सोमवार, 12 दिसंबर 2016

तो काळा शुक्रवार.

      तो काळा शुक्रवार.

       मुंबई, १२ मार्च १९९३. वार शुक्रवार..इतर सगळया दिवसांसारखाच हाही एक दिवस. तशीच रोजच्यासारखीच सकाळ.
       समुद्रात शांत गंभीर लाटा आणि वर नितळ आकाश. इथे सूर्य इतर शहरांच्या मानाने थोडा उशिराच उगवतो आणि त्याची आम्हाला आता सवय झालेली आहे, पण म्हणून लोकांचे व्यव्हार उशिरा सुरू होत नाहीत.
         रोजच्याच नियमीतपणाने बरोबर सहा चाळीसला दूधवाल्याने दूधाच्या बाटल्या दारात आणून ठेवल्या .दहा मिनीटांनी दाराच्या फटीतून पेपर सरकवल्याचा सवयीचा आवाज  आला .आधी हिंदी ,मग इंग्लिश  हिंदी पेपर कमी पानांचे असतात .पटकन आत येतात .इंग्लिश पेपर फटीतून आत सरकावयाला जरा त्रास पडतो .
      मी फक्त आवाजांची नोंद घेत होते .सकाळी पहिले काम म्हणजे प्रियाला तयार करून शाळेत पाठविणे .ती गेल्यावर मगच मला कुठे पेपर उचलायला  मिळणार.
        गेले तीन महिने शहरात दंगलीच्याच बातम्या सुरू आहेत. आता-आता कुठे जरा शांत झाल्यासारख वाटतय .शोकसभा आणि निरनिराळया राजकिय पक्षांच्या बैठका ,एकमेकांवर आरोप- प्रत्यारोप आता थंडावल्यासारखे दिसतात.पंतप्रधान व इतर मंत्र्यांनी आपले विदेश दौरे ,नवीन योजनांचे उदघाटन ,दिवंगत नेत्यांच्या समाधीवर पुष्पचक्र वाहणे वगैरे कार्यक्रम पुन्हा सुरू केलेत .आगदी लक्ष्मणने सुद्धा .कार्टूनसाठी पुन्हा वेगळे विषय घ्यायला सुरवात केली .बजेटवरील टिका टिपन्नी पण शेवटच्या पानावर रवाना झाल्या  आहेत .एकूण देशाच्या गंभीर समस्या विरून सामान्य माणुस पुन्हा  स्वतःच्या क्षुल्लक समस्यांकडे वळू लागला आहे.     
      पेपर संपवत असतानाच घंटी वाजली .दार उघडल तर समोर  एक ओळखीचा चेहरा होता .कुठे बरं पाहिल आहे याला.१
     तेवढयात त्याने डोक्याकडे नेऊन सलाम केला .म्हणाला साहेब जाताना सांगून गेले होते की ,आज खरी गाडी लागेल ,पण जाधव सुट्टीवर आहे म्हणून पिंटो साहेबांनी मलाच घरी पाठवलं.
       अरे,मीराज तू १ किती दिवसांनी आलास ,त्याला आधी न ओळखल्याच्या खुणा माझ्या चेह-यावर कुठेही दिसू  नयेत म्हणून मी जास्तच आपुलकीने विचारले.
      आज मी त्याला जवळजवळ दोन वर्षांनी पाहत होते .घरच्या गाडीवर डयुटीसाठी तो अधूनमधून यायचा .मी त्याला त्याच्या शिस्तीत ठेवलेल्या दाढी-मिशीवरून ओळखायची .आज दाढी -मिशी काढून तो किती विचित्र दिसत होता... सगळं व्यक्तीमत्वच हरवल्यासारख .
          ही कोणती नवीन स्टाइल काढलीस १ बरा नाही दिसत तु तुझ्या कुर्रेबाज दाढी -मिशांशिवाय मी तर तुला कधीच ओळखल नसतं .
      मीराज दिनवाणेपाने हसला .ते हसू होत की आक्रोश तेच कळलं नाही .म्हणाला ,काय करू मॅडम दाढी मिशात काय पण मी तर नाव बदलायला फम तयार आहे. नावात काय ठेवलय १ त्या नावावर काही दोन वेळचं पोट भरत नाही .
     त्याने खाली  घातलेली मान वर उचलून  माझ्याकडे  पाहिल ,त्याच्या  डोळ्यांच्या ओल्या कडा पाहून माझी मलाच लाज वाटली .
     या दाढीमुळेच माझा शेजारी पीटर मारला गेला  .तो काय मुसलमान होता का१ सांगा मला आणि आपल्या कंपनीच्या भसीन साहेबांबद्दल तुम्ही ऐकलेच असेल .दंगलखोरांनी त्या दिवशी कारमध्ये जाळलचं असत ...नशीब गाडीत ड्रायव्हिंग लायसेन्स आणि फोटो होता ...नाव दाखवून कशीबशी सुटका करून घेतली .घरी गेल्याबरोबर दाढी उतरवून टाकली .मी पण मग हाच विचार केला. शिर सलामत तर पगडी पचास  .दाढी मिशांचा मोह सोडला ,पण खरंच सांगतो मॅडम आरशात पाहायची हिम्मत होत नाही .वाटत ,भर बाजारात कुणी तरी सगळे कपडे उतरून घेतले आहेत.
          मीराजच्या या वाक्यावरून मला लहानपणी ...आईकडून ऐकलेली एक घटना आठवली .माझे दोन्ही आजोबा चांगले मित्र होते .दोघे सरदारजी ,पण दादाजींनी (वडिलांच्या वडिलांनी) केस व दाढी ठेवली नव्हती .नाना (आईचे वडील ) कधी कामावर उशीरा पोहचले की म्हणत ...अरे तो आज बसून आपली पगडी जास्त रूबाबदार कशी दिसेल  याचा शोध घेत असेल.
     आणि हे खरचं होतं .नानांना लांब केसांचा व कडक इस्त्रीच्या पगडीचा खुपच अभिमान असायचा .त्यांचा रविवार केस धूण्याचा कार्यक्रम पण पाहण्यासारखा असायचा .संबंध दिवस त्यातच निधून जात असे .दादाजींनी चिडवले तर म्हणत ... अरे हा शेपूट तुटलेला कोल्हा पाहा ,मलापण आपल्यासारखा  भुंडा करायला बघतो आहे ,पण मी अडकणार नाही बच्चमजी तुमच्या जाळयात अरे दाढी आणि पगडी शिवाय कोणी माणूस होतो का१ सगळे दाढी घोटलेले चेहरे पाहा ...सारखेच दिसतात .त्यांच्या बायका कशा त्यांना  ओळखत असतील १ आमच्याकडे तर पगडीच्या रंगावरून बायको तत्काळ ओळखुन काढते की तिचा नवरा कोणता आहे .या पुढचा सवाल जवाब आई सांगत असे .असो .
     एकदा नानांना निमोनिया झाला .महिनाभर अंघोळ बंद  लांब केसात उवा झाल्या .त्यांचा त्रास होऊ लागला .लोकांनी सांगिलत ...केस कापून टाका निदान छोटे  तरी करा .पगडीच्या आत कोण पाहायला येतय. तरीही त्यांनी केसांना कात्री लागू दिली नव्हती .
         पण तेच नाना फाळणीकाळच्या दंगलीच्या सुमारास एक दिवस फॅक्टरितून घरी परतले ते दाढी पगडी शिवाय ,घरातल वातावरण सुन्न झाल .आजीने ओक्साबोक्शी रडायला सुरवात केली  ,नक्कीच सरदारजींच्या डोक्यावर काही परिणाम झालाय .कुणी मेल्या वै-याने भुताटकी केली .

        नाना हसून म्हणाले ...अगं  ,मी मेलो असतो तर शरीराबरोबर माझी दाढी आणि केस जळू दिलेच असतेस१ आज माझा दोस्त जीवंत  असता तर त्याला माझ्या निर्णयाचा फार आनंद झाला असता .
        तरी घरात सगळे लोक चूप आजी  अजूनही रडतच होती . रडता-रडताच म्हणाली ...हाय दारजी ,तुम्हाला पाहून वाटतय की बर बाजारात तुमचे कपडे उतरवून घेतले आहेत .
         आज चाळीस वर्षांनी तेच वाक्य पुन्हा मीराजच्या तोंडून ऐकताना मी कळवळले कसंबसं हसून म्हटल ...होईल सगळं ठीक हळूहळू .
        पाहू या .त्याने अचानक दोन्ही हात आभाळाकडे उचलले ...मी तर हीच दूआ मागतो .
        पण त्याच्या आवाजात हताशपणाच जास्ता होता भरोसा कमी मी बाहेरच्या कामांची यादी करून ठेवली होती  जुन्या घराशेजारचा युनीयन बँकेचा अकाऊंट बंद  करायचा होता .वलर्ड ट्रेड सेंटरमध्ये गुर्जरीचा शेल लागला होता .क्रॉफर्ड  मार्केटमधून फळ विकत घ्यायची होती आणि वरळीला पासपोर्ट ऑफिसात जाऊन पासपोर्टच रिन्यु्ल झाले की नाही ती चौकशीपण करायची होती .प्रिया तीन वाजता घरी येणार एक किल्ली असते तिच्याजवळ ,पण तरीही ती यायच्या आधी आपल घरी आलेल बर ,शिवाय दुपारच्या वेळी ट्रॅफिक जाममध्ये अडकायला होणार नाही .म्हणून वेळेचीही बचत होईल.
       तयारी करून मी बाहेर पडले .आधी  हुतात्मा चौकात जायचे म्हणजे पाऊण तासाची निश्चिंती ,मी चश्मा घरी विसरलेली .त्यामुळे गाडीत काही वाचाव म्हटल तर त्याची सोय नाही , रस्त्यावरचे साईनबोर्ड पाहत होते .
      इतक्याच मिराजने विचारल ...मला सहा वाजायच्या आत सोडणार का१ आज माझा सतराव्या दिवसाचा रोजा चाळू आहे.
     सहा कुठे चारच्या आतच सोडीन तुला आणि तु यावेळी सगळे रोजे ठेवलेस वाटतं१
      मला आठवल ...मागे एकदा त्याने आपल पहिले दोनच दिवस आणि शेवटी एक दिवस रोजा ठेवतो एसं सांगितल होत .नाहीतर मुंबईच्या मार्चच्या उन्हाळयात पाण्याचा  थेंबही  न पिता रहायचं म्हणजे कोण वैताग .
       हो .अली नवाज बरा व्हावा म्हणून मी या वर्षी सर्व रोजे ठेवणार आहे.नवाजच्या आईने पण रोजे ठेवले आहेत. तो बराच सेल्फ कॉन्शन झाला होता .
    नवाज आता कसा आहे १ मी विचारल.
     खरं तर हे कितीतरी आधीच विचारायला पाहिजे होत .मी इतका वेळ विसरलेच होते .
    मीराज भारतनगर मध्ये राहतो .तिथे सर्वच धर्माची सरमिसळ झालेली मोठी झोपडपट्टी आहे ,पण लोकांमध्ये एकोपा आहे. एकमेकांच्या उत्सवात भाग घेतात.६डिसेंबर दंगे भडकले तेंव्हा जवळच्या खेरवाडी आणि बेहरामपाडामध्ये दंगली उसळल्या भारतनगर तस शांतच होत.
      पण शेजारच्या वस्तीतल्या आगी आणि दंगलीचीं झळ शेवटी तेथेही पोचलीच .खरेवाडी आणि बेहरामपाड्यांतून जखमी अवस्थेत लपत- छपत लोक भारतनगरमध्ये आल-याला आले आणि इथल्या स्त्रियांनी पण जीवावर उदार होऊन त्यांना आश्रय दिला . दहशतीच्या वातावरणाखाली भातरनगर पण होते  .दिवसाढवळ्या बंदुकीच्या गोळया आणि हातबाँम्बचे घुमणारे आवाज आणि त्यापेक्षाही भयानक  दहशतींचे मौन ...या सगळ्यांचा छोटा अली नवाजावर इतका परिणाम झाला की तीन वर्षाच ते मुल आवाजच हरवून बसल .आता दिवसभर आईच्या अंगाला चिटकून असतो. ऑफिसात ही केस सगळ्यांना माहीत आहे.
      मीराज सांगत होता ...गेल्या आठवडयात त्याने गढवालकडल्या कोणत्यातरी मांत्रिक ओझ्याला दाखवलं होत .त्याने काही तरी  छा -छू केल्यानंतर  आता निदान नवाजची नजर तरी स्थिर झाली आहे, नाहीतरी आधी त्याच्या डेळ्याच्या बाहुल्या कायम भेदरलेल्या अवस्थेत इकडून तिकडे फिरत राहायच्या .आता तो तोंड उघडतो ...जणू काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करीत असावा ..मिराजच्या आवाजात आशा अगदी दाटून आली होती .

      पण मीराज ,या ओझा -बिझाच्याने  काय होणार१ जाधवकडे मी तुझ्यासाठी चांगल्या सायकियाट्रिस्टचा पत्ता दिला होता .मग१
     मी तर घेऊन जातच होतो मॅडम ,पण आई जरा जुन्या काळातली आहे .हा ओझा तिच्या गावाकडल्या ओळखीतून माहित झाला .त्यालाच दाखवायचं असं आई म्हणाली .आता आईच एवढं ऐकाव लागत .मीराज त्याची अडचण सांगत होता.
      पण मला वाचत त्याची खरी अडचण पैशांची होती.
       बाहेर भर दुपारी सुद्धा गर्दी कमी नव्हतीच .मुंबईत हल्ली विदेशी गाड्यांचा सुळसुळाट झाला आहे आणि फुटपाथवर इतर राज्यांतून आलेल्या लोकांच्या लोंढ्यांचा.
         समोरच रेमंड्सचा एक मोठा साईनबोर्ड होता ...वी पुट द इंटीग्रेटेड  फायबर्स टुगेदर .
       गेल्या तीन महिन्यात या शहरात तीन मोठया दमगली झाल्या .लगेच स्वतःच्या जाहिरातींसाठी त्याचा  वापर करायची संधी लहान -मोठया कित्येक प्रतिष्ठित उद्योगांनी घेतली ,अमूलपासून रेमंड्सपर्यत सर्व हेच करत होते .काही ठिकाणी हिंदू-मुस्लीम  
भाई-भाई ची पोस्टर्स लावली होती .एका चौकात सुंदर पांढ-या सॅटिनवर सोनेरी अक्षरात लिहलेल होत ...हम एक थे  ,हम एक है,हम एक ही रहेंगे ।
    दंगलीत जी मुल मारली गेली ,त्यांच्या आई-बापांना अशा दिखाऊ बोधवाक्यांचा काय उपयोग होत असेल १
      एक वाजायच्या आधीच जरा आम्ही युनियन बँकेत पोहचलो होतो .मी अकाऊंट बंद करून गाडीजवळ शहाळयाचे पाणी पीत उभी होते.
     एवढयात कानांना सुन्न करून टाकणार विस्फोट ऐकू आला .पायाखालची जमीन भूकंप झाल्यासारखीच हलत्येय असं वाटतयं ,तोच कुठेतरी इमारत ढासळली .काचा फुटल्याचे आवाज ऐकू आले ,नक्की कोणतीतरी फार मोठी दुर्घटना झाली होती .रस्त्यावर पळापळ सुरू झाली  ,समोरच्या एका उंच इमारतीतून आगीचे लोळ बाहेर येऊ लागले .काळा धूर वेगाने आकाशाकडे झेप घेत होता .
     मला तिथुन पळायचे होते पण माझे शरीर जड झाले आणि पाय जणू कुणीतरी दोरखंडाने बांधून ठेवले होते .मी निःस्तब्ध तशीच उभी होते.
     मॅडम चला लवकर अगदी लांबून आल्यासारखा कुणाचातरी आवाज आला .पण मीराज
 तर अगदी जवळ होता .गाडी ही इथे आहे लवकर चला .
    तरीही माझे पाय उचलेनात .त्याने मला दंडाला धरून जवळ जवळ ढकललेच गाडीकडे मी यंत्रवत् गाडीत जाऊन बसले .
      आम्ही नमाज पढत असताना हा विस्फोट ऐकला .कुणी म्हणतात शेअर मार्केटमध्ये बॉम्बल्फोट झाला आहे. तिकडला ट्रॅफिक अडवतील बहूतेक .त्याआधी आपण इथुन निघायला पाहीजे मीराजचा आवाज कापरा झाला होता .मी स्वतः काही जणांना रक्ताळलेल्या ,जखमी अवस्थेत पाहिलं आहे.खूप लोक जखमी झाले आसावेत.
      तो एकीकडे बोलत होता आणि दुसरीकडे गर्दी पांगविण्यासाठी सतत हॉर्न वाजवत होता मग त्यांना कुणीतरी दवाखान्यात पोचवायला नको का१ नाहीतरी नाहक मरतील बिचारे ...मी.
     काय बोलताय मॅडम १तुम्ही नसत्यात इथे ,तर मी नेलही असत ,पण आत्ता आधी तुम्हाला इथुन बाहेर  पोचवणे हीच माझी पहिली जबाबदारी आहे. तुम्ही त्या जखमींच्या लफडयात अजिबात पडू नका .
       गर्दी कुठेही ,कशीही जात होती ट्रॅफिक सिग्नलची परवा न करताच गाडया आणि लोक हवे तसे रस्ते क्रॉसकरत होते .मी मागे वळून पाहिल .आकाशात धूराचे लोट अजून वर चढतच होते.
     एव्हाना समोरून फायरब्रिगेड आणि पोलिसगाडया पण वेगाने योऊ लागल्या होत्या
      आता  काय वल्ड ट्रेड सेंटरला चलू१
 नको  राहू दे
      या वातावरणात मी काय गुर्जरी सेल पाहणार होते१ त्या विचाराचीच मला शिसारी आली.
     मग क्रॉफर्ड  मार्केटला घेऊ१
   चालेल मी म्हटल आणि स्वतःला ढिलं सोडलं.
    घरून निघालेच आहे तर काही काम तरी पुर्ण करू या .खरं हे चुकतय असही वाटत होत .इतकी माणस आपल्या समोर जखमी झाली ...त्यांना कोणत्या तरी अज्ञात देवदूतांच्या भरवशावर सोडून आपण त्या जागेवरून पळ काढत आहोत ,याची शरम वाटत होती.
      थोडं पुढ गेल्यावर समजल उजवाकडचे सर्व रस्ते बंद केले आहेत क्रॉफर्ड मार्केटला जायचं असेल तर पुर्ण फिरून जावे लागेल .
     राहू दे मग ,ते क्रॉफर्ड मार्केटचे काम जाऊ दे पासपोर्टचे काम मात्र महत्वाच आहे, तेवढं संपवू आणि घरी जाऊ , ठीक आहे ना १
     पुढे लाल सिग्नलवर आमची गाडी थांवली .गाड्यांची मोठी रांग लागली होती .एकमेकांकडे माहितीची देवाण -घेवाण सुरू झाली .शेअर बाजारात मोठा बॉम्बस्फोट झाल्याची बातमी वा-यासारखी पसरली होती .शेजारच्या रांगेतील एअर -कंडिशन्ड गाडीमधून एका चश्मेवाल्या म्हता-याला ड्रायव्हरने काच खाली केली .डेक बाहेर काढून तो बोलला  ...हो सरकार अगदीच नादान आहे .गेल्या तीन महीन्यात हे तीनदा सिद्ध झालेच आहे .एवढा वाईट प्रसंग आयुष्यात कधी पाहीला नाही .आता म्हतारपणी काय काय पहाव लागणार आहे १...वाटतं त्याला विचाराव अरे ,तु आहेस कुठे लपलेला १ तो आकाशाकडे बघून हातवारे करत होता.
      कुणी म्हणतात ...दीड दोनशे लोक मेले .खुप नुकसान झाल .आता जे मेले त्यांचा काय दोष होता १मीराजने मला माहीती पुरवली .
       दोष कुणाचा बाबा आपलाच ...ते नेते आपल्याला पटावरच्या सोंगट्यांसारख वापरतात.आपणचं मुर्ख .आपण राजकारणात घूसल पाहीजे .ते आज त्यांच्या खुर्चीसाठी आम्हाला आपसात लढवतात आणि आमचे जीव घेतात ,अरे पाप्यांनो ,का घेता निरपराध्यांचे प्राण १... तीस वर्षे या शहरात काढली ,पण आता  हे शहर राहण्याच्या लायकीचे राहिलेले नाही .त्या म्हता-या ड्रायव्हरच्या मनात किती काळचा आक्रोश कोंदलेला असेल १
       इतका जबरदस्त बॉम्ब फुटला आहे की ,लढाईच्या मैदानावर काय फुटेल असं देशात उत्पात घडवून आणि नुकसान करून  कोणाला काय मिळत १ कोण आहेत हे लोक १ काय हवय त्यांना काही समजत नाही ...मागच्या गाडीचा ड्रायव्हर हे सळ ओरडून वोलत होता .
        मला वाटायच दंग्यात फक्त  गरीव लोक मरतात .ज्यांना दोन वेळची भाकरीही मिळत नाही ,त्यांचा जीव घेतात ,पण आता वाटतकी मोठया-मोठया बँका आणि एअरकंडिशन्ड ऑफिसमधल्या लोकांच्या जीवनाचे मोलही तेवढेच क्षुल्लक आहे .मीराज म्हणाला .
     मी तर या शहराला रामराम ठोकून सरळ गावी निघून जाणार आहे .पोटाला एकच वेळच मिळेल खर ,पण रात्री शांत
 झोप तरी मिळेल .शेजारचा म्हतारा ड्रायव्हर पुन्हा म्हणाला.
     
       मीराज त्याच्या कडे  पाहून पुसटच हसला ,पण त्याचा स्वतःचा चेहरा केविलवाणा झाला होता .जणू तो मनात म्हणत असावा ...जीना यहाँ मरना यहाँ...
    मीराजचा म्हतारा बाप ,जो आधी आमच्याच कंपनीत ड्रायव्हर होता ,आता  नुकताच आजमगढमधल्या आपल्या गावी परत गेला होता .तो मीराजला पण चल म्हणत होता .त्याच्या झोपडपट्टीतले कितीतरी शेजारी गावी निघून गेले होते ,पण मीराज गेला नव्हता ,तो म्हणायचा मरण यायचच असेल तर त्यासाठी दंगली कशासाठी पाहीजेत १ घर बसल्याबसल्या ,गाडीत ड्रायव्हिंग करताना ,कुठेही मरण य़ेऊ शकत .गावात पूर ,दूष्काळ ,भुकंप यांनी पण किती माणसे मरतात .मग मरणाला भिऊन काय घर सो़डून जायचं१
      या शहराच्या रेश्मी जाळयाने त्यांच्या सारख्या लाखो मजूर कामगारांना अडकवून ठेवल होत  जीवनाच पहिल तत्वज्ञान हे दोन वेळा जेवण मिळवण्याच्या धडपडी संबंधीतच असत हे शहर दंगलखोर असेल ,पण पोटाला तेच देत ना.
    सर्व रस्ताभर सिग्नलवर गाडया थांबल्या की हीच चर्चा त्या सर्व अपरिचितांच्या तोंडून ऐकायला मिळत होती .दूरवर सिग्नल हिरवा झाला ,तशी मीराजने घाईने समोरच्या बसच्या उजव्या बाजूने गाडी घेण्यासाठी स्टिअरिंग फिरवल.
           पण मी त्याला अडवलं .राहू दे  मीराज ,एवढी घाई नाही आज आपल्याला .लेन सोडू नकोस .सगळयांनाच पुढे जायचयं .अशा घाईने उलट ट्रॉफिक जाम जास्त वाढेल .
       बस पुढे निघून गेली .तेवढयात आम्हाला मात्र लाल सिग्नल मिळाला .आम्ही मागे थांवलो .सेंच्युरी बाजाराच्या सिग्नलपाशी .
       वैलैगुन मिराज काहीतरी  बोलणार एवढयात पुन्हा जबरदस्त स्फोट ऐकला .हा आवाज आणि चाकाखालील जमीनाचा थरथराट युद्धभूमीवर पॅटन् टॅंकचा स्फोट व्हावा ,तसाच होता .
     समोरच्या रस्त्यावर एका टोकापासुन दुस-या टोकापर्यत आगीच्या ज्वाळा भडकल्या होत्या .गाडयांचे मोठाले पत्र्यांचे तुकडे आणि रॉड्स उंच उडून इतस्ततः विखरले होते . त्यांच्या बरोबर  मानवी देहांचे  अवयव पण धूरांच्या लोटांवर तरंगत होते .  तीन चार इमारतींच्या बाल्कनीज तुटून रस्त्यावर सिमेंट -विटांचा खच पडू लागला होता .मृत्युच भयानक तांडव सुरू होतं .लोकांची पळापळी पुन्हा सुरू झाली .
      मीराज ,पटकन बाहेर चल ,इथुन नीघ .एवढंच मी बोलल्याचं मला आठवतं .पाश्चात्य सिनेमात पडद्यावर असले दृश्य पाहणे आणि प्रत्यक्ष पाहणे यात किती फरक होता १ प्रत्यक्ष जीवन आणि मृत्युच्या फरकाइतकाच .
       मी पुन्हा डोळे उघ़डून पाहिले तेव्हा गाडी एका सुरक्षीत रस्त्यावर होती .इथे आकाश अजूनही स्वच्छ  नीळच होत ,पण इतरत्र पसरलेल्या विनाशांचा प्रभाव पसरायला सुरवात झाली होती .दुकानांची शटर्स धडाधड बंद होत होती .लोकांना घर गाठण महत्तवाच झाल होत .गर्दी वाढत होती .समोरचा आमचा नेहमीचा रस्ता व डावीकडील रस्ता बंद केलेला होता .आम्हाला उलट्या दिशेने जाण्याखेरीज गत्यंतर नव्हतं .
       हळूहळू आमची गाडी तुळशीपाईप रोडवर आली .हाच एक रस्ता चालु होता. गाडया मुंगीच्या गतीने पुढे सरकत होत्या .मी घडयाळयाकडे  पाहिलं... साडेतीन वाजले होते मीराजला डाव्या कडेला गाडी थांबवायला सांगून मी उतरले .वेडयासारखी या दुकानातून त्या दुकानात शोध घेऊ लागले ,वाटलकी कुठुनतरी घरी फोन करावा .
       पण खुप ठिकाणी फोन नव्हते आणि जिथे होते ते चालेनासे झाले होते .शेवटी मी नाद सोडला.
     पुन्हा गाड्यांच्या रांगेत सामील होऊन आम्ही माटुंग्याला पोचलो. तो वातावरण आणखी बदलत होते. कोप-यावरचं इराणी रेस्टॉरंट तोडण्यात आलं होत.थोडया अंतरावर एक म्हतारा फळवाला तुटक्या पेट्यांमधे रस्त्यावर पडलेली फळे वेचायचा प्रयत्न करीत होता.
     मॅडम ,मला याचीच भीती वाटत होती .शहरात पुन्हा दंगे भडकायला सुरवात झालेली दिसते .आपण खूप आधीच घरी परतायला हवं होत .पण मी विचार केला ,आज  तुमच एकही काम होत नाहीये ....मीराजच्या आवाजात असाहाय्ता होती .
      समोर रस्त्यावर माणसं दिसण आता बंद झाल होत ,ट्रॉफिक पोलिसच्या निर्देशाप्रमाणे आम्ही डाव्या उजव्या गल्ल्यांत एखाद्या चक्रीवादळात गुरफटल्याप्रमाणे जात होते .समोरच सुरक्षेच्या दृष्टीने रस्त्यावरील बायका -मुलांना  एका पोलिस व्हॅन मध्ये बसवून घेतल होत .
       आमची गाडी एका गल्लीत शिरली तेव्हा दुरून आम्हाला दिसल ...वीस -पंचवीस तरूणांचा एक घोळका लाठया आणि रॉड फिरवत रस्त्याच्या दुस-या टोकालाजात होता .आकाशआत मुंबीच्या मल्टीस्टोरीड इमारती ,तर खाली जमीनीवर मात्र हिंसा आणि देव्षाची आग डोळ्यांत  घेऊन फिरणार युवकांचा घोळका ,हा प्रचंड विरोधाभास होता. विज्ञानाची प्रगती आज कुठपर्यत पोहचली आहे, पण ,लाठी-काठी ,भाले-बर्चीवाले आदिम प्रवृत्ती मात्र सुटलेली नाही .
      पण त्या क्षणी मागे पडळेल जळतं शहर आणि मरणोन्मुख लोक यांच्याशी माझं देण -घेण तुटल होत. त्या क्षणाला पहिला विचार आणि पहिल कर्तव्य होत... स्वतःचा जीव वाचवणं ,काही सेकंदाच्या अवधीने जीव वाचवण्याची ही दुसरी वेळ होती ,पण कदाचीत पुढच्या गल्लीतच काळ लपून आमची वाट पहात असेल .आज मी घरी पोहचणार आहे का१
     मीराजच्या मनातही कदाचीत हेच विचार असावेत ,घरी बेबी तुमची वाट पहात असेल त्यालाही डोळयासमोर अली नवाज दिसत असावा.
     मला नानाजी आठवले .लाहोरच्या सत्तेचाळीसच्या दंगलीच्या आठवणी ते कधी-कधी सांगत असत ,अशा दंग्यांमध्ये माणूस आंधळा ,बहिरा ,संवेदनाहिन होऊन जातो .शेजारी ही सगळी नाती विसरून फक्त धर्मांधतेचा एकच वेडेपणा डोक्यात उरतो .लाहोरलाही त्या काळात असचं वेडेपण पसरलेल होत .आजोबांचे एक मित्र रोज लॉरेन्स गार्डनमध्ये फिरायला जात .त्या दिवशी  घरच्यांनी सांगितलं ...आज जाऊ नका .आज  गावात वातावरण ठीक नाही,पण ते अजातशत्रू वृत्तीचे होते .म्हणाले ,अरे सगळे माझे बालपणचे यार -दोस्त आहेत .मला काय त्यांची भीती १  सोटा उचलला आणि गेले बागेकडे ,पुन्हा परत आले नाही आले. प्रेत पण नाही मिळालं त्यांच .आजोबांचे मेहूणे असेच गेले .सकाळी अनारकली बाजारामधून दूध आणायला निघाले होते. मला तर या शहरातली लहान-लहान मुल पण ओळखतात,मला मारून कुणाला काय मिळणार१ पण त्यांची गफलत होती.
  
        कितीक घटना आज मी  पण घरी पोचले नाही तर १
     मला माझ्या नव-याचे शब्द ऐकू आले ...यु नो आय लॉस्ट माय वाईफ इन बॉम्बे ,ऑन ए ब्लॅक फ्रायडे...
     आणि अली नवाज पण म्हणेल ...जुम्माच्या दिवशी माझे अब्बा ...
          आपण गाडी सोडून कुठेतरी आत थांबूयाका १ मीराजने विचारले .सगळी गल्ली पुढे मोकळीच होती .
    एखाद्या गेटच्या आत घेऊन थांबाव .पण डाव्या -उजव्या बाजूच्या इमारतीची दारं बंद होऊ लागली होती .थोड पुढे एक गेट उघड मिळाल तशी मीराजने गाडी आत घातली .तिथे पार्क केलेल्या गाडयांच्या काचा फूटलेल्या होत्या .कुठल्यातरी इलेक्ट्रॉनिक कंपनीचे ते ऑफिस होते. आत बरीच गर्दी होती .त्या ऑफिसचा स्टाफ माहीती देत होता हा  मुंबईतला अती  सेन्सिटिव्ह एरिया होता .दोन्ही बाजूंनी  दोन धर्मांचे लोक राहतात .दंग्यांची सुरवात बहूधा इथुनच  होत असे .आमच्यासारख्याच काही लोकांनी इथे आसरा घेतलेला होता .त्यामुळे बरीच गर्दी होती.
      पुन्हा तीच चर्चा सुरू झाली ...हे मुंबई शहर आता राहण्याच्या लायकीचं उरलं नाही.
      त्यांचे पॉलिटिक्स होते. आमचा जीव जातो.
     इतके  पॉवरफूल बॉम्बस्फोट भारतातील कोणतीच राजकीय पाटिल करू शकत नाही यात नक्की विदेशी हात आहे.
      सामान्य माणूस दोन्हींकडून मारला जातो .विदेशात बॉम्बने मरताहेत तर देशी माणसं लाठया-काठ्यांनी.
    सकाळी घरून निघताच भरोसाच नसतो की रात्री घरी परत येणार की नाही.
     चर्चेत कुणी मागे राहत नव्हत .मनावरच ताण सैल करण्यासाठी बोलणं हा चांगला मार्ग आहे. एका कोप-यात एक मध्यमवयीन माणूस मुकपणे निर्जीव डोळ्यांनी सगळीकडे पाहत होता. कुणीकरी सांगीतल ...१२ वाजता जो बॉम्बस्फोट झाला ,त्याच्या धक्क्याने त्याचं नवजात मूल वारलं .नंतर ऐकल ,वरळीच्या हॉस्पिटलमध्ये पण त्याच वेळी अशी दोन बालकं धक्क्याने मरण पावली होती.
      सुमारे तास -दीड तासनंतर रस्ता मोकळा झाला आता कोप-यातल्या पोलिस व्हॅन मधून बायका -मुलांना खाली उतरवल होत .आणि ट्रॉफिक पोलिसांनी थोडफार दिशानिर्देशन पुन्हा सुरू केलं.
            गाडयांच्या रांगा पुन्हा सुरू झाला ,पण लोकांच्या चेह-यावरून शहरातल्या तणावाचा अंदाज येत होता .माहीम कॉजवेच्या त्या सडकेवर तीन-चार टॅक्सी ,स्कूटरी आणि सायकली धुमसत पडल्या होत्या .अजूनही मध्येच एखादा घोळका लाठया परजत शक्ती प्रदर्शन करतच होता. समोर स्कूल बस चालली होती.आज त्यातली मुल सीट मध्ये दडून बसली होती.
       शेजारच्या कोळीवाडयातल्या सित्र्या लहान मुलांना सांभाळात तोंड अर्धवट झाकून त्या जळत्या गाडया पहायला बाहेर येत आणि घरातली माणस त्यांना दटावून पुन्हा आत जायला सांगत.फुटपाथवर उभ्या असलेल्या दोन बलदंड शरीराच्या तरूणांनी त्यांच्या हातातले दोन मोठाले दगड जमीनीवर फेकले आणि मस्तीत चालत त्यांनी पार्ले कोल्डिंकची व्हॅन गाठली .व्हॅन मधून दोन-दोन थम्सअपच्या बाटल्या उचलल्या आणि दातांनीच त्यांची झाकणं उघडून उद्दामपणे बाटल्या तोंडाला लावल्या .जणूकाही ते काठया फिरवून आणि पॉश गाडयांच्या चमकत्या काचा फोडून किंवा आगी लावून खुप दमले होते. कोणत्याही सभ्य नागरिकाला त्यांना अडवायची हिंमत नव्हती ,मीराजने क्रोधित नजरेने त्यांच्याकडे पाहिले आणि पुनः माझ्याकडे पाहत मान खाली घातली .
          लांब कुठेतरी थांबलेल्या पोलिस जीपमधून वायरलेसचा सेट घेतलेले दोन वरिष्ठ अधिकारी उतरले आणि त्यांनी पोझिशन घेऊन पुन्हा सगळयांना पुढे काढायला सुरवात केली.
       समोर वीस फूट अंतरावर एक दाढीवाला गोरापान माणूस जखमी अवस्थेत रोड डिव्हायडरवर उभा
 होता .दोन हवालदारांनी त्याला दोन बाजूंनी आधार दिला होता. त्याच्या पांढ-या सफारी सुटावर रक्त पसरलं होत .डावीकडे जळत उभी असलेली मारूती वन थाऊजंड त्याची असावी .वेडया पिसाट घोळक्यांनी शिकार झालेला तो हिंदू होता की मुसलमान १ नुसती दाढी ठेवल्याने कोणी मुसलमान होत नाही. त्याच्या कपडयांवर पसरलेल रक्त लाल होतं आणि  त्याच्यावरून त्याचा धर्म  हिंदू की मुसलमान हे ठरू शकलं नसतं .त्याच्या निःस्तब्ध आक्रोशहीन चेह-याकडे पाहून मीराजने क्षणभर दोन्ही हात वर उचलले आणि खाली मान घालून गाडी चालवत राहीला.
      मुंग्यांच्या गतीने रांग  सरकत राहिली .काळ सतत आमच्या मागे -पुढे , डावी-उजवीकडे नाचत होता. आम्ही सुखरूप घरी पोचणार होतो का१
     माझ्या डोळयासमोर आजचा विशिष्ट संदर्भ पुसला गेला .आज १२ मार्च ,शुक्रवार नव्हता . आज एक असा मृत्युदिन होता जो फार पूर्वीपासुन फिरून-फिरून येत होता. आज जे मी पाहत होते ,ते दृश्य मानवजात हजारो वर्षापासून पहाते आहे. मुंग्यांसारखे चालणारे लोक ...त्याच्यासारखेच मारले जाणारे लोक...
     शेवटी एकदाच घर समोर दिसल .साडेसहा वाजले होते .मीराजने खालीच गाडीच्या किल्ल्यामाझ्याकडे दिल्या .त्याची इफ्तारची नमाज बुडाली  होती.
      घरात शिरताच अजूनही स्कूल युनिफॉर्ममध्येच ,असलेली प्रिया मला येऊन बिलगली आमि ओक्साबोक्शी रडू लागली.
        मम्मीतू कुठे होतीस १मी किती घाबरले होते.तू फोन का नाहीकेलास१ दोन तासांपु्र्वी हॉटेल सी-रॉकमध्ये बॉम्बस्फोट झाला .वर एक होलिकॉप्टर फिरत होत .मला वाटत एखाद्या देशाने आपल्यावर आक्रमण केलं आहे.होय ना१ तिच्या पाठीवर ,केसांतून हात फिरवत ती तिला शांत करत होती. मी नशिबवान की सुखरून घरी पोहचली होते. ,पण आज कित्येक लोक सकाळी बाहेर पडले असतील आणि घरी परतले नसतील.
        तो काळा शुक्रवार
     रात्री दिल्लीहून नव-याचा ,सुभाषचा फोन आला .सगळ ठीक आहे हे ऐकून त्याने समाधान व्यक्त केल .मी एवढच सांगू शकले की ,मी युनीयन बँकेत गेले होते आणि परतीच्या वाटेवर माहीमच्या दंगलीत अडकले ,पण तो एसटीडी कॉल होता .मी उदया आल्यावर सगळ ऐकव. असं म्हणून त्याने फोन ठेवून दिला .
       दुस-या दिवशीची सगळी वर्तमानपत्र बॉम्बस्फोटाच्या बातम्या आणि फोटोनी भरलेली होती .शेअर बाजारात बॉम्ब फुटला होता ,त्याच्यासमोर वडा-पाव विकणारा मोसंबी ज्युस विकणारा आणि लस्सी बनवणारा १७ वर्षाचा मुलगा ...सगळे मारले गेले होते .जास्त बातम्या वाचण्याची माझ्यात हिंम्मत नव्हती .
           थोडया वेळातच मीराज आला .त्याला गाडी घेऊन एअरपोर्टला जायच होत .माझ्याकडून किल्ल्याघेताना तो थबकला .संकोचत बोलला ,कालपासून सारखा निचार करत होतो. अल्लाची मेहरबानी की तुम्हाला सहीसलामत घरी पोहचवू शकलो. मला माझी काळजी वाटत नव्हती .गाडीची पण नाही ,पण तुम्हाला काही होऊ नये  याची मात्र काळजी वाटत होती ....तो बोलतच होता.
             काल दुपारी बॉम्ब फुटल्याची बातमी ऐकल्यापासून त्याची बायको मुमताज आणि आईचा जीव था-यावर नव्हता .आली नवाज तापाने फणफणलेला .त्याला सुखरूप आलेला पाहून सगळे त्याला बिलगून रडतच राहीले .
        रोजाचा उपास सोडल्यानंतर  तो मुहल्लयातील इतर साथीदारांबरोबर हिंदूजा हॉस्पिटलला गेला होता ...रक्तदान करायला .तिथे इतक्या रात्री इतक्या  लांब रांगा लागलेल्या पाहून पुन्हा त्याची माणसावरील श्रद्धा जागृत झाली .त्या रांगेत सगळेच होते...हिंदू मुसलमान ,शीख.
  
      माझ्या मनात कालचाच विचार पुन्हा  परत आला ...या कोणाच्याही रक्तावर त्याची जात ,त्याचा धर्म लिहलेला नसणार .सगळयांच्या रक्ताचा रंग एकच ...लाल.
      मीराजच्या वर्णनाने माझी पण माणसाविषयी श्रद्धा वाढली ,पण एवढी माणुसकी जगात आहे ,तर मग कोम हे विस्फोट घडवून  आणत१ त्यामना कुणीच पक़डू शकत नाही२
      सुभाषच विमान लेट होत .नेहमीप्रमाणे त्याने त्याने मीराजच्या हाती सामान घरी पाठवल आणि तो थेट ऑफिसलाच गेला .रात्री घरी यायलाही नेहमीप्रमाणे उशीरच झाला.
      जेवणानेतर रूटीनप्रमाणे तो बेडरूममध्ये टीव्ही बघायला गेला .मी किचनची आवरा आवर करून गेले .तो रिमोटशी खेळ करत होता.
      मला पाहून म्हणाला ...सगळीकडे भ्रष्टाचार बोकाळलाय ,माझी ट्रिप वाया गेली .कंपनीला अजून इंपोर्ट लायसेन्स मिळालं नाही .
      अच्छा मी म्हटलं. आणि इथे काय झालं याचा तुला अंदाड पण नाही येऊ शकत .मी युनीयन बँकेतून नुकतीच बाहेर आले होते आणि ...
       पण तुला तिथे जायची काय गरज होती१बंदुकीच्या  गोळीसारखा सण्णकन् त्याचा प्रश्न आला .
       मला काय माहीत होत की काय होणार आहे.१माझ्या मनात एकदम खिन्नपणा दाटून आला .
       समोर पडदयावर माधूरी दीक्षित पार्श्वभाग उडवीत गाणं गात होती.
       कालचं टपाल आण जरा सुभाषने चॅनल बदलला.
      काल कुठे आल टपाल१
      का१ शुक्रवारी टपला येत नाही का१
      येत असेल ,पण काल नाही आल,माझ्याही आवाजात चिडकेपणा होता.
    त्याने व्हीसीआरवरचा रोकॉर्डेडे प्रोग्राम चालू केला.स्क्रिनवर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री हसून सांगत होते. ...एकीकडे रामाचा आदेश होता .दुसरीकडे कोर्टाचा हुकूम मी कुणाचा आदेश मानणार१
   अरे ,हा प्रोग्राम इरेज नाही केला तू १ आणि कालचा प्रोग्राम पण रोकॉर्ड नाही केलास१
     नाही काल लक्षात नाही राहील .काल मी काय संकटातून वाचले फोनवर तुला काहीच सांगीतल नाही मी .
     सुभाषने पुन्हा चॅनेल बदलला .आता एक मोनिका सेलेस आणि स्टेफी ग्राफ यांची जुनी मॅच चालू होती.
    मी माहीमच्या दंगलीत अडकले .तू क्लपनाच करू शकणार नाहीस, त्या तशा लाठी-काठीधारी युवकांच्या घोळक्याकडे पाहून किती भीती वाटू शकती समोर मृत्यु दिसत होता.

      आता स्टार टीव्हीवर मधूर जाफरी बासमती पुलाव बनवून दाखवत होती.
    मला अजून विश्वास नाही वाटत की मी जीवंत आहे...सुखरूप आहे...मी माझच पालुपद चालू ठेवल.
      आतापासुन अशी ऑडव्हेंचर्स करायला जात जाऊ नकोस.सुभाषने थंडवणारे प्रश्न मीटवून टाकला.
     आता एम टीव्हीवर मॅडोना होती आणि माझ्यानव-याच आवडत गाणं ...इट युज्ड टू बी माय प्लेग्राउंड .
     मी तिथे ऑडव्हेंचर करायला गेले नव्हते .तू स्वतः पाहिल असतस तर... मी माझ्या प्रवाहात बोलत जाणार इतक्यात माझ्या लक्षात आल की सुभाषच लक्ष माझ्याकडे नव्हतं. तो मॅडोनाच्या नशील्या डोळयांत आणि मादक हावभावांत गुंगला होता
 माझाच मुर्खपणा होता मी त्याला अशी घटना सांगत होती जी बत्तीस तास शिळी होती.
   बत्तीस तास.
   म्हणजे एक हजार नऊशे वास मिनीटं.
    म्हणजे एक लाख पंधरा हजार दोनशे सेकंद.
    एवढा काळ या शहरातल्या सुपरफास्ट जीवन जगणा-या प्राण्यांच्या दृष्टीने खूप प्रदीर्घ काळ होता त्यात माझा नवरा कंपनीचा  टॉप एक्झिक्युटिव्ह.
     पुढल्या दिवशी मीराजपण डयुटीवर आला नाही आणि जाधवपण .सुभाष पेपर वाचत बसला .त्यात पंतप्रधान मुंबईला येणार असल्याची बातमीहोती .ते इतर कार्यक्रम रद्द करून घटनास्थळाचे निरीक्षम करायला या महानगरात येणार होते.कित्येकदा गुन्हा घडून गेल्यानंतर पोलिस लाठया आपटत येतात,तसाच काहीसा हा प्रकार वाटत होता.मागे दंगलीच्या  वेळी मुंबईची पाहणी करायला आले होते,तेव्हा आपल्या बुलेटप्रुफ गाडीच्या बंद  काचांमधून त्यांनी निरीक्षण केले होते.
        या वेळी ते बुलेटप्रुफ गाडीतून खाली उतरले आणि हेल्मेट घालून एअरइंडिया बिल्डींगच्या तळमजल्यावर स्फोटाने पडलेला ढिगारा  आपल्या पारखी नजरेने त्यांनी  पाहिला मग काही प्रतीक्रिया म देता सुरक्षागार्डाच्या आडोशाने त् सुरक्षीत पणे कारमध्ये परतले.
        दूरदर्शनने आपला सर्वोत्कृष्ठ कॅमेरामन पाठवून त्यांची मुंबई यात्रा कव्हर केली या वेळी मुंबईच्या सुफर फास्ट दिनक्रमाला कोणी थांबवू शकल नाही .लोक्लसची गर्दी मुळ पदावर आली होती .जीवनाची जोरदार गती चालू होती .त्याला सलाम करणारी पोस्टर्स जागोजागी लागली होती. ...सलाम बॉम्बे बॉम्बे,आय ऑम प्राऊड ऑफ यू.
       स्फोटात दगावल्यांची या वेळी शोकसभा झाल्या नाहीत.याच्या मागे आंतरराष्ट्रीय शक्तीचा हात होता. त्यांची चर्चा उच्चस्तरावर होणार होती .सामान्य माणूस त्यांच्याशी दोनहात करू शकणार नव्हता .आता ही दुर्घटना फक्त त्यांच्या आठवणीत शिल्लक उरली ,ज्यांची कोणीतरी प्रिय व्यक्ती दगावली किंवा  अपंग झाली होती.
     
      संध्याकाळी सुभाष ऑफिसातून थोडा लवकरच आला .गळयाचा टाय ढिला करत मला म्हणाला ,शर्माची खबर ऐकलीस तू दुपारी १त्यांनी  शेअर मार्केटच्या स्फोटानंतर घरी फोन केला की  ,ते सुरक्षीत आहेत आणि सेंच्युरी बाजारात जाऊन घरी परत येत आहेत, पण सेंच्युरीच्या स्फोटात ते मरण पावले .आज त्यांच्या जळलेल्या कारची ओळख पटली .आत त्यांची बॉडीपण वाईट जळली होती .उद्या त्यांच्या कडे जावे लागेल आणि हो आज जाधव उशिरा  आला  होता सांगत होता की ,मीराजच्या मुलाची डेथ झाली.
      माझ्या डोक्यात जणू कोणी घणाचा घाव घातला .अली नवाज ...मी पुटपुटले .
      अली नवाज १ कोण अली नवाज १ सुभाषने माझ्याकडे विचित्र नजरेनेपाहून म्हणाला .
     गेल्या देन दिवसात कितीक वाईट बातम्या वाचल्या ,पण या बातमीची कल्पना केली नव्हती.
      नवाज ...मीराजचा मुलगा काय झाल त्याला१
     काही नाही ...आजारी होता.मला नेमक माहीत  नाही .मेंटली रिटार्डेड पण होता .सुभाषने खांदे  उडवले .वाईट झाल .ब-याच दिवसांनी मुल झाल होत मीराजला.
      मी चूप राहीले .तो मेंटली रिटार्डेडे नव्हता ,उलट जास्त संवेदनशील होता.दंगलीच्या दहशतीने त्याचा आवाज हिरावून घेतला होता. ,पण तो सुधारत होता. मीराज म्हणाला की, तो बोलण्याचा प्रयत्न करत होता.
       जाधव गाडीची किल्ली द्यायला वर आला तेव्हा त्याला मी म्हटल ,उद्या मी तुझ्याबरोबर मीराजच्या घरी जाईन.
    तो काही बोलला नाही,पण परवानगी करता आपल्या साहेबांकडे बघत राहिला.
  परवा मी अहमदाबादला जाणार आहे तेव्हा जा तुम्ही,सुभाषने त्याच्या समोर मोठेपणा दाखवला खरा, पण आत येऊन मला म्हणाला  ...जाणारा गेला .आता तू त्याच्या कडे जाऊन त्याचा त्रासच वाढवशील ...विचार कर.
       दुस-या दिवशी आम्ही शर्माच्या घरी जाऊन आलो .त्यांचे म्हतारे आई-वडील ,बायको कोणालाही या धक्क्यातून सहज सावरणे अवघड होते .पाहुण्यांची गर्दी झाली होती .सर्वांच्या तोंडी एकच चर्चा ...देव तारणार नसेल तर कोण वाचणार १ इथे नाही तर तिथे   ,जमीनीवर नाही तर आकाशात ,जळी नाही तर स्थळी विधात्यानेच  लिहलेला ललाटलेख कोण पुसू शकणार १ ईश्वर आता मृतात्म्यांना शांती देवो आणि त्यांच्या कुटुंबियांना हे दुःख सहन करण्याची शक्ती शेवटी सगळं नियतीच्या हातात आहे.
      ...नियती...नियती ...माणसाच्या हैवानी प्रवृत्तींवर पांघरून घालण्यासाठी किती नामी शब्द शोधून काढला आहे.
     काही दिवसांनी पुन्हा गाडी घेण्यासाठी मीराज आला त्याच्याकडे पाहण्याचा मला धीर होईना
    मीराज तु कसा आहेस१ मी तुझ्या घरी यायचा विचार करत होते.
   मला कळल .जाधवने सांगिल .मॅडम ,तुम्ही एवढा विचार केला, यातच मला भरून पावल .आमचा मुहल्ला आपल्यासारख्या लोकांनी येण्याच्या लायकीचा राहिला नाहीतुम्ही काही  वेगळं मानु नका
         पण त्याला अली नवाजबद्दल विचारायच होत त्याला नक्की काय झाल१ त्या १२ मार्चच्या शुक्रवारी मीराज घरी परतण्याआधी  त्याच्या अम्मीची घालमेल आणि नंतरचा विलाप तो सहन करू शकला नाही १पण तो तर आता आधीच्या धक्यातून सावरत होता .मग फक्त तापामुळे कसा काय गेला ताप खुप वाढला होता का१ वेळेवर डॉक्टर मिळाला नाही १ त्याला दवाखान्यात कानाही नेल१ एक ना दोन.
     मीराजचं सांत्वन कसं करायचं१... अरेरे .च्च च्च फार वाईट झाल... ईश्वर मृताम्यांना शांती देवो आणि परिवारातल्या लोकांना दुःख सहन करण्याची शक्ती ...हे आणि असले शब्द मीराजच्या बाबतीत मी उच्चारू तरी शकले असते का१ इतका खोटेपणा मला जमला नसता  नवाजच्या मृत्युबाबत अशा प्रकारे सांत्वन करण्याचे व्यावहारिक कौशल्य माझ्यापाशी नव्हते समोर मीराज एका दगडी मूर्तीप्रमाणे निश्चल आणि निरावेग उभा होता.दगडी मूर्तीशी कोण काय बोलणार १
        मी अम्मी आमि बायकोला गावी पोचवायला जातोय .त्याने सपाट आवाजात सांगितल ,नवाजच्या मागे त्यांना  त्या घरात रहाण नकोस झाल आहे.
        ते घर... मला समजल .ज्या घरात नवाज हळूहळू माणसात परत येत होता आणि ज्या घरात काहीतरी होऊन त्याचा सुधारण्याचा रस्ता अचानक अडवला गेला होता.
     त्यांना  गावी सोडून मी परत येईन .मीराजने हळूहळू शब्द उच्चारले आणि माझ्या उत्तराची वाट न पाहता तो धीरे धीरे पाय-या उतरू लागला.
     तो बे बोलला नसता तरी मला कळलं असतं .तो इथेच परत येणार होता.याच शहरात .त्याच त्याच्या घरात दुसरीकडे कुठे जाणार १ देन वेळची भाकरी याच शहरात मिळते.
---------------------------------------------------------------------








 
  























 























  

बुधवार, 7 दिसंबर 2016

पैलवानाचा ढोलक --फणीश्वरनाथ रेणु

पैलवानाचा ढोलक
--फणीश्वरनाथ रेणु
   
      कडाक्याच्या थंडीचे दिवस .अवसेची रात्र .काळीकुट्ट आणि हाडांपर्यत गोठवून टाकणारी थंडी .त्यातच गावावर महामारीची सावली पडलेली१ मलेरिया आणि कॉलरा या दोन्ही साथीच्या कचाटयात सापडलेला गाव भयार्त शिशुप्रमाणे थरथर कापत होता .बांबू आणि गवताने शाकारलेल्या झोपड्यांमधून अंधार आणि निःस्तब्धतेचे साम्राज्य पसरलेले होते .
     अंधार जणू गावाच्या दुर्दशेवर चार अश्रू ढाळीत होता ,तर निःस्तब्धता स्वतःच गदगदत होती .एखादा भावूक तारा आकाश सोडून त्या गावाकडे झेपावत होता ,तिथला अंधार थोडा कमी करण्यासाठी  ,पण वाटेतच तो नामशेष होत होता . मग त्याच्या भावूकतेवर आणि पराजयावर इतर चांदण्या खदखदून हसत होत्या .मधूनच कोल्ह्यांची कोल्हेकुई किंवा एखाद्या तरसाचा हुंकार ऐकू यायचा .तो वातावरणातील भीती अधिकच वाढवून जायचा .एखाद्या झोपडीतून ओकारी आणि हगवणीचे आवाज येत आणि वेदनेने पिळवून कुणीतरी हे राम ,अरे देवा ,भगवंता .अशा हाका  मारीत राही .वेदनेने तडफडणारे एखादे मूल ,आई ,पाणी असा आक्रोशही करत असे .तरीपण एकूण त्या निःस्तब्धतेला काही खिंडार पडत नव्हते.

    परिस्थितीची भयानकता जाणण्याची काही वेगळी बुद्धी कुत्र्यांना असते .दिवसभर ते कुठल्याही राखेच्या ढिगात  अंगात वेटोळे   करून सुस्त पडून रहायचे .मात्र दिवेलागणीला किंवा कधी-कधी अर्ध्या रात्री सगळे गळा काढून रडत अशी रात्र सर्व बाजूंनी आपली भयाणता सिद्ध करून येई. 
   त्या भयानतेला शह देणारी एक गोष्ट गावात होती .पैलवानाचा ढोलक  रात्रीच्या समोर शड्डू ठोकत हा ढोलक उतरत असे आणि रात्रभर रात्रीला आव्हान देत असे .संध्याकाळपासून ढोलक सुरु होई .तट धा, तट धा ,गिड धा, अर्थात आ ,जा ,भिड जा .आणि मध्येच तटाक तट धा, तटाक तट धा, म्हणजे उचल आणि पटक त्याला ,हीच लय आसमंतात संजीवनी भरून ठेवत असे.
    लुट्टनसिंग पैलवान तो आठ वर्षाचा असतानाच आजारपणात आई -वडील मरण पावले .विधवा सासूनेच त्यांचा सांभाळ केला .त्यावेळी तो गाई चरायला न्यायचा . धारोष्ण दूध प्यायचा आणि कसरत करायचा .विधवा सासूला त्रास देण्यासाठी बरेच लोक टपलेले होते .त्यांचा प्रतिकार करता यावा म्हणून लुट्टन कसरत करत होता .त्याला इतर कशाची फिकीर नव्हती .लवकरच किशोरवयीन लुट्टनच्या दंडावर फुगीर बेडक्या दिसू लागल्या .तारूण्यात येईपर्यंत तो गावातला सर्वश्रेष्ठ पैलवान मानला जाऊ लागला .कुस्तीच्या आखाडयात त्याचे नाव गरजू लागले .
    एकदा तो कुस्तीची लढत पाहायला शामनगरला गेला .भली थोरली जत्रा भरलेली होती आणि कुस्तीच्या मैदानावर ही , गर्दी होती . आखाडयाच्या रिंगणात उतरलेले पैलवान आणि त्यांना जोश देणा-या ढोलकाच्या आवाजाने लूट्टनच्या नसानसांत वीज सरसरून गेली .त्याने मागचा-पुढचा विचार न करता एकदम सिंहाच्या छाव्या,ला ललकारले त्याचे खरे नाव होते चाँद सिंह आणि तो आपल्या वस्ताद गुरू बादल सिंहबरोबर पंजाबमधूनच प्रथमच शामनगरच्या कुस्तीसाठी आला होता .बरोबरीच्या सर्व पंजाबी आणि पठाण पैलवानांना जिंकूनच त्याने शेर का बच्चा ही उपाधी मिळवली होती .कुस्तीच्या  रिंगणात तो एक लंगोट लावून नुसताच उंडारत होता .आपली उपाधी सिद्ध करण्यासाठी मधूनच तो जोरजोराने मांडया आणि बाहू ठोकायचा .देशावरची पैलवान मुले त्याच्याशी लढण्याच्या कल्पनेच रिंगणातून  दूर सरायची.
    
     शिकार आणि कुस्तीचे प्रेमी ,शामनगरचे वृद्ध राजेसाहेब त्याला आपल्या दरबारातच कायमचा ठेवून घेण्याची घोषणा करणार होते .एवढ्यातच लुट्टनने त्या शेर का बच्चा ,ला ललकारले .मानसन्मानाने फूलून आलेला चाँद सिंह क्षणभर त्याच्या ईर्षेकडे पाहून जरासा हसला ,पण दुस-याच क्षणी ससाण्याच्या गतीने त्याच्यावर तुटून पडला .
    बघ्यांच्या गर्दीमध्ये एकच आक्रोश उठला ,अरे मेला ,मेला ,पण अरे वारे बहादूर लुटटननेही तेवढयाच चपळाईने आपली सुटका करून घेतली आणि तो स्वतःचे डावपेज दाखवू लागला .
    वृद्ध राजाने कुस्ती थांबवली आणि लुटटनला जवळ बोलावून समजावले .तो ऐकेना तेव्हा त्याला दहा- दहाच्या दोन नोटा काढून दिल्या आणि म्हणाला ,हे घे जत्रा बघ आणि घरी जा ,
    पण लुट्टन अडून बसला ,मी लढणार राजेसाहेब ,फक्त आपण हुकूम करा,
        तू वेडा झाला आहेस ,जा घरी जा,
   मॅनेजरपासून शिपायांपर्यत सर्वांनी लुट्टनला सुनावले ,अंगात मांस नाही छटाकभर आणि लढणार म्हणे कुस्ती ,राजेसाहेब एवढं समजावून सांगताहेत .......
      दूहाई आहे सरकार मी दगडावर डोक आपटून जीव देईन .बस आपण हूकूम करा .... तो दोन्ही हात जोडून विनवत होता
     गर्दी आता अधीर होत चालली .इतर वाद्ये बंद झाली ,पंजाबी पैलवानांच्या गोटातून लू्टट्नवर शिव्यांचा वर्षाव होऊ लागला .दर्शक उत्तेजीत झाले होते .
        कुणीतरी पुकारले ,त्याला लढू दया महाराज,
       कुस्तीच्या रिंगणात एकटा चाँद सिंह तोंडावर उसने हास्य आणून उभा होता .पहील्या पकडीतच त्याला आपल्या प्रतिस्पर्ध्याच्या ताकदीचा अंदाज येऊन गेलेला होता .शेवटी गर्दीसमोर आणि लुट्टनच्या हट्टासमोर विवश होऊन राजाने आज्ञा दिली ,लढ कुस्ती,
      पुन्हा एकदा कुस्तीचे डफ आणि ढोलक वाजू लागले .जमाव आता पूर्ण जोशात होता .जत्रेतील दुकानदारांनी दुकाने बंद केली .चाँद सिंगची कुस्ती ही पाहायलाच पाहिजे ,
    तट धा ,गिड धा ,तट धा गिड धा,
    दोन्ही पैलवान आपापले डावपेज दाखवू लागले .मोठया आवाजात एक ढोल वाजू लागला ,ढाक ढिन्ना ,ढाक ढिन्ना .अर्थात वा पठ्ठे ,भले पठ्ठे.
    लुट्टनला चाँद सिंह ने आवळून धरले होते .गेला गेला ,दर्शकांनी टाळ्या वाजवल्या .भरीत होऊन जाईल भरीत हा काही हसण्यावारी नेण्याचा खेळ नाही .तो शेर का बच्चा आहे म्हणाव ,
    चट गिड धा,चट गिड धा अर्थात डरू नकोस ,डरू नकोस  चाँदचा  मजबूत हात लुट्टनच्या मानेवर होता आणि तो त्याला चित्त करू पाहत होता .इथेच पुरून टाक त्याला बादल सिंह आपल्या शिष्याला प्रोत्साहन देत होता .
    लुट्टनचे डोळे बाहेर येऊन पडू  पाहत होते .त्याच्या बाजूने होता  फक्त ढोलकाचा इशारा .त्याच्या तालावरच लुट्टन आपल्या शक्तीची परीक्षा घेत होता ,स्वतःची हिम्मत वाढवीत होता.
    अचानक खर्जातल्या ढोलाने एक वेगला बारीक चित्तकार काढला ,धाक धिना ,धाक धिना,
    लुट्टनला ढोलाचे बोल स्पष्ट सांगत होते ,पेच सोडव ,बाहेर पड ,पेच सोडव बाहेर पड,
    लोकांच्या आश्चर्याला पारावार राहिला नाही .लुट्टन आचानक पेच तोडून चांदच्या पकडीतून निसटला आणि आता त्याने चाँदची मजबूत मान पकडली होती .वाह रे मिट्टी के शेर अच्छा ,निसटला पकडीतून ,च्या मारी ,जनमत बदलू लागले होते .ढोल अजून वाजतच होता ,तटाक तट धा, चटाक चट धा, ....अर्थात उचल आणि पटक त्याला ,उचल आणि पटक त्याला ,
     लुट्टनने  एक ठेवणीतला डावपेज काढला आणि क्षणात चाँदला उचलून जमिनीवर आळला .
     धा गिड गिड ,धा गिड गिड..., अर्थात वा ,बहादूर -वा ,बहादूर अचानक झालेल्या या कुस्तीच्या शेवटाने कोणाचा जयजयकार करावा ते ने सुचून गर्दीतील कुणी जय दुर्गे ,कुणी जय बजरंगबली तर कुणी जय शामानंद राजेसाहेब असे म्हणत सर्वानी जयघोषाने आकाश दुमदुमून टाकले.
    विजयी लुट्टनने धावत जाऊन सगळ्या ढोलांना स्पर्श करून नमन केले .मग राजेसाहेबांच्या जवळ येताच ,त्यांनाच उचलून डोक्यावर घेऊन तो नाचू लागला. राजेसाहेबांचे किमती कपडे मातीने भरून गेले .मॅनेजरसाहेब अरे,अरे करतच राहीले ,पण राजांनी स्वतः त्याला उचलून छातीशी धरले आणि म्हणाले ,शाबास रे माझ्या बहादूरा , वतनाच्या मातीची लाज  राखलीच तू आज .
    पंजाबी पैलवानाचा गट चाँदची समजूत काढत होता .राजेसाहेबांनी लुट्टनला नुसते बक्षीस दिले नाही ,तर त्याची लगेच राजदरबारात जागा मुक्रर करून टाकली .राज-पंडीतांनी आक्षेप घेतला ,महाराज ,तो जातीने ढोर आहे .
   असू दे .त्यांन काम क्षत्रियाचं केलेलं आहे ,राजेसाहेब मॅनेजरकडे पाहून म्हणाले .मॅनेजर क्षत्रिय होता .त्याने तोंड फिरवले.

तेंव्हापासून लुट्टनची .किर्ती दूरवर पसरली दरबारातून त्याच्या शिध्याची व्यवस्था झाली .आता पौष्टीक अन्न दूप्पट जोमाने व्यायाम आणि राजेसाहेबांचा स्नेह ,मग त्याला प्रसिद्धी मिळाली यात काय नवल .
    काही वर्षात त्याने मोठ  -मोठया पैलवानांशी कुस्ती खेळून त्यांना जिंकून घेतले .शेवटी त्याने काले खाँलापण जिंकले .काले  खाँ ,आली म्हणत प्रतिस्पर्ध्यावर तुटून पडला की .त्या आरोळीने बिचारा प्रतिस्पर्धी पक्षाघात झाल्यासारखा लूळा पडायचा .अशा काले खाँलादेखील लुट्टनने हरवले .
    त्यानंतर मात्र तो दरबारात एक दर्शनीय व्यक्ती म्हणून उरला .जत्रेत तो लांब अंगरखा व पगडी घालुन एखाद्या मस्त हत्तीप्रमाणे झुलत जायचा .कुणी हलवाई गमतीने म्हणे ,ताजे रसगुल्ले आहेत ,खाणार का पाच-दहा१
    तो म्हणायचा ,पाच -दहा काय ,आणा दिड -दोन शेर ,एवढी मिठाई खाऊन पाच-दहा पानांचा तोबारा भरून फिरायचा .जत्रेतून परत येताना वेश कसा असायचा १ डोळयांवर रंगीत प्लॅस्टिकचा चष्मा ,हातात खेळणी ,एखादी पितळी शिट्टी
    वय आणि ताकद वाढत गेली ,तशी त्याची बुद्धी मात्र अगदी बालबुद्धी झाली .जत्रेत ढोलाचा आवाज ऐकला की तो शरीर-प्रदर्शन करू लागायचा .लंगोटीचा पट काढून आखाड्यात फे-या मारायचा .आधी त्याला कुस्तीसाठी जोडीदार भेटत नसे .पुढे-पुढे राजेसाहेबच त्याला कुस्तीसाठी मानाई करू लागले .मग तो फक्त अंगाला तेल आणि लाल मातीने मर्दन करायचा .वृद्ध राजे त्याला बघून नुसते स्मित करायचे .
     पंधरा वर्षे झाली .लुटटन पैलवान अजिंक्य राहिला .आखाडयात तो आपल्या दोन-दोन पैलवान मुलांसोबत यायचा . विधवा सासू कधीच वारली  होती .दोन मुलांना जन्म देऊन बायकोसुद्धा पुर्वीच मरून गेली दोन्ही मुले बापासारखी सशक्त आणि तगडी होती .जत्रेच्या आखाडयात त्या तिघांना पाहून लोक वाहवाही करू लागत .त्या दोघांनाही राज- पहलवान घोषित केलेले होते .त्यांच्या शिध्याची व्यवस्था राजकोषातूनच केली होती .
      रोज सकाळी पैलवान स्वतः ढोल वाजवायला बसत असे आणि त्या तालावरच पोरांना कसरत शिकवत असे. .दुपारी जेवणानंतर पडल्या-पडल्या अधिक माहीती देत असे, बर का पोरांनो ,ढोलकाच्या आवाजावर आणि तालावर पुर्ण लक्ष ठेवायचे ,माझा गुरू कोणी पैलवान नव्हता ,हा ढोलकच माझा गुरू .याच्या तालाच्या प्रतापानेच मी पैलवान झालो. दंगलीत उतरण्याआधी या ढोलकाला नमन करायचे .यानंतर राजेसाहेबांशी इमान ,आपली जमीन ,आपला गाव ...इत्यादी ब-याच गोष्टी सांगायचा
     पण हे सगळे एकीकडे राहूनच गेले .मुलांना कुठे कुस्तीचे फड जिंकायची संधी मिळालीच नाही .वृद्ध राजेसाहेब वारले आणि युवराजांनी ताबा घेतला बरेच बदल झाले .कुस्त्यांऐवजी घोडयांच्या  रेसमधे नव्या राजाने मन जास्त रमू लागले .पैलवान आणि दोन्ही भावी पैलवानांचा शिध्याचा खर्च बघून नव्या राजाने उदगार काढले ,टेरिबल
    पैलवानाला काही बोलायची संधीच नव्हती .राज -दरबारात त्याची गरज नाही म्हणताच तो ढोलक खांदयावर घेऊन आपल्या मुलांबरोबर चालू लागला .परत गावात येऊन राहिला .आता त्याला त्रास देणारे विरोधक गावात कोणी नव्हते .एका कोप-यात नवी झोपडी बांधून तो राहू लागला .धनगराच्या पोरांना कुस्तीचे डाव पेज  शिकवू लागला .त्याच्या शिध्याची व्यवस्था गावक-यांनी सांभाळली ,पण शेतक-यांची -धनगरांची पोर काय खुराक खाणार आणि काय कुस्ती खेळणार १ पैलवानाची शाळा लवकरच ओस पडली .शेवटी फक्त त्याची दोन मुलेच त्याच्या शाळेत राहिली .दोघेही दिवसभर मजुरी करून जे मिळेल ते आणित .त्यातच कसेबसे भागत असे.
      आणि अचानक गावावर वज्राघात झाला .आधी अनावृष्टी ,मग अन्नाचा दुष्काळ आणि आता कॉलरा आणि मलेरिया यादोन साथीच्या रोगांनी गावाचा ताबा घेतला .एक -एक घर ओस पडू लागले .लोक कण्हत कुथत आपापल्या घरातून निघून शेजा-यांकडे सांत्वन करायला जायचे ,
    किती वेळ रडत बसशील सुनबाई १जो राहणार होता तो तुझा नव्हता .आता जो आहे ,त्याच्याकडे बघ ,किंवा अरे बाबा ,घरात प्रेत ठेऊन किती काळ रडत बसशील १ कफन १ कफनाची काय गरज१ नदीत टाकून ये .इत्यादी
    पण एकदा सुर्य बुडाला आणि अंधार झाला की त्यांची काही बोलण्याची हिंमतही संपुन जायची .शेजारी एखादे मुल शेवटचे श्र्वास मोजत असले तरी त्याच्याशी बोलायची हिंमत आयांना होत नव्हती .
    फक्त लुटटन पैलवानाचा ढोलक रात्रभर वाजत राही आणि रात्रीला ललकारत राही .गावाच्या अर्धमृत माणसांना हीच संजीवनी होती .लहानथोर ,स्त्री -पुरूष ,सगळयांच्या डोळयांपुढे कुस्तीच्या दंगलीचे दृश्य तरळून जायचे .स्पदंनशुन्य ,शक्तिशुन्य नसांमधून वीज तमकून जाई .ढोलकीच्या आवाजात कुठलाही आजार कमी करण्याचा गुण नव्हता किंवा महामारीची सर्वनाशी गती थांबवायची शक्ती नव्हती .तरीपण मरणाच्या दारातून पलीकडे जाणा-या लोकांना डोळे मिटताना  ढोलकाच्या आवाजाचा दिलासा वाटे .मृत्यूचे भय कुठल्या कुठे उडून जाई.
    ज्या दिवशी काही तासांच्या अंतरानेच पैलवानाचे दोन्ही मुलगे क्रूर काळाच्या दाढेत सामावले ,तेव्हाही त्यांनी म्हटले होते ,बाबा उचल आणि पटक त्याला ,हा तुझा आवडता ताल वाजव,
    चटाक चट धा ,चटाक चट धा रात्रभर पैलवान ढोलक बडवत राहिला .मधूनच तोंडाने म्हणायला ,मारा बहादुरांनो,
    पहाट झाली तेव्हा दोघे निःस्तब्ध पडलेले होते .दोघे पोटावर पडले होते .मरतानाही त्यांनी आपली पाठ जमिनीला टेकू दिली नव्हती .एकाने तर वेदनेचा शब्द निघू नये म्हणुन दातांनी मातीच उकरली होती .दीर्घ निःश्र्वास सोडून पैलवान म्हणाला ,दोघे बहादूर कोसळले
    थोडया वेळाने त्याने राजा शामानंदने दिलेला रेशमी लंगोट लावला .सा-या अंगावर माती चोळून थोडा व्यायाम केला .मग दोन्ही मुलांची  कलेवरे खांद्यावर टाकून नदीच्या प्रवाहात सोडून आला .लोकांनी  ऐकले आणि आश्चर्य व्यक्त केले .कित्येकांची हिंमत खचली .
    पण रात्री पैलवानाच्या ढोलकाचा आवाज पुन्हा ऐकू आला तशी लोकांची हिंमत पुन्हा वाढली .पुत्रशोकाने व्याकूळ माता-पित्यांना लोक सांगू लागले ,दोन्ही तरूण मुलगे होते ,पण पैलवानाची हिंमत तर बघा
      काही दिवस गेले .एका रात्री ढोलक बोलला नाही .पैलवानाच्या काही जुन्या शिष्यांनी सकाळी उठून त्याच्या झोपडीकडे धाव घेतली .पैलवान चित पडलेला होता .रात्री कोल्हयांनी त्याच्या डाव्या जांघेचे मांस खाऊन टाकले होते .थोडे पोटावरचे पण .
       अश्रू आवरत एक शिष्य सांगू लागला ,गुरूजी म्हणत ,मी मेलो की चितेवर ठेवतानासुद्धा मला पोटावरच ठेवा .मी आयुष्यात कधी चित झालो नाही आणि चिता जळेपर्यत ढोलक वाजवा .... पुढे तो बोलू शकला नाही .
     शेजारीच ढोलक घरंगळून पडलेला होता .कोल्ह्यांनी त्याचे चामडेही फाडून टाकले होते.
                                                                  लेखक -फणीश्वरनाथ रेणू  
----------------------------------------------------------------------

मंगलवार, 15 नवंबर 2016

माझ्या कथासंग्रहाला नित्यलीला नाव कां?

माझ्या कथासंग्रहाला नित्यलीला नाव कां?

माझ्या या कथासंग्रहाला नित्यलीला नाव देण्याच विशेष कारण आहे. नित्यलीलाचे लेखक फणीश्वरनाथ रेणु बिहारचे एक अग्रगण्य स्वातंत्रसेनानी आणी साहित्यकार होते. नेपाळच्या कोइराला परिवाराशी घनिष्ठ संबंध असल्याने, विराटनगर मधे त्यांच्या शाळेत व घरात राहून पूर्ण केलेले माध्यमिक शिक्षण, तिथून पुढील शिक्षणासाठी बनारस, १९४२ मधे चले जाव आंदोलनात सहभाग आणि कैद, मार्च १९४७ पासून बिहार आणि नेपाळच्या जूट-मिल मजूरांचे संगठन आणि नेपाळच्या राणाशाही विरुद्ध विश्वेश्वर प्रसाद कोइराला यांना सर्वतोपरी दिलेली साथ, बिहार मधून नेपाळच्या राणाशाही विरुद्ध लिहिलेले लेख आणि विराटनगर मधून क्रांतिज्योत पेटवण्यासाठी केलेली रेडियो ट्रान्समिशन्स  या सर्वांमुळे नेपाळ क्रान्तिचे वॉल्टेयर ही संज्ञा मिळालेली. पुढे १९५१ मधे नेपाळची राणाशाही संपून लोकतंत्राची स्थापना झाली- एक पर्व संपले. यानंतर भरधाव केलेल साहित्य लेखन, पद्मश्री पुरस्कार, त्यांच्या कथेवर तिसरी कसम या सिनेमाची निर्मिती, आकाशवाणी वर स्टेशन डायरेक्टर म्हणून नियुक्ति, नंतर पद्मश्री परत करणे. १९७४ मधे पुनः जयप्रकाश नारायण यांच्या “छात्र” आंदोलनात सामिल- पुनः कैद, लोकसभा निवडणुकीत जनता पक्षाचा विजय- आणि प्रधानमंत्र्यांचा “चुनाव” होण्याच्या दिवशी सकाळी ऑपरेशन थियेटर मधे गेले, ते परतलेच नाहीत- १५/२० दिवसांच्या कोम्यामधे त्यांचे निधन झाले.

लेखनाच्या काळातले त्यांचे गाजलेले लेख म्हणजेच “रिपोर्ताज”. विभिन्न सामाजिक- राजनैतिक घटनांचे केलेले चित्रण. त्यांत अस्सल जिवंतपणा असायचा. कथा कादंबऱ्यांमधेही तो उतरला. इतकेच नव्हे तर त्यांच्या आसपास वावरणारी अनेकानेक पात्र त्यांच्या साहित्यात इतकी हुबेहुब उतरली आहेत की कित्येक वर्ष त्यांचे गांवकरी, जिल्हाकरी या- त्या व्यक्तींकडे बोट दाखवून म्हणू शकत- रेणुंच्या अमक्या कृतीतला अमका माणूस ना- तो हा!

अशा मातीशी घट्ट नात असलेल्या आवडत्या लेखकाला श्रद्धांजली म्हणून माझ्या या पहिल्यावहिल्या अनुवादित कथासंग्रहाचे नांव नित्यलीला! होती. फणीश्वरना रेणु यांनी हिंदीमधे कांही अत्यंत उत्कट आणि तरल साहित्य रचना केली आहे. माझ्या आवडीच्या लेखकाची मला भारी आवडलेली कथा म्हणजे नित्यलीला!

या संग्रहातील ती एक राणी ही स्त्रीच्या स्वाभिमानाच्या संघर्षाची कथा आहे.
डोळे माझे मिटता मिटता ही पुनः एका वेगळ्या वळणाची कथा आहे. धर्म वेगळे असोत, त्यांची भांडण असोत, पण एका धर्मातील चांगली व्यक्ती ही दुसऱ्या धर्माच्या चांगल्या व्यक्तीची शत्रु नसून कुठल्याही धर्मातील वाईट माणसच सर्व चांगल्या माणसांचे शत्रु असतात. थोड्या हलक्या फुलक्या वळणाने जाणारी ही कथा!
बायकाच त्या ही सुधा अरोरा यांची कथा-- कांहीही न बोलता सगळ सांगून जातो.
कोण मी कोण मी ही देखील एक फॅन्टसी -- सरकारी कारभारावर उजेड टाकणारी.
सागर- साद ही कथा तिसऱ्या पिढीच नात सांगणारी.

या सर्व कथांच एक सूत्र सांगताच येणार नाही आणि माझ्या मते कथा संग्रहातल्या सर्व कथा एक सारख्या, एकच विषय सूत्र घेऊन असूच नयेत. त्यांच्यात वैविध्य आणि वैचित्र्य असले पाहिजे

पण एक समान सूत्र सांगता येईल की त्या मला आवडल्या आणि त्यामधील वातावरण मराठी कथांच्या वातावरणापेक्षा इतक वेगळ आहे की मराठी वाचकाला यातला नवेपणा निश्चित आवडेल.

या संग्रहातील कथा वेळोवेळी अंतर्नाद, मिळून साऱ्याजणी, सत्याग्रही विचारधारा, पालकनीती व गांवकरी दैनिकामध्ये छापून आलेल्या आहेत. तसेच या पैकी बहुतेक कथा मला हिंदी मधील प्रथितयश मासिक हंसमधून वाचायला मिळाल्या, हे या ठिकाणी आवर्जून नमूद करावेसे वाटते.
----------------------------------------------------------------------