मंगलवार, 15 नवंबर 2016

माझ्या कथासंग्रहाला नित्यलीला नाव कां?

माझ्या कथासंग्रहाला नित्यलीला नाव कां?

माझ्या या कथासंग्रहाला नित्यलीला नाव देण्याच विशेष कारण आहे. नित्यलीलाचे लेखक फणीश्वरनाथ रेणु बिहारचे एक अग्रगण्य स्वातंत्रसेनानी आणी साहित्यकार होते. नेपाळच्या कोइराला परिवाराशी घनिष्ठ संबंध असल्याने, विराटनगर मधे त्यांच्या शाळेत व घरात राहून पूर्ण केलेले माध्यमिक शिक्षण, तिथून पुढील शिक्षणासाठी बनारस, १९४२ मधे चले जाव आंदोलनात सहभाग आणि कैद, मार्च १९४७ पासून बिहार आणि नेपाळच्या जूट-मिल मजूरांचे संगठन आणि नेपाळच्या राणाशाही विरुद्ध विश्वेश्वर प्रसाद कोइराला यांना सर्वतोपरी दिलेली साथ, बिहार मधून नेपाळच्या राणाशाही विरुद्ध लिहिलेले लेख आणि विराटनगर मधून क्रांतिज्योत पेटवण्यासाठी केलेली रेडियो ट्रान्समिशन्स  या सर्वांमुळे नेपाळ क्रान्तिचे वॉल्टेयर ही संज्ञा मिळालेली. पुढे १९५१ मधे नेपाळची राणाशाही संपून लोकतंत्राची स्थापना झाली- एक पर्व संपले. यानंतर भरधाव केलेल साहित्य लेखन, पद्मश्री पुरस्कार, त्यांच्या कथेवर तिसरी कसम या सिनेमाची निर्मिती, आकाशवाणी वर स्टेशन डायरेक्टर म्हणून नियुक्ति, नंतर पद्मश्री परत करणे. १९७४ मधे पुनः जयप्रकाश नारायण यांच्या “छात्र” आंदोलनात सामिल- पुनः कैद, लोकसभा निवडणुकीत जनता पक्षाचा विजय- आणि प्रधानमंत्र्यांचा “चुनाव” होण्याच्या दिवशी सकाळी ऑपरेशन थियेटर मधे गेले, ते परतलेच नाहीत- १५/२० दिवसांच्या कोम्यामधे त्यांचे निधन झाले.

लेखनाच्या काळातले त्यांचे गाजलेले लेख म्हणजेच “रिपोर्ताज”. विभिन्न सामाजिक- राजनैतिक घटनांचे केलेले चित्रण. त्यांत अस्सल जिवंतपणा असायचा. कथा कादंबऱ्यांमधेही तो उतरला. इतकेच नव्हे तर त्यांच्या आसपास वावरणारी अनेकानेक पात्र त्यांच्या साहित्यात इतकी हुबेहुब उतरली आहेत की कित्येक वर्ष त्यांचे गांवकरी, जिल्हाकरी या- त्या व्यक्तींकडे बोट दाखवून म्हणू शकत- रेणुंच्या अमक्या कृतीतला अमका माणूस ना- तो हा!

अशा मातीशी घट्ट नात असलेल्या आवडत्या लेखकाला श्रद्धांजली म्हणून माझ्या या पहिल्यावहिल्या अनुवादित कथासंग्रहाचे नांव नित्यलीला! होती. फणीश्वरना रेणु यांनी हिंदीमधे कांही अत्यंत उत्कट आणि तरल साहित्य रचना केली आहे. माझ्या आवडीच्या लेखकाची मला भारी आवडलेली कथा म्हणजे नित्यलीला!

या संग्रहातील ती एक राणी ही स्त्रीच्या स्वाभिमानाच्या संघर्षाची कथा आहे.
डोळे माझे मिटता मिटता ही पुनः एका वेगळ्या वळणाची कथा आहे. धर्म वेगळे असोत, त्यांची भांडण असोत, पण एका धर्मातील चांगली व्यक्ती ही दुसऱ्या धर्माच्या चांगल्या व्यक्तीची शत्रु नसून कुठल्याही धर्मातील वाईट माणसच सर्व चांगल्या माणसांचे शत्रु असतात. थोड्या हलक्या फुलक्या वळणाने जाणारी ही कथा!
बायकाच त्या ही सुधा अरोरा यांची कथा-- कांहीही न बोलता सगळ सांगून जातो.
कोण मी कोण मी ही देखील एक फॅन्टसी -- सरकारी कारभारावर उजेड टाकणारी.
सागर- साद ही कथा तिसऱ्या पिढीच नात सांगणारी.

या सर्व कथांच एक सूत्र सांगताच येणार नाही आणि माझ्या मते कथा संग्रहातल्या सर्व कथा एक सारख्या, एकच विषय सूत्र घेऊन असूच नयेत. त्यांच्यात वैविध्य आणि वैचित्र्य असले पाहिजे

पण एक समान सूत्र सांगता येईल की त्या मला आवडल्या आणि त्यामधील वातावरण मराठी कथांच्या वातावरणापेक्षा इतक वेगळ आहे की मराठी वाचकाला यातला नवेपणा निश्चित आवडेल.

या संग्रहातील कथा वेळोवेळी अंतर्नाद, मिळून साऱ्याजणी, सत्याग्रही विचारधारा, पालकनीती व गांवकरी दैनिकामध्ये छापून आलेल्या आहेत. तसेच या पैकी बहुतेक कथा मला हिंदी मधील प्रथितयश मासिक हंसमधून वाचायला मिळाल्या, हे या ठिकाणी आवर्जून नमूद करावेसे वाटते.
----------------------------------------------------------------------