बदला
किती वेळ झाला
पण छोट्या आत्याच हात धुणं कांही संपत नाही. चार -सहादा साबण रगडून झाला असेल
हातांना ! पण अजूनही कांहीतरी ओंगळ त्या हातांना चिकटून राहिल्या सारख वाटतय्. तो
ओंगळ स्पर्श मनावर आणि शरीरावरही अजून चिकटून बसला आहे. तो जावा म्हणून त्या
रात्री सुद्धा छोटी आत्या असच साबण लावून लावून अंग धूत बसली होती ! . पण कुंवरजींच्या देहाचं आक्रमण, त्याच्या खुणा तिच्या शरीरावरून गेल्या नाहीत पुसल्या गेल्या
तरी मनावरून कधीच पुसल्या .
छोटी आत्या
तेव्हां होती तश्शीच अजून आहे. गोरीपान, नाजुक बाहुलीसारखी ! हात लावला तरी मळेल
अशी नितळ कातडी! आणि स्वच्छतेचेही कोण
वेड होतं! जरा इकडे तिकडे हात लागला तरी लगेच धूत असे! ते लावण्य आता वाढत्या
वजनामुळे थोड गोलाकार झालय एवढच कांय ते!
मात्र एक
मोठा फरक झालाय तिच्यामध्ये! सुगंधाच फार फार वेड होत छोट्या आत्याला . उशीखाली
मोग-याची फुलं उशाशी घेतल्याशिवाय झोपू शकत नसे!
तीच आता रात्रंदिवस या बिन खिडकिच्या अंधा-या कुबट वासाच्या खोलीत
कुंवरजींच्या बरोबर रहाते. कुंवरजींची संपूर्ण जबाबदारी तिनेच उचलली आहे. अगदी
स्वखुशीने । सकाळी उठल्याबरोबर त्यांना पॉट देणं . मग दांत घासून गुळण्या केलेली भांडी स्वच्छ करणं . बिछान्याच्या चादरी
बदलण, कुंवरजींच आंग ओल्या टॉवेलने
पुसून काढण. त्यांचे कपडे बदलून देणं,
कपडे , चादरी, धुण- तरीही प्रत्येक काम, प्रत्येक स्पर्श तितकाच ओंगळ वाटतो- जितका
पहिल्या रात्रीचा! मग हात धुवून धुवून तो स्पर्श घालवायचा प्रयत्न करते छोटी आत्या!
आत्ता
रात्रीच्या जेवणाची गोष्ट! आत्याने वरणांत बुडवून पोळीचा घास कुंवरजींच्या तोंडासमोर आणला आणि कुंवरजींनी तोंड फिरवल .
अस्सा राग आला आत्याला! तिने तिने घास थाळीत ठेवला आणि थाळी उचलून भिंतीवर आदळली.
भाज्या, वरण , चटण्यांची पंचरंगी चित्रकारी भिंतीवर उमटली. कुंवरजी तोंडाने गों-
गों करण्याशिवाय कांही करू शकले नाहीत. कांय करणार? आत्याच्या हातांचा आधार
नसल्याने बिछान्यावर आदळले. भांडी आवरतांना आत्यानी मनाशी विचार केला ''सावधान, इतका राग-राग केला तर आपल एकमेव
शस्त्र बोथट होऊन जाईल . मग एवढी सेवा
करण्याचा कांय उपयोग !''
पटकन
सर्व विखुरलेल अन्न आवरून छोटी आत्या दुसरी थाळी घेऊन आली . यावेळी कुंवरजींनी
तोंड फिरवल नाही, पण अस्फुट आवाजात कांही तरी सांगण्याचा प्रयत्न केला- त्याचा
अर्थ होता कि मला जेवण भरवण्यासाठी दुस-या कुणाला तरी बोलव! आत्याला अर्थ कळत
होता, पण तिकडे दुर्लक्ष करून तिने पुनः
पोळी भाजीचा घास पुढे केला. कुंवरजींनाखूप राग आला. डोळे वटारून आणि कांही तरी
रागाने बोलून त्यांनी व्यक्त करण्याचा प्रयत्न केला, पण तोंडातून गों- गों शिवाय
शब्द फुटले नाहीत. त्यांनी पुनः तोंड फिरवायच्या आंतच आत्याने घास त्यांच्या
तोंडात कोंबला. निरूपाय कुंवरजीं जेऊ लागले. संपूर्ण जेवण भरवून , हात तोंड धूवून
देऊन आत्याने आधार देत त्यांना व्यवस्थित निजवल. मग इतर आवरा -आवरी करून मोठा दिवा
विझवला आणि सोफ्यावर जाऊन बसली.
सोबतीला एक नाईट -लॅम्प- बस! जणू उजेडाशी काहीच घ्यायची होती आत्याला .
उजेडाने दिल तरी काय? अंधारात निदान भिंतीवरील सावल्यांची तरी सोबत होत होती!
''आ''~~ थोडस कण्हतच कुंवरजींनी कुशी
बदलण्याचा प्रयत्न केला! आपले विचार मध्येच थांबवत छोटी आत्या उठली आणि
स्विच ऑन करून सावल्यांना घालवून टाकलं.
''काय
झाल, पाणी हवय् कां ?"
''उं- हूं''
कुंवरजींनी डोळ्यांवर पापण्यांचे जाड पांघरूण घालून नाहीचा इशारा केला.
''मग झोपा
आता'' म्हणत आत्याने पुनः दिवे घालवून सावल्यांना जवळ बोलावल, जणु एखादी जिवलग
मैत्रीणच ! मग त्या मैत्रीणीच बोट धरून भूतकाळांत चक्कर मारायला आत्याला भीती वाटत
नाही! त्या भूतकाळातल सगळ स्वच्छ दिसत या अंधा-या खोलीतून!
बाबासाहेबांच्या घरांतला तो मोठा चौक
आणि तिथली नोकरा चाकरांची वर्दळ
. चौकाच्या आजू बाजूला खोल्या , त्यांच्यावरच्या मजल्यावर अजून खोल्या आणि
त्यांच्यावर गच्ची. संपूर्ण घराचा केंद्रबिंदू होता हा चौक ! एका वास्तूपंडिताने
बाबासाहेबांना सांगून ठेवल होतं की घराच्या मध्यभागी सूर्याचा उजेड नक्की यायला
हवा. याच उन्हात बसून छोटी आत्या.......... म्हणजे तेंव्हा ती छोटी आत्या
नव्हती........ नुसती छोटी बाई होती छोट्या बाईने चम्पाला हाक मारली होती वेणी
घालून द्यायला. कसे दाट आणि लांबसडक केस होते छोट्या बाईचे! कुरळे, दाट आणि
गुडघ्यांपर्यंत रूळणआरे! आजी तर कुणाच्या समोर केस मोकळे करू दोत नसे पण इतक्या
मोठ्या केसांना छोटी बाई कशी आवरणार? त्यासाठी कुण्या चम्पा, चमेली, रानो, बन्नोची
गरज लागणारच! शिवाय ते केस धूण! चोळून, माखून, उटण लावून केस धुतल्यानंतर त्यांना
वाळवायला कुणी तरी हव! आणि सुवासिक तेल लाऊन
विंचरून द्यायला पण कुणीतरी हव! बाबासाहेबांच्या घरी अशा बायांना कांय
तोटां ?
छोटी बाई
हे तर तिच लाडक नाव होत. तिच खरं नाव रूपकुंवर! नावाबद्दल शंका घ्यायला जागाच
नव्हती. तिच्यासारख रूप लावण्य
पंचक्रोशीत शोधून सापडल नसत !
शिवाय बाबासाहेबांसारख्या मोठ्या संस्थानिकांची एकुलती एक धाकटी लेक! मोठा मुलगा
लहानपणापासूनच शिकण्यासाठी परदेशी ठेवलेला!
आईविना
पोरीला वडीलांचे सगळे लाड मिळाले. तिच्या तोंडून शब्द निघायचा अवकाश , की वस्तू
तिच्यासमोर हजर
झाली पाहिजे अशी, बाबासाहेबांची आज्ञा होती. कपडे, दागिने ,अत्तर! हिंदुस्तानात मिळत नसेल तर अमेरिका, इंग्लंड, फ्रांस,कुठूनही वस्तू येऊ शकत होती. फक्त एका गोष्टीची मनाई होती पडद्याबाहेरची दुनिया रूपकुंवासाठी नव्हती. मंदिरात जायच तरी अवती- भोवती चम्पा , चमेलींचा घोळका असला पाहिजे असा बाबासाहेबांचा कडक हुकुम होता. पुरूष जातीपैकी फक्त कांही काळे कूरूप म्हतारे नोकरच पहायला मिळाले होते. इंग्रजीची ट्युशन होती तीही मेरी नामक बाईची!
झाली पाहिजे अशी, बाबासाहेबांची आज्ञा होती. कपडे, दागिने ,अत्तर! हिंदुस्तानात मिळत नसेल तर अमेरिका, इंग्लंड, फ्रांस,कुठूनही वस्तू येऊ शकत होती. फक्त एका गोष्टीची मनाई होती पडद्याबाहेरची दुनिया रूपकुंवासाठी नव्हती. मंदिरात जायच तरी अवती- भोवती चम्पा , चमेलींचा घोळका असला पाहिजे असा बाबासाहेबांचा कडक हुकुम होता. पुरूष जातीपैकी फक्त कांही काळे कूरूप म्हतारे नोकरच पहायला मिळाले होते. इंग्रजीची ट्युशन होती तीही मेरी नामक बाईची!
शिवाय
रूपकुंवारला सतत बजावलेल होत ती सर्वांपेक्षा खूप खूप श्रेष्ठ होती रूपाने ,
पैशाने, कुळाने! आणि खुप खुप पवित्र पण! इतर पुरूषांची नजर तिच्यावर पडता कामा
नये. बाबासाहेबांना भेटायला इतर पुरूष
मंडळी येत तेंव्हा बाबासाहेब तिला सांगत- "छोटी बाई, तू आता घरात जा."
रूपकुंवरने पण आयुष्यांत हाच मंत्र शिकला होता कि पुरूष जातीपासून दूर रहा . आणि
हाच मंत्र मनांत घोकणा-या मुलीला एक दिवस एका पुरूषाबरोबर शय्यासोबत करायसा सांगण्यात
आल! म्बणजे काही वेड वाकड मनात आणू नका बाबासाहेबांबद्दल- त्यांनी एखाद्या मोठ्या
जमीनदाराला किंवा आधिका-याला खूष
करण्यासाठी आपली पोरगी पाठवली अस मुळीच झाल नाही! त्या साठी गरीबांच्या मुली खूष
होत्या! त्या असताना स्वतःच्या पोरीवर ही
वेळ कशी येऊ देतील बाबासाहेब? त्यांनी रीतसर लग्न लावून दिल होत छोट्या बाईच! ते
देखील धूम धडाक्यांत -चांगला दोन महीने उत्सव साजरा करून . कांय नव्हत त्या
उत्सवात? खाण- पिण, गाण- बजावण, फटाके, शोभेचीदारू! मान-पान ! पण इतक्या धून
धडाक्यात अशी कुणीच चम्पा, चमेली नव्हती जी रूपकुंवरला लग्नाला किंवा मधुचंद्राचा
अर्थ सांगेल! कारम त्या तिला घाबरत होत्या . आतापर्यंत तिला "जो हुकुम"
करण्यांतचट ज्यांच आयुष्य गेल त्या तिला मधुचंद्राचा अर्थ कसा सांगणार? षोडशी
रूपकुंवर आतापर्यंत उत्सवमूर्ति होती. हा लग्नाचा उत्सव पण बाबासाहेबांच्या लाडाचा
नमूनाच वाटला तिला . त्या थाटात आणि तो-यांतच ती सासरी आली.
कुंवरजी पण
कुणी साधी आसामी नव्हते. पैसा अडका, जमीन जुमला, मान मरातब, शान शौकत- सगळ्याच
बाबतीत बाबासाहेबांच्या दोन अंगुळ वरच होते. उगीचच नाही त्यांना जावई करून घेतल!
ते खर दोन तरूण- तरूणींच लग्न नव्हतंच
-दोन मोठ्या खानदानांची दिलजमाई होती ती! तस कुंवरची प्रेम -प्रकरणं
बाबासाहेबांच्या कानावर होती. पण त्यात
कांय नवल? अशी ''मर्दानगी'' असलीच पाहीजे
एवढ्या मोठ्या श्रीमंताकडे! ज्याच्या
जितक्या रखेल्या , तो तितकाच मोठा मर्द! आणि जी जितकी पवित्र , तितकीच ती
खानदानी बाई! बाबासाहेबांना कुंवरजींचा जितका अभिमान होता तितकाच छोटया एकदम
पवित्र बाईचा ! होतीच मुळी त्यांची बेटी तशी एकदम पवित्र चौवीस कॅरेट सोनं !
पण
रूपकुंवरची खरी कहाणी इथुनच सुरू होते तिच्या पहिल्या रात्रीच्या कहाणीपासून! ती
रात्र जणू तिच्या रूपानेच जगमगली होती. आणि तिच्या अंगावरील सोन्याने. तिच्या लाल
दुपट्यावर ख-या सोन्याने. बेल- बुट्टी
काढलेली होती. तिच्या भांगात, केसात स्वर्णफुल होती, तर कानांत ,नाकांत, बाजुबंदावर
चमचमणारे हिरे! आणि त्यांच्या साठी आरस केलेल्या खोलीचं कायं वर्णन सांगाव? रोशिम
गालिचे, चकाचती झुंबर आणि जाई-जुईच्या हारांनी नटलेले शिसवी बिछाने. हो सर्व कौतुक
ठीक होत. पण कुंवरजींने तिला हात लावला मात्र ती जंगली घोडयाप्रमाणे फुरफुरत दूर
सरकली! कुंवरजींवर जितके वार करण शक्य झाल, तितके केले कुंवरने तिच शरीर शेवटी
भोगलच , पण नंतर तासंसास अंग धूत बसलेली रूपकुंवर तेवढीच त्यांच्या लक्षात राहिली.
माहेर
प्रमाणेच इथेही चम्पा, चमेली, रानो, बन्नो होत्या. नावं वेगळी असतील त्यांची!
त्याच आता रूपकुंवरच्या शिक्षिका झाल्या. आंघोळ घालतांना, सजवतांना, श्रृगांर
करताना त्यांनी रूपकुंवरला लग्नाच रहस्य समजावून दिल. कोषातल्या सुरवंटाच जणू
फुलपाखरू झाल. पण तो पर्यंत वेळ निघून
गेलेली होती. कुंवरजींनी कांय तो धडा घेऊन झाला होता. आता दुखावलेल्या कुंवरजींना
रिझवायला रूपकुंवर तयार होती, पण त्यांच्या मनाची पक्की गाठ मोकळी झाली नाही. उलट
हे चांगल निमित्तच झाल जुन्या प्रेमिकांकडे परत जायला, त्या निमित्ताचा कुवंरजींनी
पुरेपुर उपयोग करून घेतला.
हळूहळू दिवस पालटले. जमीनदारी संपली .संस्थान पण संपली , पण धनसंपत्ती तशीच
राहिली. कुंवरजींच्या घरांत, तशीच आमच्या घरात पण. रूपकुंवर आता आमची छोटी आत्या
होती.
छोटी
आत्या पडद्यात वाढली. पण पापा परदेशांत राहिले होते अभ्यासासाठी . त्यामुळे
आमच्यासाठी आमचे पापा खुप वेगळे होते .आम्ही को- एड कॉन्व्हेंट मधे शिकतो, जीन-पॅँट,
शर्ट घालतो, पण छोटी आत्या योणार असेल तेव्हा नाही. ती ती येणार असली की आईला खास
साफ-सफाई करावी लागते. तिच्या घरांत सुद्धा सारखी झाड-झाड आणि पूस-पूस ! कुंवरजी
बोलुनही दाखवतात ''या साफ-स्वच्छ रहाण्याच्या हट्टापायीच बिछान्यातही लांब राहते-
राहो तशीच!'' मग आत्या पण तडकून त्यांच्या रखैली विषयी काही तरी बोलते. यांच हे
भांडण आता जगजाहीर झालय. नोकरांना देखील या गप्पा चघळायला शिळ्या झाल्याहेत.
कुवरजींच्या मैत्रिणींचे किस्से इतके जगजाहीर झाले आहेत की ताईच्या लग्नांत सुद्धा
त्यांच्या मैत्रिणी लांब लांबच्या गावांतून आल्या होत्या कुणी दिल्ली कलकत्याहून ,
कुणी हैद्राबादहून तर कुणी या जयपूरमधुनच.
मग अचानक कुंवरजींचा धंदा बसला आणि त्यांच्या मैत्रिणींनी जमेल तशी त्यांची
संपत्ति गिळंकृत केली जमीन, फ्लॅट, दागिने, रोख जिला जे जमेल ते! मग पक्षाघात होऊन
कुंवरजी बीछान्याला खिळले तसे त्यांना कुणी विचारणारे पण उरले नाही!
आणि
कालपर्यंत साफ-सफाईच्या नावाने चिडचिड करणारी छोटी आत्या एकदम जादूची पुडी
खाल्ल्यासारखी शांत झाली आहे! जिला कधी
पाण्याचा एक पेला इकंडच तिकडे करावा लागला नाही कि धुळित एक बोट घालाव लागल
नाही तिने एकटीने कुंवरजींची सारी सेवा आपल्या डोक्यावर घेतली. चम्पा, चमेली कधीच
गेल्या. सर्व जायदाद विकून टाकून, एका छोट्या फ्लॅट मधे फक्त दोन नोकर बरोबर घेऊन
छोटी आत्या कुंवरजींची सोबत करते. पण कुंवरजींच्या खोलीत जायला नोकरांना पण सक्त
मनाई आहे. त्यांच सगळ एकटी तीच करणार. या
खोलीत इतर कोणी नाही फक्त घड्याळ्याची टिक-टिक
,कुंवरजींचे अस्फुट शब्द आणि त्यांचे चिडलेले, तरी लाचारी सांगणारे डोळे!
कुंवरजींनी पुन्हा कुशी बदलल्याचा प्रयत्न केला. छोटी आत्या पटकन् उठली.
पुनः एकदा भूतकाळातल्या सावल्या बाजूला सारून दिवा लावला. ''कांही हवयं का? ''
''ऊं~हो...'' कुंवरजींनी हात उचलायचा प्रयत्न केला -पण तो धपकन् खाली पडला! आत्या
उठली तिने हात उचलून नीट कमरेजवळ ठेवला. अस्फुट स्वरांत कुंवरजींनी याचना केली-
''कुणाला तरी बोलव!" आत्याला शब्द कळतात. कुंवरजींना कुणीतरी चादर बदलून
द्यायला हवी आहे, पण आत्याचा स्पर्श नको आहे- ती नजरेसमोरही नको आहे. पण आत्याने
त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केल. त्यांच्या
खालची चादर स्वतःच ओढून बाहेर काढली . ऊं हूं, ऊं हूं करत कुंवरजींनी विरोध
करण्याचा प्रयत्न केला पण आत्याने ऐकल नाही. नाक दाबून घाण झालेली चादर बदलली पण
तोंडावर असे भाव होते की ''बोलवा आता आपल्या दिल्ली कलकत्ता वाल्यांना किंवा
हैद्राबाद किंवा जयपूर वाल्यांना!'' ती सेवा करत होती पण कुंवरजींना नको असलेली!
तिला कळंत की कुंवरजींना तिची सेवा घेताना लाचारी वाटते , ग्लानी वाटते, शरम वाटते
आणि रागही येतो.
ती लाचारी
आणि रागच आता आत्यांच शस्त्र होत! तिला आठवत हेच कुंवरजी टेबलावरून तिने प्लेट
मांडली एवढ्या कारणासाठी उठून जात. जेवतांना ती समोर आली तर अपशकून झाला म्हणून
जेवण टाकून देत. पहिल्या रात्रीचा प्रकार झाला
तो ती नवखी असल्याने . पण नंतर कित्येक रात्री तिने त्यांना रिझवण्यांत
घालवल्या तरी ते बधले नाहीत, तिने सेंट ,लिपस्टिक लाऊन, झिरझिरित नाईटी घालून
केलेल्या विनवण्या पण ठोकारल्या गेल्या.त्या मेल्या रखेल्या यापेक्षा काय करत
होत्या? पण पहिल्या रात्रीच्या घटनेला कुंवरजींनी कधी क्षमा दिली नव्हती.
आता छोट्या
आत्याचे दिवस आहेत. ज्या कुंवरजींना जेवतांना ती समोर चालत नसे, त्यांना जेवण
भरवून आत्या प्रतिशोध घेऊ शकते. तिच तोंड
पहाण्यांच टाळणारे कुंवरजी आता सदा सर्वदा तीच समोर असते. कधी डोळ्याला डोळा भिडला
कि एक व्यंगात्मक हास्य आपसूकच तिच्या
ओठांवर येत जा, आता कुणाकडे जायच ते ! आणि आज तर तिने कमालच केली चादर बदलताना
कुंवरजींच्या चेह-याच चक्क चुंबन घेतलं . त्यांच्या डोळ्यातले भाव सांगतात ''शीः
दूर रहा!"
कुंवरचे
रागाने लाल झालेले आणि क्षणांत लाचारीने पाणावलेले डोळे मागतात "मला मुक्ती
दे." पण आत्याला त्यांना मुक्ती द्यायची नाही. इतक्यांत नाही. तिचा बदला
पूर्ण होईतो नाही. तिला जळत ठेवणा-या कुंवरला आता ती जळत ठेऊ शकते त्याला नको
असलेली सेवा देऊन ! बाहेर जग म्हणो-"पहा कांय हा सेवाभाव! इतक्या रखेल्या ठेवणा-या पतिची एवढी सेवा! पण
बंद खोलीत रूपकुंवरला माहीत आहे तिचा बदला छान चाललाय!
---------------------------------------------------------------------------
लीना मेहंदळे
मूळ लेखिका (हिंदी)
हंसच्या अंकातून
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें