मंगलवार, 28 मार्च 2017

गुलमोहर -- लीना मेहेंदळे

                          गुलमोहर
          आता रात्रीचे दोन वाजले असतील मला माहित्येय की, आज मला झोप येणार नाही! टप्- टप्-टप्... बाहेर एकाच तालावर  पावसाचे रडगाणे  सुरू आहे. मधे मधे वारा पण जणू  काही मूड  आल्यासारखा  घोंघावतो -घों  घों...  उगीचच.  मी जसा वर्गात कधी कधी  उठून  उगीचच   प्रश्न करतो तसाच!
           हे ढग एकसारखे कोसळून का नाही जात?  नुसतीच आपली  रिपरिप...!  त्यांना बोअर कस नाही होत?  मसा तर  झालयं बुवा. लोकांना कस या पावसात संगीत दिसत?  मला तर हे  पपांच्या  लेक्चरपेक्षा  असह्य होतंय्!
            मला माहीत नाहीय्- की माहित्येय?  माझ्या डोक्यावर  एक टेन्शन आहे. शरीराची  नसन् नस  टेन्स आहे. मी वाट  बघतोय् -कदाचित पाऊस  थांबण्याची? हे  ढग विरून  गेले तर  कदाचित पुनः  निळंशार  आभाळ नाहीतर निदान समोरच्या  मैदानातला गुलमोहर!  मला बघायचा ध्यास का लागलाय? अंकल सांगत होते.- की  'त्या'  दिवशी ते या गुलमोहराच्या  झाडाखालीच उभे होते अजून  बरचसं  काहीतरी  मी कुठे ऐकलं?  लक्षच दिल नाही. काल संध्याकाळच्या  शोला  जाताना  मम्मी अशा त-हेने  त्यांना  माझ्या तक्रारी सांगत होती- आणि पपा  कसे तिच्या  म्हणण्याला माना डोलावत  होते!  त्यांचं ठरलं असणार-आता मला  सुधारायचं काम  अंकलनी करायचं.... काय करणार?  पपा आणि मम्मीच्या मते  त्यांनी माझ्य़ापुढे हात टेकले आहेत.  आणि अंकल  तरी कसे ? ते  नेहमी माझी  बाजू  घेतातच असं मी म्हणत नाही.  पण नीदान  मला  उपदेशाचे डोस कधीच पाजत नाहीत.  त्यांच्या मते प्रत्येक माणसाची बुद्धी स्वयंपूर्ण असते म्हणून  प्रत्येक  गोष्ट माणसाने  स्वतःच्या  बुद्धिनेच केली पाहिजे. खरं तर  यासाठीच  मी अंकलना इतकं  मानतो.  पण माणूस  कोणत्या  क्षणी कसा  बदलेल याचा काय  नेम सांगावा?
                  कमाल आहे -अंकल पण संध्याकाळी  हेच सांगत होते-माणूस कोणत्या क्षणी  कसा बदलेल याचा काय नेम?  आणखीन  काय काय सांगत होते अंकल? काहीच  आठवत नाही आणि आठवणार पण नाही आणि आठवणार तरी कसं ?  काही  स्वरलहरी कानाच्या पडद्यावर  निनादल्या  आणि त्यामुळे डोक्याच्या  कुठल्या तरी  कोप-यात  काहीतरी स्पंदन  झाले होतं.  येवढंच. एका कानाने  ऐकून  दुस-या कानाने  बाहेर  टाकण्यासाठी  तरी  जेवढे लक्ष दिले पाहिजे तेवढे पण मी  त्यांच्या  बोलण्याकडे....
           समजा आता मी गुलमोहराच्या  झाडाला नीट बघू  शकलो तर  " त्या दिवशी " झाडाखाली उभे असलेले अंकल मला दिसू  शकतील का ?   आणि तसे  ते दिसले  तर त्यांची गोष्ट मला समजू  शकेल का? नक्कीच! याचसाठी  तर माझ्या  रक्ताचा कणनकण वाट बघतोय -एक असह्य  ताण नसानसातून  असूनसुद्धा!  मला  खात्री आहे-अहं-मला-काहीच खात्री  नाहीये!
              सकाळी मम्मी म्हणाली-"बाबारे, संध्याकाळी  वेळ काढू   शकलास तर जरा  तुझ्या प्रिय अंकलच्या   दवाखान्यात जाऊन ये. त्यांचं तुझ्याशी  काम आहे  थोडंस."
            या मम्मीच्या बोलण्यातून  अस्मादिकांसाठी  सततच व्यंगबाण!   आता सुद्धा किती  शिताफीने  'वेळ काढू शकलास तर'   आणि "तुझ्या  प्रिय" शब्दांचा प्रयोग केला.!  वाटलं तिला सांगाव-मम्मी, काही फायदा नाही-माझ्यात काहीही सुधारणा होणे अशक्य! रोज जसे  तुमचे  चार उपदेश  ऐकावे  लागतात तसे  आजपासून  अंकलचे पण म्हटलं अंकल ,  आज तुम्हाला पण पाहूनच घेऊ.
            अंकल बरं काय गोष्ट सांगत होते ? ते  म्हणाले की , या गोष्टीवर फक्त माझाच हक्क  होता!  म्हणजे  नक्की काय ?  अगदी  अंकलचा पण या गोष्टीवर हक्क नव्हता? अंकल  म्हणे  कधीपासून  विचार  करीत होते. -मला हे सर्व  सांगावं का- आणि सांगावं तर कसं ? तयारी  होत नव्हती....
                  माझे कान आणि मन एकदम टवकारले  गेले.  हेच ते- हेच जाळं, आज  वर्षानुवर्ष चालत आलेलं-  गोष्टीच्या  नावाखाली उपदेश देण्याचा प्रयत्न कुणी  केला नाही ?  आजीच्या  गोष्टी  -नाहीतर  शाळेतल्या त्या  पंचतंत्रातल्या  गोष्टी पपा. गोष्ट सांगतो बरं  का !"  आणि मग गोष्टीच्या  शेवटी  -"बरं  का!"  आणि मग  गोष्टीच्या  शेवटी-"बघितलंस ना- असं होतं -म्हणून असं वागावं..."
         पपांना सुरवातीच नाटक कधीच  पुढे टिकून ठेवता आले नाही.पण का हे सगळं ? तर म्हणे  मी  आताशा बिघडलो  आहे तर - त्यात  त्यांच काय जातं?
                 म्हणे पूर्वी  मी फार  हुशार होतो- ओके, असेन!
                 म्हणे आताशा माझं मन अभ्यासात नसतं -
                 ठीक आहे-माझेच मन आहे ना? का ते पण त्यांचच आहे- त्यांच्या मर्जीप्रमाणे वागायला?
                  त्यांच्या म्हणे माझ्याबद्दल फार अपेक्षा होत्या.
                 कुणी सांगितलं  होतं?
         म्हणे मी  दिवसभर, रात्रभर  कुठेतरी  भटकत असतो-
         त्यात काय माझे मित्र पण भटकतातच की!
          म्हणे मी कपडे, दाढी, संगत कशाचाच विचार करत नाही, हिपप्यासारखा वागतो.  आता पपा, तुमच्या  समाधानासाठी  कॉलेजला तर जातोच-  दरवर्षी पासही होतोच! आणि भटकू नको तर काय करू ?  कुणीतरी प्लीज पापांना सांगा की   आता त्याचा  काळ राहिलेला नाही की  काही कारण नसले तरी चांगुलपणा  धरून ठेवा- नीट अभ्यास करा. यश  किर्ती  मिळवा. असं करा,  तसं करू नका!  आमच्या जीवनात काय उरली आहे या मुल्याची जागा?  चांगल्या डिग्य्रा किंवा चांगल दिसण-वागण यांचा आता नोकरीसाठी कुठे  उपयोग आहे का?  काहीही करायला घ्या- ते करण्यासाठी  इतके उमेदवार टपून बसले आहेत की , मला तर सगळं  बोअरच झालयं.कुणी  सांगितली ती शर्यत? ती धावाधाव? यात  मला काही  इंटरेस्ट वाटणंच शक्य नाही . पण हे पपा, तुम्हाला नाही कळणार आणि  अंकलना पण नाही...
            अंकल सांगत होते-'एक दिवस मी असाच तुझ्या खिडकीतून  दिसणा-या त्या गुलमोहराच्या  झाडाखाली  उभा होतो- उगीचच, निरर्थक, तू तेव्हा क्रिकेट खेळत बसला होतास."
           " तुम्ही माझ्या कोणत्या भावनांना  हात  घालू  पहातायं अंकल?  क्रिकेटच्या  आठवणीने भावविवश होईन आणि  तुम्ही मला बोधामृताचे चार घोट पाजाल, असं का वाटत तुम्हाला? कित्येक वर्षात  मी क्रिकेटची बॅट म्हणून हातात घेतली नाही- बोअर झालोय! कधी आवडत असेल तर क्रिकेट खेळायला-पण ती  बालपणीची बालीश आवड  एवढचं  पण तुम्हाला काय सांगायचय ते तुम्ही  पटकन सांगून टाकावं  म्हणून मी हे काही बोलत बसत नाहीतुमच्याजवळ  माझी  मित्रमंडळी वाट पहात असतील. मी कधी  तुमच्या  तावडीतून  सुटून  त्यांना  जॉईन  होतोय याची  मला पण  झटकन तुमच्या  समोरून उठून जाता आलं  असतं तर बरं  झालं  असतं- पम पावसाने  असा काही  सूर  लावलाय की , धड पडतही नाही आणि धड थांबतही  नाही-''
            खरंच- हा पाऊस- धड पडतही नाही  आणि  धड थांबतही  नाही.  आता रात्रीचे  दोन वाजले  असले तरीही!  पण समोरच्या  गुलमोहर मला अंधुकसा दिसू लागलाय.  अनं ते  दृश्य  पण खरंच - "त्या दिवशी'  म्हणजे  सुमारे  बारा वर्षापूर्वी -मी  जेव्हा सहा वर्षाचा असेन -तेव्हा  अंकलपण  अठरा एकोणीस वर्षाचे नसतील का? म्हणजे माझ्या  आजच्या  वयाचे आणि  हो!  मला आठवतयं एक दिवस  नक्कीच  माझ्यावरूनच  काहीतरी गप्पा चालल्या  होत्या अंकलची आई मम्मीला सांगत होती-
          "बाई , बाई शाळेतून कॉलेजमध्ये  गेल्यावर   मनीष पण  अगदी अस्साच  झाला होता- भलभल्या संगतीत पडला होता- पण देवीचीच कृपा- का कोणास ठाऊक  एकदम  त्याच्या  मनानी  घेतलं की , आपण  डॉक्टरच व्हायच-अगदी उत्तम डॉक्टर व्हायच आणि  सुधारला बघा -नाहीतर  ही आजची मुल म्हणजे-"
          म्हणजे मी का अंकल? आता पहाच  मम्मी, अंकल पण माझ्यासारखे बिघाडले होते नंतर सुधारले....
          अरे,  हे काय येऊन गेलं माझ्या  मनात?  "अंकल नंतर सुधारले" म्हणजे  काय मी बिघडलो  आहे  आणि पुढे  कधीतरी  सुधारणार  आहे आणि  वर हे  कबूल  करतोय? कशासाठी  सुधारायचं  आणि कुणासाठी  छे छे!  असा मी  हरणार  आहे  का आज!  पण अंकल शेवटी सुधारले ते काय म्हणून ?  काय मिळालं असेल त्यांना सुधारून ? आणि  आधी बिघडलेले अंकल कसे असतील ?  अर्थात अंकलच्या आई- वडिलांना कधी त्यांच्याबाबतीत असं  निराश व्हावं लागलं  असेल हे कबूल  करायला मन तयारच होत नाही .मी त्यांना  बघत  आलोय  तेव्हापासून -
                  बाहेर जोरात ढगांचा  गडगडाट आणि  विजेचा  क्षणिक  अग्नीलोळ. त्यात क्षणभरच दिसलेलं ते क्रिकेटच मैदान आणि कडेचा गुलमोहर!  शेवटी  हा साचलेला पाऊस  कोसळणार तर?  आणि  अंकलची ती गोष्ट?
          ...... ती म्हणजे, अंकलने संध्याकाळी सांगितलेली नव्हे- तर पहातयं -ती गोष्ट -जी मला दिसेल -फक्त  मलाच-
           ......  होय-मी क्रिकेट खेळत असे या समोरच्या  मैदानातच!  मी पाच  सहा  वर्षाचाच होतो. मैदानात सकाळ -संध्याकाळ कुठली ना कुठली टीम  प्रॅक्टीस करीत  असायची .एका  कोप-यात  माझी  स्टंप कायमचीची गाडलेली  असे.  प्रत्येक  ओव्हरच्या  मध्ये बोलरने एकदा माझ्या  मोठ्या  सप्तरंगी बॉलनने मला पण बोलिंग टाकायचे  हा आमचा  ठरून गेलेला नियम  होता. आणि मग  मी पण  बॅट  घेऊन  बॉलच्या  मागे  असा लागायचो की,  एका बॉलमध्येच माझी सेंच्युरी पूर्ण व्हायची.
               अंकलनीच सांगितल- त्या दिवशी ते  उगीचच या रस्त्याने जाता जाता गुलमोहराखाली  थांबले  होते आणि  या छोटया  क्रिकेटविरानं त्यांचं  लक्ष वेधून  घेतलं होतं. आणि कसं कुणास ठाऊक - अचानक  बॉल आला जरा  वेगातच आणि स्टंप  उखडून टाकीत  बाऊंड्रीच्या  बाहेर रस्याकडे उडाला -इकडे  एका हाताने  चड्डी सांभाळत   बॅटसमनन रस्त्यावर येऊन  बॉलला हूक केले  आणि तिकडे  समोरून  येणा-या ट्रकनं बॅटसमनला-
           मला नेहमी फक्त एवढच आठवत की , डोळे उघडले  तेव्हा मी  हॉस्पिटलमध्ये होतो आणि मनीष  अंकल माझ्यासमोर  पण  आज  इतरही  खूपसं आठवू पाहतय वेदनांनी मळा रडू कोसळत होत पण  परक्या माणसासमोर  कसंरडणार असं  वाटलं होत का मला ? हा, आता समोरचा  माणूस डॉक्टर  असेल तर  त्याच्यासमोर  रडायला हरकतनाही.मी अंकलना विचारलं -"तुम्ही डॉक्टरच आहात ना?  पटकन काही  उत्तर  न सुचून  ते म्हणाले- 'हो' -आणि माझं थोपवून  ठेवलेलं रडू  बाहेर फुटलं- हे कोडं त्या डॉक्टर साहेबांना सुटण शक्य नव्हत.
             तेव्हा मी कित्येक महिने  दवाखान्यात होतो. जीवनाचा सगळा दवाखान्याचा शेअर संपवायलाच जणू . रडत पण . खूप  असे ते पण  बहुतेक रडण्यात सगळा  शेअर  संपवण्यासाठीच , का  कोणास ठाऊक  पण मला सगळी औषध  मनीष अंकलनेच द्यावीत म्हणून मी अडून  बसे. इतर कोणी  माझं  ड्रेसींग केलेल मला चालत नसे. इंजेक्शन पण  त्य़ांनीच  द्याचे हा माझा हट्ट  असायचा  मला  समजावता समजावता  सगळ्यांच्या  नाकी नऊ यायचे. पम या  हट्टातूनच अंकल आणि  आमचा परिवार  एकमेकांचे  मित्र झाले.
             बाहेर सगळं कसं शांत शांत झालयं! पाऊस थांबल्यासारख वाटतोयच मी विचार करतोय -संध्याकाळी  खरोखरोच  अंकलने मला काही लेक्चर , काही उपदेश दिलाय का? पण मला काहीच सुचत नाहीय!  समोरचा गुलमोहर आता स्पष्ट दिसतोय मला.  एकदम आठवलं  अंकलची आई एकदा म्हणाली होती की, आधी अंकल इंजिनीयरींगला  होते -आणि वाईट संगतीत पण पडले होते. आणि अचानक  एक दिवस हट्टाने  त्यांनी मेडिकलला  ऑडमिशन घेतली.
              ......का  आणि कधी ? आमच्या  आणि त्यांच्या  घरात कुणाच्याच लक्षात न आलेली  उत्तरं! आज  अंकलनी पण कुठे सांगितलय?  त्यांना काय माहित आहे की,  त्यांच्या इंजिनीअरींग स्टुडण्ट असण्याची  आणि बिघडण्याची  गोष्ट मला माहित आहे  म्हणून? पण त्यांनी  मेडिकलला  हट्टाने  ऑडमिशन  घेण्याचे कारण  आणि वर्ष दोन्ही  मी सांगू  शकेन  आताच मला पण ते कळलयं ना!
  मला वाटतं मला बहुतेक झोप लागणार आहे........
-------------------------------------------------------------------------
                                                 लीना मेहेंदळे













 

         













          
       














 





























          
  


















  

  

कोई टिप्पणी नहीं: