड थबकली .अधिकारवाणीने तिने विचारले-
" असं आकाश का डोक्यावर घेतलं तुम्ही ? कुठे प्रलय आलाय? काय झालंय?"
सर्वात पुढे होती राधासमोर येत म्हणाली-
"काय ग , कंसाची भाची! कुठे आहे तो बासरीवाला?"
"अहाहा- म्हणे बासरीवाला! तुलाच जशी त्याची काळजी. माय सोडून मावशीलाच दरद जास्ती! मी म्हणते, कुणाला विचारून असं धडधडत माझ्या अंगणात दिवे लागणीला आल्या आहात? इथे कुठंल मंदिर नाही की दिवेलागणीला आरती ऐकून तीर्थप्रसाद वाटला जाईल! इथल्या मुलाला तर तुम्ही बिघडवूनच ठेवल आहे. तुम्हाला काय वाटल की विचारणारी कोणी मुलगी या घरात नाही?"
यशुमाई आतून पळत आली. "काय झालं ग बायांनो?
"-किसन ! कुठेच दिसत नाही.  यमुनेच्या किनारी नाही, या त्या घाटावरही नाही, वृदांवनात नाही. बलरामाने निरोप पाठवला आहे. नंदबाबा कुठे आहेत?" ललिताने कसंबसं विचारलं !
राधा पुन्हा फिस्कारली- "आणि ही कंसाची भाची, इथे कशाला आली आहे? आल्येय तेव्हापासून पारावर कावळे बोलतायत. असगुनी कुठची!"
योगमाया यशोदेच्या चेह-यावरचे बदलते भाव पहात होतीमाई एकदा मोठयाने हाक मारणार होती किसनला, पण तिच्याकडे पाहून गप्प बसली. तिच्या घशातून एक आवंढा खाली सरकला.
एकच क्षण -सगळीकडे चिडीचुप्प झालं!
अचानकं राधेने पुढे येऊन योगमायेला कवेत घेतलं-
तिला जवळजवळ ढकलूनच योगमायेने आपली सुटका करून घेतली. "ए ए दूर सरक! वेडाचे झटके नाही ना येत! अशी उभ्या उभ्या थरथर का कापत्येस?"
नंदबाबा आले. सगळ्या गोपींनी एका सुरात सांगितलं "किसन हरवलायं. कुठेच सापडत नाही. बलदेवाने निरोप दिलाय की बाबांना लौकर पाठवा!"
आल्या पावली नंदबाबा परत फिरलेत. योगमायेने यांच्यामागून हाक दिली, "बाबा!"
यशुमति काकुळत म्हणाली-
"बाई ग! अस मागून नाही बोलावू!"
कोलाहलात नंदराजाला तिची हाक ऐकूच गेली नव्हती. चिडून ती म्हणाली- "इतकं अधीर व्हायचं काय कारण? आत्ता कुठे सुर्य मावळलायं अंधारही पडायचाय अजून! मी तर ऐकलंय तो रोज लपाछपी खेळतो. शक्यता आहे की इथे य़ेऊन जास्त रडणा-याच्याच घरात तो लपलेला अलेस शीः ! पोरींशी लपाछपी खेळायची ही कुठली वाईट सवय लागलीय त्याला?''
गोपींनी यशुमाईला एवढं हतबुद्ध झालेलं कधीच पाहिलं नव्हतं .आजूबाजूचे ग्वाले बाहेर आले- "चला चला!" नंदाघरी गोळा झालेल्या गोपी बाहेर निघाल्या.
"चला चला शोधायला."
शेकडो मशाली वृदांनवाकडे निघाल्या .कुणी पक्तिबद्ध तर कुणी भग्नपक्ति! पेटत्या, विझत्या... झाड झाडो-यात लपत, निघत... एक... अनेक!
गाव ओस पडलं. गायी आणि वासरांच मर्मभेदी हंबरणं मंद उसास्यांवर आलंनिःशब्दता वाढू लागली. सारा आसमंत खिन्न झाला.
योगमाया स्वतःशी बडबडत आत गेली- चुलाण्यावर खिचडी चढवायला..
यशुमाई हवेलीच्या बाहेर येऊन एकदा किसनला जोराने हाक देऊ पहाते. कुठेही असला तरी आईच्या हाकेला लगेच ओकार देईल. ती अंगणातून बाहेर निघाली तशी योगमायेने हटकलं, " आता तू कुठे निघालीस या अंधारात एकटी?''
यशुमाईच्या पायात बेडी पडली जणू. योगमाया म्हणाली- "बस एवढी खिचडी शिजू दे. जेवून -खाऊन मी लगेच निघून जाईन. आई गं , देवकी आई: तूच यापेक्षा बरी. तिथे असताना कधी भूक भूक असं म्हणावं लागलं नाही. भूक नाही सहन होत मला."
दूर.....वृंदावनात ...सहस्र कंठातून निघालेल्या सहस्र नावांनी मारलेल्या हाका , हवेवर आरूढ होऊन यशुमतिच्या कानावर आदळतात.
क्रमशः तीव्र होणारी आक्रदनं ! आर्त , करूण ... हाय, किती वेळ... किती वेळ यशुमति तशीच उभी असते.
तिकडे खिचडी शिजली. योगमायाने चूल विझवून भांड उतरवलं - इकडे तिकडे पाहिलं खायला काही पातेलं बोगणं आहे का?
"मी म्हणत्येय या घरातली पातेली -बोगणी पण किसनला शोधायला गेलीत का?"
यशुमाई दगडी पुतल्यासारखी स्तब्ध होती. योगमायाने भांडं आपटलं तशी ती भानावर आली.
"भांड्यातच खाऊ काय मी?"
-"समोरच थाळा आहे बेटी तुझ्या!"
-"त्यावर कन्हाईचं नाव खोदलेलं आहे."
वृंदानवातून आर्त हाका पुनः एकदा हवेतून थरथरत येऊ लागल्या.
इकडे योगमाया उच्च स्वराने रडू लागली. "आई ग, बोटं भाजली ग माझी गरम खिचडीने. भुकेने तडफडत्य गं मी !"
अजब रोदन! आकाश पाताळाला ते रोदन भेदू लागलं. सा-या जगावर त्याचं सावट पडलं असलं रोदन यशुमाईने कधीच ऐकलं नव्हतं.  धावत जाऊन तिने योगमायेला कुशीत घेतलं.
"रडू नकोस. रडू नको उगी हो !" योगमाया तिच्या पदरात तोंड खूपसून हमसून हमसून रडत राहिली. -याच वेळाने शांत झाली.
पण मनाशी एक निश्चय करूनच. दोन्हीपैकी एकाची निवड करावीच लागेल. मनातून एकाला काढून टाकावेच लागेल. किसन तरी राहिल तुझ्या मनात नाही तर योगमाया तरी राहिल.
तिच्या रडण्यापुढे यशुमाई काही काळ किसनला विसरली. थाळीत खिचडी वाढून तिच्या समोर भरवायला बसली. योगमाया हट्टाला पेटली.
"तिथे देवकी आईला खाऊ घातल्याशिवाय मी कधी तोंडात घास नाही घातला. तू खा आई!"
यशुमतिच्या तोंडाडवळ घास आला आणि तिला किसनची आठवण झाली. किसन उपाशीच असणार! उपाशी किसनची आई तोंडात अन्न टाकणार... कसं?


दोन प्रहर रात्र झालेली! यशोदेने पडल्या पडल्या योगमायेची चाहूल घेतली.
-झोपली का बया? आल्यापासून हट्ट चालवले होते. किती समजावून , विनवण्या करून जेऊ घातलं. झोपण्याच्या वेळी पण दंगा करू लागली.
- "जिथे किसन झोपतो तिथे नाही मी झोपणार . दुधाचा वास नाही आवडत मला. आणि ...एकटी... मुळीच नाही. शिवाय आईचे पाय चेपून दिल्याखेरीज झोप नाही येणारं."
काहीही म्हणा, पण देवकीआईने एवढं चांगल वळणं मात्र लावलं आहे. नाहीतर काय दुर्दशा आहे या घराची? आज स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं. आता ती आली आहे, तर आईचं सगळं काम अंगावर घेणार .हात-पाय पण नकोत आईला हलवायला. मुलगीच आईची सेवा करू शकते.
मुलीविना आईचा त्रास पाहिला तिने.  आता आईला सुखात ठेवील.
खरंच बळजबरी करून तिने यशुमाईचे पाय चेपायला घेतले, आणि काय माया झाली कुणास ठाऊक? यशुमाईला झोप आली ते आतापर्यंत ! किसन...!
"हां, तो झोपला असेल आपल्या देवकी आईच्या कुशीत -राजपलंगावर. तू का काळजी..."
यशोदा कातर झाली. एक कापती विव्हळती हाक तिच्या काळजातून निघाली. "कन्हाई- -... कुंवर... ... ....!"
"आई" , योगमाया जागी झाली. " बस एकच प्रहर भर रात्र शिल्लक राहिली आहे. तेवढा वेळ तुझ्याजवळ झोपू दे. मला माहित असतं तर मी जेवण- खाण करूनच निघून गेले असते."
मग आपल्या हातांकडे पाहून म्हणाली -
"तुझ्या किसनचा रंग झडतो का ग? बघ, कसे काळे-काळे चट्टे उमटलेत."
यशुमाईने पाहिलं - खरंच जागोजागी काळे उमटले होते तिच्या शरीरावर!
मायलेकींचा आवाज ऐकून सलोना आला आणि पलंगाजवळ येऊन उभा राहिला यक् योगमायेचा हात चाटण्यासाठी जीभ काढली!
योगमाया जाऊन यशोदेला घट्ट बिलगली-
"मला गायी-गुरांची फार भीती वाटते."
तरी सलोन्याने पुढे येऊन जिभेने चाटलंच थोडंस.
योगमाया किंचाळली- "आई~~~"
यशुमाईने रागावून सलोन्याला हाकलून दिलं.
हाकलेला सलोना बाहेर गेला नाही. खोलीत एका कोप-यातल्या खुंटीवर कपडे लटकत होते. त्यातला किसनचा जरीदार पितांबर त्याने दातांनी ओढून घेतला. योगमायाने डोळे किलकिले करून पाहिले- सलोना पितांबर चघळत होता.
"गेला-गेला- पितांबर माझा!" योगमाया पलंगावरून उडी मारून त्याच्या जवळ पोचली.
तशातच तिच्या डोक्याला बांधलेल्या चुनरींच टोक पलंगात अडकून चुनरी फाटली. मेहनतीने त्यात बांधून ठेवलेले कुरळे केस अस्ताव्यस्त होत बाहेर पडले. सलोना हर्षोन्मत्त होऊन बाहेर पळाला-
टिनिंग-टिनिंग!
पुनः पळत आत आला
यशुमाईच्या डोळ्यांसमोरचा पडदा उघडला. सुन्न पडलेलं मन निरभ्र झालं जणू. किसनच्या सावळ्या मुखड्यावर अनंत भाव होते!
अरे चोरा... ,किसन, योगमाया, विंध्या , लीलाधर...!
सर्वप्रथम नंद महाराजाच्या गोशाळेतील गाईंनी हर्षध्वनी केला. पाठोपाठ ब्रज गावात उदासवाण्या बसलेल्या गाईंनी- जयहो, जय हो ! हम्माँ~~-
वृंदावनाच्या कुंजा-कुंजातून, यमुनेच्या तटातटातून किसनला शोधणा-या गोपांनी कान टवकारून ऐकलं -
हो, किसन सापडला.
पळाले सर्व गावाकडे... किसनची नवी लीला पाहायला.
आकूळ राधा सगळ्यांच्या पुढे पळत आली. पण हवेलीच्या दारावर थबकली... योगमायेच्या जिभेत विष आहे... कंसाची भाची!
राधेच्या पाठोपाठ ललिता आली.
"सखी उभी का, चल ना आत."
ललिताने खिडकीतून जे पाहिल ते पाहतच राहिली.
मधुबनातील शुक्र-पिकांनी एकदम कलकल करून ब्राह्यवेळेचा मूहूर्त झाल्याची आठवण करून दिली.
राधा आणि ललिता, एकमेकींमच्या आलिंगनात अंगण पार करून घरात शिरल्या. एकटक पाहू लागल्या
गेरू आणि गोरजाने माखून माखून गो-या केलेल्या किसनच्या देहाला सलोना जिभेने चाटून साफ करत होता. माई पदराने रगडून रगडून पुसत होती. हसत होती छलिया! आईशी देखील कपट‍!
सखे , नित्य लीला...., हरि हरि बोल....!
राधा आणि ललिताच्या गळ्यातून भैरवी कीर्तनाचे सूर उमटले!
यशुमाईने वळून पाहिले, मधूर हास्य केलं आणि ती पण त्यांच्या सुरात सुर लावून गाऊ लागली. आनंदविव्हला आई!
यशुमातिने पाहिलं- जो किसन, तोच योगमाया, तोच राधा, तोच ललिता. तोच सलोना! आणि यशोदा पण तोच!
ब्रजवासी गोपांच्या झुंडी धावत पळत येत होत्या...
किसन...किसन....किसन....!
गा-गा- यशोदा माते, गा कृष्ण कथा!
किसन दृष्टी वर करून कुणाकडे बघू शकत नाही: अंग चोरून उभा आहे. शेजारी चटईवर योगमायेचं गाठोडं आणि त्यातील वस्तू अस्ताव्यस्त पडल्या आहेत. राधेची चुनरी, ललिताचे कंकण , ज्येष्ठाचे पैंजण तर अनुराधेचे कुंकमपात्र!
ब्रजगावात आनंदांच उधाण आलं. ! किसन भोवती फेर धरून सगळेच नाचू लागले. नंदराज आणि यशोदा पण!
सलोना कधी त्यांना बाजूला करून आत किसनजवळ जाऊन येतो तर कधी बाहेर येऊन फे-याच्या बाहेर उड्या मारतो.
टिनिंग-टिनिंग-
उँ-याँ- याँ...
---------------------------------------------------------------------------------
























































































































































































































































































































































































































कोई टिप्पणी नहीं: