रविवार, 23 सितंबर 2012

अपर्णा -- अनुक्रम


APARNA  - BHAG 2 - 14
APARNA  - BHAG 2 - 13
APARNA  - BHAG 2 - 12
APARNA  - BHAG 2 - 11
APARNA  - BHAG 2 - 10
APARNA  - BHAG 1 - 9
APARNA  - BHAG 1 - 8
APARNA  - BHAG 1 - 7
APARNA  - BHAG 1 - 6
APARNA  - BHAG 1 - 5
APARNA  - BHAG 1 - 4
APARNA  - BHAG 1 - 3
APARNA  - BHAG 1 - 2
APARNA  - BHAG 1 - 1

मंगलवार, 7 अगस्त 2012

******* एक शहर मेले त्याची गोष्ट --भानू काळे - डॉ सदानंद बोरसे निवेदन

एक शहर मेले त्याची गोष्ट --भानू काळे निवेदन
...........................
...........................
...........................
अहो ,बरीच मराठी पुस्तक गुजरातीत गेली आहेत आता तुम्ही मला सहा गुजराती लेखकांची नाव सांगा बघू १ खोलीत आजूबाजूला बसलेल्या आम्हा सर्वानाच उद्देशुन जोषींनी प्रश्न केला ,पण बराच  प्रयत्न करूनही आम्हाला कोणालाच दोनतीनपेक्षा अधिक गुजराती लेखकांची नावे आठवेतनात .
मागे एकदा कुठल्याशा साहित्य संमेलनाचे उदघाटन करताना ,मराठीने इतर भाषांबरोबर  देवाण बरीच  केली ,पण घेवण मात्र पुरेशी केली नाही , अशा आशयाचे उदगार माजी पंतप्रधान व बहूभाषाकोविद पी .व्ही नरसिंहराव यांनी यांनी काढले होते. ,त्याची आठवण झाली .मराठीतील अनुवादाचे दालन किती ओकेबोके आहे याचीही तेव्हा जाणीव झाली .
युनायटेड स्टेट्स इन्फर्मेशन सर्व्हिसेसच्या (USIS च्या) एका योजनेंतर्गत चाळीसएक वर्षापुर्वी अनेक अमेरीकन पुस्तकांचा मराठीत  अनुवाद झाला होता व त्यावेळच्या अनेक मान्यवर लेखकांनी हे काम केले होते ,पण अनुवादाचा शब्दांगणिक ठरवला गेलेला मोबदला मराठीत आजही  आणि तेही स्वतंत्र लेखनालाही ,मिळणा-या मोबदल्यापेक्षा कितीतरी जास्त होता .हे त्यामागचे मोठे आकर्षण असावे .एरवी अनुवादाकडे चांगले लेखक फारसे वळत नाहीत, असे दिसते .या कामात पैसा व प्रतिष्ठा दोन्ही फरसे नाही ,हे कदाचित त्यामागचे एक कारण असावे.
     चांगला ,रसाळ ,अनुवाद करणे हे एकूणच खूप कठीण आहे ,हेही अनुवादांच्या  वानवेमागचे एक कारण असावे .साहीत्याचा एका भाषेतून दूस-या भाषेत अनुवाद करणे म्हणजे अत्तराच्या एका कुपीतले अत्तर दुस-या कुपीत ओतण्यासारखे आहे .हे काम वाटते तितके सोपे नाही ,थोडे अत्तर सांडणारच ,थोडासा सुगंध उडून जाणारच .मूळ लेखनापेक्षाही अनुवादाचे काम कधीकधी अधिक कठीण असू शकते .मूळ लेखक गरजेनुसार शब्द बदलू शकतो. पण एकदा प्रकाशित झालेल्या साहित्यातील शब्दही बदलायची अनुवादकाला मुभा नसते .लिओ टॉलस्टॉय यांच्या वॉर अँड पीस कादंबरीचा हिंदीत अनुवाद करताना भीष्म सहानी यांना शासनाने टॉलस्टॉयचा शब्दच काय ,पण एखादा स्वल्पविरामही बदलण्यास मनाई केली होती  .खूपदा यामुळे अनुवाद बोजड बनतात ,वाचकाच्या मनाची पकड घेत नाही .(कृष्णा हाथीसिंग या पंडित नेहरूंच्या भगिनी ,त्यांच्या With no Regrets या आत्मकथेचा साने गुरूजींनी उत्तम अनुवाद केला होता ,ज्याचे शीर्षक होते ना खंत ,ना खेद ,समर्पक अनुवादकाचा हा एक आदर्शच मानता येईल .)
        पण अनुवादकाची म्हणजे वाचनीय अनुवादकाची वाट ही अशी बिकट आहे म्हणूनच एक शहर मेले त्याची गोष्ट ,या कथासंग्रहाचे मनापासून स्वागत करावेसे वाटते आणि चांगल्या अनुवादकाचे आव्हान स्वीकारायला लीना मेहंदळे समर्थ आहेत ,याचीही खात्री वाटते  .भारतीय प्रशासकिय सेवेतील एका उच्चाधिकारी म्हणून ह्या प्रसिद्ध आहेतच ,पण त्याच जोडीने ह्या बहूभाषाकोविद  आहेत हेही नमूद करायला हवे .मुळ खानदेशातल्या असल्यातरी त्यांचे शिक्षण बिहारमधल्या दरभंगा जिल्ह्यासारख्या दूरच्या ठिकाणी झाले आहे .इंग्रजी ,संस्कृत ,उर्दू ,बंगाली ,नेपाळी मैथिली ,भोजपूरी ,पंजाबी ,ओरिया ,आसामी,गुजराती ,मारवाडी हरियाणवी ,अवधी ,ब्रज, छत्तीसगढी व अहिराणी या मराठी व्यतिरिक्तच्या तब्बल सतरा भाषा त्यांना ब-यापैकी येतात .यात जराही अतिशयोक्ती नाही .अंतर्नाद मासिकाच्या सप्टेंबर २००२ अंकातील हिंदिला धोपटणे थांबवा ,या आपल्या लेखात मेहेंदळे लिहतात ,यासर्व अनूभवांतून मी ठाम पणे सांगू शकते,की भाषांचा बोजा पडतो ,असा आरडा-ओरडा लोक उगीचच करतात .माझी धाकटी भाची आहे ,तिला वय वर्षे पाचपासून उत्तम हिंदी ,मराठी ,बंगाली ,ओरिया ,इंग्रजी आणि संस्कृत येऊ लागले आणि हसत -खेळत ते ती शिकली .कुठला आलाय बोजा ! आज तिच्या ज्ञानाच्या कथा इतरांपेक्षा कितीतरी अधिक विस्तीर्ण आहेत ,हे शेवटचे वाक्य महत्वाचे .
        हे बहूभाषापटूत्व अनुवादकालाही खूप उत्तम आहे -विशेषःत हिंदीतून मराठीत अनुवाद करताना .कारण हिंदीचा पट अन्य भाषांपेक्षा खूपच विशाल आहे. भौगोलिक ,ऐतिहासिक व सामाजिक वैविध्य तिच्यात खूप आढळते .प्रस्तुत संग्रहातील पटण्याचे अवधेश प्रीत यांची षौक ही कथा किंवा  फारबिसगंजचे फणीश्वरनाथ रेणू यांची पैलवानाचा ढोलक हा कथा किंवा मुंबईच्या सुधा अरोरा यांची तो काळा शुक्रवार ही कथा किंवा हिमाचल प्रदेशच्या एस.आर हरनोट यांची कागभाषा ही कथा यांचा तौलनिक अभ्यास खुप उपयुक्त ठरावा त्या दृष्टीने आपली भुमिका व्यक्त करणारे एखादे प्रास्ताविक लेखिकेने लिहिले असते ,तसेच मूळ लेखकाचा अल्प परीचय प्रत्येक कथेशेवटी दिला असता तर या संग्रहाचे संदर्भमूल्य अधिक वाढले असते ,असे वाटते .
        आणखी एक सूचना करावीशी वाटते  -कथांच्या पलीकडे जाऊन आता हिंदीतली एखादी महान कादंबरी (एखादा मास्टरपीस) लीना मेहंदळे यांनी मराठीत आणावी मराठीतील आनुभवाचे दालन खूप समृद्ध करणारी ती कृती असेल .
       असो .मराठीतील अनुवादांमध्ये ही एक महत्तवाची भर घातल्याबद्दल लीना मेहंदळे यांचे अभिनंदन .रसिक वाचकांचा उत्तम प्रतिसाद या संग्रहास मिळेल ,अशी आशा व्यक्त करतो.                                                   -भानु काळे
----------------------------------------------------------
मला जे भावले
श्रीमती लीना मेहंदळे हे एक बहूपेडी व्यक्तिमत्व आहे .त्यांना  प्रत्यक्ष भेटलेले किती तरी जण त्यांच्या व्यक्तिमत्वातील विविध पैलूंनी प्रभावित झालेले असतातच ,पण त्यांना  प्रत्यक्ष न भेटलेल्या आणि फक्त त्यांच्या लेखनातूनच त्यांच्याशी परिचित असलेल्या अनेकांनाही त्यांचे अनेक व्यक्तिविशेष ठळकपणे जाणवल्याशिवाय रहात नाहित .
    त्या स्वतः सर्जनशील लेखिका आहेतच ,पण मराठी ,हिंदी आणि इंग्रजीवरील प्रभुत्वामुळे त्यांनी स्वतःला भावलेल्या अनेक  साहित्यकृतींचा अनुवाद करून भाषांची परस्परसमृद्धीही साधली आहे.
     एक शहर मेले त्याची गोष्ट हे श्रीमती लीना मेहंदळे यांचे नवे पुस्तक ,त्यांच्या स्वतःच्या दोन कथा आणि इतर भाषांमधील अनुवादीत नऊ कथा अशा एकुण अकरा  कथापुष्पांचा हा गुच्छ हिंदी ,बंगाली ,तामिळ अशा वेगवेगळया भाषांमध्ये मुळात प्रसिद्ध झालेल्या या कथा त्यांनी निवडल्या.
या अकरा कथा वेगवेगळ्या विषयांवर आहेत .यात पर्यावरण आहे, मूल्यविचार आहे,  भावनिक घुसमट आहे ,पुरूषप्रधान संस्कृतीला तगमगणारी स्त्री आहे ,राजकिय टिप्पणी आहे ,अगदी पोलिसांची लैला  अशी हलकीफुलकी (तिच्यामध्येसुद्धा काही बोचरे ,ओरखडणारे उल्लेख येतातच,) कथासुद्धा आहे एका बाजूला या कथांमध्ये निसर्गाला  जवळ करणा-या , निसर्गात रमणा-या परंपरांचे धागे मूळ धरून आहेत ,तर दुस-या बाजूला भविष्यातील समस्यांचा  वेध घेणारी , क्षितिजापलिकडे डोकावू पाहणारी नजर  दिसते आणि असे  विषयांचे वैविध्य असलेल्या ,वेगवेगळया  लेखकांनी  लिहलेल्या  निरनिराळया कथा असूनसूद्धा  या सा-या कथांमधून एक समान धागा वाचकाला जाणवत राहतो. तो श्रीमती लीना मेहंदळे यांच्या  व्यक्तिमत्वाचा .
त्या स्वतः जवळजवळ तीन तपे भारतीय प्रशासकीय सेवेत  अधिकारीपदावर  आहेत .अंत्यंत कार्यक्षम ,स्वच्छ आणि संवेदनशील अधिकारी असा यथार्थ  लौकिक त्यांनी कमावला आहे .प्रशासनातील भ्रष्टाचार निपटण्याचा प्रयत्न करणे,ते अधिकाअधिक जनभिमुख बनवणे ,वेगवेगळया  कामांमध्ये लोकांचा प्रत्यक्षाप्रत्यक्ष सहभाग वाढवणे यासाठी त्यांचे प्रशासकिय आणि व्यक्तिगत पातळीवर सतत प्रयत्न चालू असतात .त्यांनी राबवलेल्या अनेक योजनांनधून प्रशासनाची पोलादी चौकट बाजूला सारून सामान्य माणसाला त्याचे  केंद्रस्थान बहाल केले आहे ,आणि हे सारे त्यांनी केले ,आजही करत आहेत, ते अगदी अकृत्रिम  स्नेहाळपणे ,डोळस संवेदनशीलतेने आणि कोणत्याही अभिनिवेशाविना  आणि सारेच विशेष त्यांच्या कथाविषय निवडीपासून लेखनापर्यंत ठळकपणे दिसतात .या अधिकारी लीना मेहंदळयांबरोबर आणखी एक लीना मेहंदळे वावरत असतात .एखाद्या उत्साही लहान बालकाचे निरागस कूतूहूल आणि एखाद्या निष्णात पदार्थ वैज्ञानिकाची गोष्टीच्या मुळापर्यत जाण्याची चिकित्सक जिज्ञासा एकाचवेळी बाळगणा-या लीना मेहंदळे .साहजिकच त्यांच्या कथांच्या आवडनिवडीमध्ये या लीना मेहंदळयांचेही प्रतिबिंब स्पष्ट दिसते .तसेच त्यांच्या स्वतःच्या कथालेखनामध्ये सुद्धा .निसर्गावर भरभरून प्रेम करणा-या लीना मेहंदळे .माणसामाणसातील भिंती अन् कुंपणे भेटून सा-यांना समान स्हेधाग्याने बांधण्याची इच्छा धरणा-या लीना मेहंदळे ,अशी कितीतरी रूपे कथांमधून भेटतात.
        या कथासंग्रहामध्ये नऊ कथा अनुवादीत आहेत .अनुवादामध्ये अनुवादकावर कठीण जबाबदारी असते .त्याला तो अनुवाद अनुवाद वाटणार नाही असा भाषेचा वापर करायचा असतो ,पण त्या जोडीलाच मूळ साहित्यकृतीचा आशय ,त्या साहित्यकृतीच्या स्थळ -काळ- व्यक्तींची वैशिष्टये ,त्या साहित्यकृतीचा प्रादेशिक विशेष जपणारा भाषेचा लहेजा आणि काही प्रमाणात मूळ लेखकाची शैली असे सारे कलम आपल्या लेखनावर लावून ते एकजीव करावे लागते .या कथासंग्रहात लीना मेहंदळयांनी अनुवादक म्हणून ही जबाबदारी अत्यंत समर्थपणे पेलली आहे .नितळ पाण्यासारखी पारदर्शी अशी स्वतःची लेखनशैली बनवून त्यांनी त्या -त्या अनुवादीत कथेची अन् मूळ कथाकारकाची  वैशिष्टये स्पष्ट दिसतील अशा पद्धतीने अनुवादकाचे काम केले आहे आणि कुठेही कलमाचा जोड जाणवणार नाही ,अशा पद्धतीने ही कलमकारी त्यांनी केली आहे.
      श्रीमती लीना मेहंदळयांनी सादर केलेले हे अकरा कथांचे कोलाज .वाचताना त्यातील प्रत्येक  तुकडयाचे स्वतंत्र ,स्वायत्त, वेगळेपण भिडतेच, पण सर्वात जास्त भावतात त्या या सा-या कोलाजमधून साकारणा-या, या सा-या तुकड्यांना सांधणा-या एकजीव -एकरस बनवणा-या बहूपेडी व्यक्तिमत्वाच्या लीना मेहंदळे.
--डॉ सदानंद बोरसे     
 ------------------------------------------------------------------------------------------



        

एक शहर मेले त्याची गोष्ट -- लेखकीय मनोगत

एक शहर मेले त्याची गोष्ट --  
लेखकाचे दोन शब्द ...

    मला लेखनाचा छंद जडला आणि लेखन जमू लागले .तरी पण कथा - कादंबऱ्लियाहण्याकडे माझा फारसा कल नाही. समाजातील प्रश्न जेंव्हा तीव्रतेने डोळयासमोर येतात आणि लेखनाला प्रवृत्त करतात तेव्हा प्रश्नांचे विवेचन आणि त्यावर उपाय कसे असावेत यावर विचारचक्र सुरु होते आणि लेखनाचा आकृतीबंध तसाच रहातो .पण एखादा प्रश्न आशाप्रकारे समोर येतो की, वाटत याच उत्तर कोणालाच नको आहे, कारण उत्तराला अपेक्षित आहे एक चिकाटी, एक वसा, एक व्रत, जे व्रतस्थ राहून दीर्घकाळ अंमलात अणावे लागले. पण समोर दिसतो आहे आजचा तत्कालिक फायदा. मग ज्या प्रश्नाच असतित्व  समजून घेण्याकरिता लोकांनी पाठ फिरवली, त्याचे विवेचन एखाद्या मार्मिक, तर्कशुद्ध लेखाने क्वचितच घडते, 
पण जी कथा लिहली गेली तिला दाद मिळाली हे समाधान  अशा माझ्या तीनच कथा या संग्रहात आहेत. एक शहर मेले त्याची गोष्ट ,मना अजाणा, आणि गोष्ट सन् २०३५ ची ! तिस-या कथेचे बीज माझ्या भावाचे आहे.  

पण अनुवादाची उर्मी माझ्या मनात सदैव असे . बालपण बिहारमध्ये, उन्हाळ्याची सुट्टी महाराष्ट्रात .त्यामुळे देशातील या दोन कोप-यांचे आपापले कॅनव्हास किती विशाल आणि एकमेकांपेक्षा वेगळे तरीही ,संवेदनांच्या जाणीवेतून एकमेकांना किती जवळचे हे नेहमी प्रत्ययाला येई ,त्यातूनच मला भावलेल्या कथांचा अनुवाद करीत गेले .यातील बहूतेक अनुवादित कथा अंतर्नाद मासिकामध्ये छापून आल्या  आहेत.
    मूळ कथा वाचनाचा स्रोत म्हणजे हंस ,नया ,ज्ञानोदय ,अक्षरपर्व ,कथादेश यासारखी नियतकालीन  हिंदी मासिक किंवा लेखकांचे कथासंग्रह .
     यानिमित्ताने माझ्या लेखकांचा  छोटा परीचय करून देणे मला आवश्यक वाटते .श्री.विभूति भूषण दास  गुप्ता (सेई महावर्षार राड्गाजल  ) हे स्वातंत्र सैनिक १९३० च्या आसपास ते बिहारमध्ये खतरनाक पोलिटिकल कैदी होते ,बरेचदा जेल मध्ये गेले .ते कोणी लेखक नव्हते ,पण स्वातंत्र्यानंतर त्या काळच्या आठवणी सांगणारे काही लेख त्यांनी लिहले .त्यामधील अगदी कोवळया वयात फाशी गेलेल्या वैकुंठ शुक्ल या क्रांतिकारकाची स्मरणगाथा अतिशय हेलावून टाकणारी आहे मूळ बंगालीतून  इंग्रजी ,हिंदी व आता मराठी असा प्रवास आहे .वैकुंठ शुक्ल यांचे नातू व वरिष्ठ इनकमटॅक्स  कमिश्नर शुक्ल यांनी वैकुंठ शुक्लाच्या खटल्याचा पूर्ण  इतिहास व संदर्भ संकलित करून पुस्तक छापल्यामुळे ही स्मरणगाथा आपल्यापर्यत पोचू शकली.
    श्री .फणीश्वरनाथ रेणू (पैलवानाचा ढोलक ) हे देखील स्वातंत्रसैनिक ,शिवाय नेपाळच्या लोकशाही संग्रमासाठी कोईराला परिवाराबरोबर राहून  आंदोलन चालविण्यात अग्रणी .त्याचा दुसरा परिचय ग्रामीण जीवनाचे अत्यंत प्रभावी चित्रण करणारा कथा-कादंबरीकार म्हणून आहे .त्यांच्या तीसरी कसम ,या कथेची भुरळ राज कपूरलादेखील पडली व त्यावर सिनेमा निघाला .त्यांनी केलेले व्यक्तीचित्रण खूप उदात्त वाटत असले तरी त्यांचे समकालीन लोक सांगतात की उदात्त व्यक्ती रेणूंच्या आसपास वावरल्या आहेत, त्यांचा कोणताही कथानायक काल्पनिक नव्हता .गोनीदांच्या लेखनाच्या बाजाशी बरेचसे साम्य असलेला हा लेखक . आणिबाणिच्या काळात ते जय प्रकाशजींच्या बरोबर लढले आणि त्या तणावातच पोटाच्या आजाराने लहान वयातच मरण पावले.
      बाकी सर्व लेखक वर्तमानकाळात जोरदार लेखन करणा-यांपैकी आहेत .अवधेश प्रीत (षौक) दैनिक हिंदुस्थानचे पटणा येथील ब्युरोचीफ आहेत .त्यांची राजकीय जाणीव किती प्रगल्भ आहे हे अमेरिका व सद्दाम हुसेन यांच्या इतिहासासाठी चौधरी आणि अरबी घोडा ही प्रतिके त्यावरून दिसून येते .लक्ष्मी कण्णन् (इंडिया गेट) तामिळमधल्या प्रसिद्ध लेखिका असून ,त्यांच्या हिंदी अनुवादित कथांचे तीन संग्रह उपलब्ध आहेत .सुधा अरोरा (तो काळा शुक्रवार )हिंदीच्याच प्रसिद्ध लेखिका आहेत .या दोघीही स्त्रियांचे प्रश्न हिरिरीने मांडणा-या म्हणून ओळखल्या जातात. अनिता अग्निहोत्री (अरूप रूप) या वरिष्ठ आयएएस अधिकारी व बंगालीच्या प्रसिद्ध लेखिका आहेत .नोकरीच्या निमित्ताने सामाजिक -प्रशासकीय जीवन फार जवळून पाहणा-या व अत्यंत मार्मिकपणे लेखणीतून मांडणा-या म्हणून ख्यातनाम आहेत .शिवाय माझी सख्खी वहिनी. आमच्या गावाच्या प्रेमात पडली आणि ही उत्कृष्ट कथा लिहून काढली .एस.आर.हरनोट (कागभाषा) हे ग्रामिण भारताच्या मानसिकतेवर विलक्षण पकड असलेले आणि त्यामध्ये राजकारणाने जो उच्छाद मांडला त्याचे नेमके चित्रण करणारे लेखक. हिमाचल प्रदेशमधील या वरिष्ठ अधिका-याला हिंदी साहित्य जगताचे कित्येक पुरस्कार मिळाले आहेत . रोमेश जोशी (पोलिसांची लैला )हे त्यांच्या खुमासदार लेखनासाठी ओळखले जातात.
     या सर्व लेखकांमुळे तसेच त्यांना छापणा-या मासिकांमुळे माझे साहित्यिक विश्व समृद्ध झाले आहे ,म्हणून त्यांचे आभार मानणे हे मी कर्तव्य समजते ,कथा संग्रहाचे प्रकाशन मनःपूर्वक हाती घेतल्याबद्दल सुनिताराजे पवार यांचे व सुंदर  मुखपृष्ठाबद्दल चित्रकार अभय जोशी यांचेही आभार मानले पाहिजेत .अंतर्नादचे संपादक भानु काळे यांचे मात्र आभार मानत नाही .बहुतेक कथा -सारांशाचे पहिले श्रोते तेच होते व लगेच, लीनाताई ,ही कथा अनुवाद करून द्याच ,आपल्या वाचकांना आवडेल ,अशी प्रतिक्रिया देऊन पाठपुरावा करून लिहून घेत असतात .कथासंग्रहाची प्रस्तावना  लिहिल्याबद्दल त्यांचे व डॉ .बोरस या दोघांचे ऋणनिर्देश करून माझे दोन शब्द आवरते घेते.
---------------------------------------------------------------------
     
  

सोमवार, 6 अगस्त 2012

इंडिया गेट पूर्ण -- लक्ष्मी कण्णन अंतर्नाद

इंडिया गेट

मूळ तामिळ कथा- लक्ष्मी कण्णन्

हिंदी पक्राशन हंस मासिक. मराठी प्रकाशन अंतर्नाद मासिक


मद्रासचा मरीना बीच म्हणजे बालपणापासून पद्मिनीची विरंगुळयाची जागा समुद्राचा अफाट पसारा, त्याला पलीकडे क्षितीजाची किनार आणि अलीकडे उसाळणाऱ्या लाटा.

रेतीवर काहीबाही रेघा काढणाऱ्या पद्माच्या मनात एकच विचार होता .... आता दिल्लीला गेल्यावर समुद्राचा सहवास आपल्याला दुरावेल. समुद्र नसलेल्या शहरात मन रमेल का आपलं?

तसं दिल्ली शहराबद्दल आकर्षण तिच्या मनात उदयाला येत होतच. खास करून तिथे जी नवीन व्यक्ती साथीला असेल तिचं आकर्षण ...बलरामन. .

बलरामन कसा आहे? कसा वागेल आपल्याशी? एकदाच आपण त्याला पाहिल बस, तो आणि त्याचे लोक मुलगी पहायला आले होते. तेव्हा त्याच्या लहान आणि मोठया भावाच्या तुलनेत तो दिसायला खूपच चांगला होता, एवढं पाहिल होत आपण आणि मग एकदम लग्न ठरूनच गेल. आधी त्याच्या मोठया भावाच पत्र आलं... आमच्यातर्फे नो ऑब्जेक्शन .

पद्मिनीला हसू आल आणि थोडासा रागपण. ही काय त्याच्या ऑफिसची फाइल होती ... सँकशन्ड, नो ऑब्जेक्शन सारखे रिमार्क लिहायला.

पण वडील खुशीत होते. सगळी देवीची कृपा. मुलगा पण आपल्या पद्मसारखा स्टेट बँकेतच नोकरीला आहे. जोडी चांगली जमून जाईल.

पण अहो, मुलाचा भाऊ सांगत होता की त्याची बदली दिल्लीत होणार म्हण. इतक्या लांब का मुलगी द्यायची? आईच्या शब्दांत काळजी होती.

का नाही? आता दिल्ली तेवढी लांब राहीली नाही. शिवाय तो प्रमोशनवर जात आहे, ही पण चांगली बाजू नाही का? .. वडिलांचा आत्मविश्वास .

आणि मग पद्मिनीच्या नोकरीच काय होणार? नोकरीला लागल्यापासून ती इथे मद्रासच्या ब्रँचलाच आहे -- आईची चिंता अजून संपत नव्हती.

त्याबद्दल मग बोलू. आता मी जरा मुहूर्ताच विचारून येतो.

त्या रात्री पद्मिनी खूप वेळ हाच विचार करत बसली. आपण नोकरी करणार मद्रासला. नवरा दिल्लीत. मग वडील याला चांगली जोडी कशाच्या आधारे म्हणतात?

मला हे लग्न करायचे नाही, तिने दुस-या दिवशी आई-वडिलांना सांगून टाकल.

... इतक्या टफ कॅम्पिटीशनच्या परीक्षा आणि इंटरव्ह्यु वगैरे होऊन बँकेत ऑफिसरची नोकरी मिळाली. इथेच आरामशीर ही नोकरी करायची.

बरोबर आहे तिच, आपण दुसरा मुलगा पाहू तिच्यासाठी. आताच कुठे पोरीचा जम बसतो आहे बँकेत, आईने तिची बाजू उचलून धरली.

वारे वा, म्हणे दुसरा मुलगा पाहू, अगं इतकं चांगल स्थळ लवकर मिळणार आहे का? मुलगा सुस्वरूप आहे. चांगला पगार आहे. आणखी काय पाहिजे? पद्म, तू काळजी करू नकोस. आज संध्याकाळी याद्या पक्क्या करायला ते लोक येणार आहेत. तेंव्हा आपण सुचवू की बलरामने दिल्लीऐवजी इथे मद्रासला वदली मागून घ्यावी.

त्यांचा हात हातात घेत पद्मिनी म्हणाली ... प्लीज बाबा, नक्की विचारा हं त्यांना. संध्याकाळी बलरामन, त्याचे मोठे भाऊ, वहिन्या आणि काका आले. मुहूर्त ठरला. मग कापड-चोपड, भांडी, दागिने, कॅश इत्यादी याद्या ठरू लागल्या, तसा आत बसून ऐकणाऱ्या पद्मिनीचा पार चढत गेला.

... मी नोकरी करते, कमावते ते पुरेसे नाही का? हा काय व्यापार मांडलाय?

कमला, ते काही बोलताहेत का बघ ना जरा. मला तरी गप्पच बसलेले वाटतात, तिने बहिणीला सांगितले.

, ते झाले वाटत? नाव घेणार नाहीस का? बहिणीने वेगळाच अर्थ काढून तिला चिडवल. मग थोडा वेळ बाहेर डोकावून म्हणाली ...

, हो गं ताई, गप्पच बसले आहेत. मोठे भाऊच सगळं ठरवताहेत ...मग आपण कशाला मेहनत करायची, असं म्हणत असतील.

तेवढ्यात पद्मिनीच्या कानांनी वडिलांचा आवाज टिपला. मी काय म्हणतो ...म्हणजे गैरसमज नसावा, पण जावईबापूंनी जर दिल्ली प्रमोशनसाठी अजून होकार कळवला नसेल तर तो बेत रद्द करून इथेच रहायला काय हरकत आहे? पद्मची पण इथे नोकरी आहे. अडीअडचणीत आम्ही आहोतच.

काय बोलताय? अहो, त्याने प्रमोशन सोडायच का? असला मर्खपणा होणार नाही आमच्याकडून.

नाही नाही, मला तस म्हणायच नव्हत ...वडल अजीजीच्या सुरात म्हणाले - प्रमोशन ही तर आनंदाचीच बाब आहे, पण आम्ही पद्मिनीबद्दल विचार करत होतो.

तिला नोकरी सोडायला सांगायची. इतकं चांगल स्थळ मिळणार नाही तुम्हाला. , आता तुम्हाला नोकरी टिकवायची असेल तर आताच ठरवा. मग आम्ही पण दुसर स्थळ बघायला मोकळे. त्याचा भाऊ म्हणाला.

अहो, अस नाही म्हणत मी, पण मुलीची नोकरी आज जावईबापूंच्या बरोबरोची आहे. सर्व पर्याय तपासून पाहायचे, तर हीच वेळ आहे म्हणून मी विषय काढला इतकच, अस बोलून वडील गप्प झाले.

पद्मिनी दाराजवळच उभी राहून ऐकत होती. एक स्त्री कंठ ऐकू आला. वहिनी असावी मुलाची.

मामा, आता आम्ही स्वतःच्या तोंडाने स्वतःची बढाई सांगू नये हे खरं. पण मुलगी रंगान सावळी आहे, तरी आम्ही तिला पसंद केली. मग तुम्ही तिच्या नोकरीच काय घेऊन बसलाय? आणि नोकरीच्या बाबतीत स्त्रियांनी पुरूषांच्या बरोबरोची हाव कशाला धरावी?

बरोबर आहे अक्काच म्हणणं, दुस-या भावजयीने तिची री ओढली.

आपण कॉफी तर घ्या ,साखर ठीक आहे ना? वडिलांनी सावरून घेत म्हटल. पद्मिनी ऐकत होती ...बलरामन काय बोलला तिच्या कानांनी टिपल नाही बहूधा.

ए कमला, ते काय बोलतात बघ तरी. तिने पुन्हा बहिणीला हलवलं.

कशाबद्दल?

या पोस्टिंगबद्दल.

काही नाही. नुसत गप्प बसून कॉफीच पिताना दिसतायत, कमलाने बाहेर नीट पाहून सांगितले.

ताई...

हं...

ही इज नो गुड. मी सांगते, तुला झेपणार नाही हे लग्न. आताच नाही सांगून टाक.

यू नॉटी एंजल, अस म्हणून तिने बहीणीच्या गालावर चापट मारली.

रात्री घरात गरमागरम चर्चा झाली. जो मुलगा एकदम गप्प, जड होऊन बसून राहिला, त्याला माझ्या कामात इंटरेस्ट नाही, त्याच्याशी मी लग्न का करू ? आफटरऑल, आम्ही दोघे एकाच बँक परिक्षेतून पास होऊन ऑफिसर झालोय. त्याच्या वयाला येईपर्यत माझा पण पगार त्याच्या इतकाच होईल, एका दमात एवढं म्हणून टाकताना पद्मिनी बरीच गोंधळली, पण तरीही पुढे म्हणाली, मी पण एक कमावती मुलगी आहे. तरी यांना हुंड्यात भांडी, दागिने, कपडे आणि कॅश द्यायची. ही रूढी आहे, म्हणून मन मारून स्वीकार करायचा. एवढं ठीक, पण नोकरी का सोडायची ? आणि माझा सावळा रंग जर पसंत नाही तर माझ्यावर दया दाखवायची काय गरज ?

असाच एखादा मुलगा असेल तर तो ब्राह्ण तरी असेल का? शिवाय स्मार्त शाखेचा पाहिजे. गोत्र जुळलं पाहिजेत. पत्रिकेत दोष नसावा. अगं मुलीच्या बापाला हे सगळं बघाव लागत.

पण असला ब्राह्राण काय कामाचा? त्यापेक्षा वाटत की अशा माणसाशी लग्न व्हावं ज्याचे आपले विचार जळतील. मग तो ब्राह्राण नसेना का ...दुस-या, अगदी खालच्या जातीचा असला तरी चालेल.

शिव, शिव काय बोलतेस तू हे? पंचवीस वर्षाचं वय झालं तुझं. ब्राह्राणकन्या एवढे दिवस लग्नाची राहीली तर लोकांची नजर पडते. तिच्या केसावर प्रेमाने हात फिरवत वडील म्हणाले, पद्मिनी, मला एक सुचतयं. तुझ्याच बदलीबाबत का नाही विचारू या? सिंपेथेटिक ग्राऊंडवर होईल तुझी दिल्लीत बदली.

मला नाही आवडत विचारायला. नुकतीच मी ट्रेनिंगवर जाऊन आले तेव्हा पण बाहेर देणार ते पोस्टिंग बदलून मला इथे अडजस्ट करून दिल होत.

अग विचारून तर बघ. घ्यायचा क चान्स, आता आईला पण आशा वाटू लागली.

दुसऱ्या दिवशीचा सीन अगदी वेगळा होता. पद्मिनी विचारायला गेली काय आणि मॅनेजरने अभिनंदन केले काय. सगळी कुलदेवीचीच कृपा. मॅनेजरने तिची विनंती मान्य तर केलीच, शिवाय तिच्या उत्तम कामावर खूष होऊन प्रमोशनची शिफारस केली होती, हेही सांगितले. आता हेड ऑफिसने बदलीची परवानगी दिली तर ती प्रमोशन घेऊनच दिल्लीला जाणार होती.

....दिल्ली कितीतरी मोठ शहर आहे. राजधानी आहे, तिथे पोचल्यावर आपल्या सीमा विस्तारतील. बलरामन पण जरा मोकळा होईल, मोकळा वागेल.

मद्रासला लग्न उरकल्यावर पद्मिनीला घेऊन वऱ्हाड तिच्या सासरी तिरूचिरापल्लीला आलं. इथे पण घर नातेवाईकांनी भरलेल होत. पसारा मोठा पण सगळ्यांची मनोवृत्ती सारखीच.

काय रे बालू, नशीब काढलस बेटया, एकीकडे लग्न, एकीकडे प्रमोशन एक नातेवाईक.

हो, काय हुशार आहे आपला बालू आणि आता प्रमोशन पण, राजयोग आहे त्याच्या पत्रिकेत, दुसरा एक.

भेटीला आलेला प्रत्येकजण त्याचे अभिनंदन करत होता.

...मी इथे दगडासारखी भली मोठी बसलेली यांना दिसत नाही का? मी पण प्रमोशनवरच दिल्लीला चाललेय. अन् तुलना करायचीच म्हटल तर मलाच अॅक्सीलरेटेड प्रमोशन आहे. पद्मिनीच्या मनात आलं.

...जाऊ दे. निदान बलरामन तरी कसा आहे पाहू या.

कुणी जवळ नाहीसं पाहून त्याच्याजवळ जात ती म्हणाली,

कॉग्रॅच्युलेशन, तुमच्या प्रमोशनबद्दल.

बलरामने तिच्याकडे आश्चर्याचा कटाक्ष टाकला आणि उठून उभा राहत फक्त एवढंच बोलला, थॅक्.

मला पण प्रमोशन आणि दिल्ली ट्रान्सफर मिळाली आहे.

माहीत आहे. तुझ्या वडिलांनी सांगितल होत. एवढं बोलून लरामन चानक तिथून निघून गेला.

ही उपेक्षा पद्मिनीला नवीन होती. रात्री त्या नातेवाईकांच्या गर्दीतच दमलेली पद्मिनी अंगाच मुटकुळ करून झोपली. अर्धवट झोपेतच असताना कुणीतरी खांदे धरून हलवत म्हणाल,

ऊठ, ऊठ.

पद्मिनी उठून बसली. ती बलरामनची मोठी भावजय होती.

ऊठ, पहाट होत आली, अजूनही झोपून राहिलीस तर सगळे हसतील.

सगळीकडे अजून गुडूप अंधाच होता. सकाळ झाली? पद्मिनीने विचारल.

मग? अग साडेचार वाजले. उठून आवर पटापट. प काम पडली आहेत.

तेवढयात दुसरी भावजय तिथे आली. उठलीस, चल, या घरात नवीन आहेस तेव्हा तुला इथली व्यवस्था समजावून देते. तुझं दात घासण वगैरे झाल्यानंतर घरातल्या सगळ्या मोठया बायकांच्या पाया पडायच... म्हणजे सासूबाई, थोरल्या सासूबाई, आतेसासूबाई, थोडया वेळाने दूधवाला येईल. तोपर्यत कोपऱ्यातल्या भांडयातल दही घुसळून लोणी काढून ठेवायच. दूध आल्यावर ते तापवून आधी डिकॉक्शन कॉफी करून ती घरातल्या सगळया पुरूषांना आणि मोठया बायकांना द्यायची. मग आपण कॉफी प्यायची.

"ठीक आहे" . चादरी उशाची घडी करता-करता पद्मिनी म्हणाली.

रांगोळी काढता येते ना? आज मंगळवार आहे. सांग बरं मंगळवारी कोणती रांगोळी काढायची असते? बघू येत का तुला.

का, मंगळवारी काही खास रांगोळी असते?

दोन्ही भावजय फिसकन् हसल्या. मग मोठी म्हणाली-- जाऊ दे. शिकलेली आहे, नोकरी करते म्हणुन बऱ्याच गोष्टी येत नसतील... रांगोळी आम्ही काढू गं, जाऊन हिने सांगितल्याप्रमाणे कर.

पद्मिनी परसदारी गेली.

उठलीस? ते बघ त्या पाणी तापवायच्या खोलीत खिडकीवर कोळश्याची पूड ठेवलीय. दात घासून ये. तिची सासू म्हणाली.

कोळश्याची पूड, दिवा ऑन करून पद्मिनी खोलीत गेली. खिडकीत वर्तमानपत्राच्या एका कागदावर कोळसा पूड होती. त्यात चिमण्यांनी घाण करून ठेवली होती. त्यातूनच हातावर पूड घेऊन तिच्या नणंद- जावा दात घासत होत्या. पद्मिनी घरातून आपला ब्रश, पेस्ट घेऊन गेली, तशी सगळयांनी एकमेकींना डोळयांनी खुणा केल्या आणि कोपराने ढोसत त्यांची कुजबूज सुरू झाली.

आत येऊन पद्मिनी सासूला नमस्कार करू लागली तोच आतेसासू आणि आजीसासू तिथे आल्या. त्यांनी केशवपन केलं होत. नमस्कारानंतर त्या म्हणाल्या, मोठ्या भाग्याची आहेस हो, म्हणून या घरात आलीस.

पद्मिनीच्या मनात आलं - पण या घरात आल्यावर तुमच्या भाग्यात मात्र केशवपनच आले. मग मोठी भाग्याची कशी काय?

ती ताक करायला गेली. भल्या थोरल्या हंडयात तशीच मोठी रवि होती. त्याची दह्या - लोण्याने माखलेली दोरी ओढून घुसळताना सारखी निसटत होती.

सांभाळून, अगे दही सगळीकडे उडतयं ...तिची आतेसासू म्हणाली. तशी नणंदा-जावांना हसायला अजून एक विषय मिळाला.

मग सगळ्या बायकांनी मिळून दूध तापवून डिकॉक्शन कॉफी करून मोठ्यांना नेऊन दिली. मग पुरूषांना. बलरामने तिच्याकडे न पाहताच तिचा स्पर्श टाळत कॉफी घेतली आणि गट्क-गट्क करून पिऊन टाकली. सर्वात शेवटी घरातल्या सुनांचा नंबर लागला. उरलीसुरली शेवटची कॉफी आणि त्यात मिसळलेला डिकॉक्शनचा गाळपण होता. नंतर आंघोळी.

मग जावांबरोबर पद्मिनी पण चटपट जेवणाच्या तयारीला लागली. पहिल्या पंक्तिला गरमगरम जेवणासाठी मुलं आणि पुरूष मंडळी बसली. सांबार, रस्सम, भात चटणी ...

सर्व सासवा तिथे उभ्या राहून धमकावत होत्या, अगं, नीट वाढा, कंजुषी करू नका .बिचारी मुल माझी. पावसापाण्यातही काम करून पैसा कमवून आणतात...

स्वतःच्या हाताने पुरूषांना तप वाढण्याचं काम सासूबाईकडे होतं. वेगवेगळे आवाज काढत, ढेकरा देत, उघड्या पोटावरून आणि शरीरावरून हात फिरवत पुरूष मंडळी जेवत होती.

रस्सम...,

सांबार...,

भात....,

पाणी....अरे कोणी आहे का? तीनदा मी पाणी मागीतल.

...खोलीभर असेच आवाज येत होते. एकाही माणसाने जेवत असताना वाढणाऱ्या बाईकडे ढुंकून पाहिल नव्हतं की चांगल्या स्वयंपाकाची दाद दिली नव्हती.

सर्वाना शेवटचा भात वाढला, त्यात खड्डा करून सर्वांनी त्यात दही घेतलं. मग दह्याचे भुरके मारत, दहीभात जेवून सर्व आचवाला उठले. सुनांनी मिळून उष्टी भांडी उचलली आणि फरशी पुसली. ती वाळल्यावर म्हताऱ्या बायामंडळींची पंगत बसली.

हूं. हूं. कमीच वाढ भात. आता हे शरीर किती पचवणार? म्हणत म्हणत मागून मागून म्हतारी मंडळी जेवत होती. भाताच्या पातेल्या रिकाम्या होत होत्या.

कम्मू. भाताच पातेल आणं.

आणते...म्हणत तिची दुसरी जाऊ आत गेली. घरात तिने पद्मिनीला समजावलं ...अगं त्या दिवसातून एकदाच खातात ना, म्हणून जरा जास्त जेवतात.

सांबर, रस्सम, दही ...एकेक करून अन्न संपत होतं.

जेवणानंतर कसबसं ती मंडळी उठली. पुन्हा एकदा उष्टी-सारवणी करून, फरशी वाळण्याची वाट न पाहताच सुनांची पंगत बसली. एव्हाना दुपारचे दोन वाजायला आले होते. भांडी पुढयात घेऊन सगळया जेवत होत्या. थंड भात, थोडीशी भाजी, पाणी टाकून वाढवलेले सांबार, रस्सम कधीच संपलं होतं. त्या उरल्या सुरल्या अन्नाबरोबर पापड घेऊन, त्याची चव वाढवत त्या जेवत होत्या. सकाळी येणारे खमंग वास कधीच हवेत विरले होते. दह्याऐवजी लोणी घुसळून निघालेले पातळ ताकच सुनांसाठी उरले होते.

...बिच्चारे आमचे पुरूष, उन्हातान्हात कामाला जाऊन पैसे कमवून आणतात...तिला ते शब्द आठवत होते.

मग मी पण नाही का उन्हातान्हात कामावर जाऊन पैसे कमवून आणत? आणि सकाळपासून आम्ही एवढ्या राब-राब राबलो. ते काम दिसतचं नाही का यांच्या डोळयांना? पद्मिनीच्या मनात विचार येत होते.

ताक-भात तिच्या घशाखाली उतरत नव्हता. इतर भावजया मात्र त्याच भाताचे मोठे मोठे गोळे करून गपागपा गिळत होत्या. पद्मिनी तशीच उठली.

अगं तू काहीच खाल्ल नाहीस.

नको, क नाही. ओकरी येईल असं वाटतय.

आत्तापासूनच? पुन्हा सगळ्याजणी फिसकन् हसल्या.

तिसऱ्यांदा उष्टी-खरकटी झाल्यावर कुठे पद्मिनीने पाठ सरळ केली. बाहेरच्या खोलीत तमाम पुरूष मंडळी कुंभकर्णाचा अवतार धारण करून डाराडूर पडलेली होती. आत स्वयंपाकघरात मोठी जाऊ रगडयावर इडलीचे पीठ वाटत होती, तर दुसरी उन्हात पापड व इतर वाळवण पसरत होती.

पद्मिनी आतल्या अंगणात कोपऱ्यातल्या एका चटईवर बसली. इथे थोड ऊन येत होतं. ते अंगाला बरं वाटत होत ... अंगणाच्या बाजूने उंच भिंत होती. भिंतीत दोन रूंद पल्ल्यांचा दरवाजा होता. त्यावर तोरणाकार नक्षी केली होती.

...मी महामूर्ख आहे. बी.. झाले. बँकेची कठीण परीक्षा पास झाले. बँकेत चांगल्या कामगिरीमुळे लवकर प्रमोशन मिळाल. इतकं सगळ असून मी काय केले? तर या घम्या, पाठीचा कणा नसलेल्या माणसापुढे मंगळसुत्र घालून घेण्यासाठी मान झूकावली. माझी बुद्धी कुठे गेली होती?

तिसरी जाऊ तिच्याजवळ येऊन टेकली. काय पद्मिनी, तुझ मन रमत नाही इथे असं दिसतयं? मग हळूच तिच्या अगदी जवळ जात म्हणाली ...

तुझ्यासारख्या सुशिक्षित मुलीला हे सगळं जंगलीपण वाटत असेल नाही? पण आपल्या तामिळ लोकांच्या रीतीभाती अशाच आहेत. हा सर्व गावही तसाच आहे, पण तू मनाला लावून घेऊ नकोस. तुझा तर दोनच दिवसांचा प्रश्न आहे. मन घट्ट कर. एकदा दिल्लीला गेलीस की सुटसील इथून. मग तुझच राज्य.

पद्मिनीने हसायचा प्रयत्न केला, पण तिच मन उदासच राहिल. जाऊबाई काहीतरी कामासाठी निघून गेली.

...कुठल्या कैदेत मी जाणूनबूजून येऊन अडकले? हे समोरच दार उघडून मी निघून गेले तर? इतका सोपा रस्ता असूनही या घरातल्या बायका-सुना पळून का नाही गेल्या? भिंतीला लागन इतर घरांच्या भिंती आहेत. प्रत्येक भिंतीत असचं एक दार, मग तिथल्या बायकाही पळून का नाही जात त्यांना भिती वाटते का की, इथून निघून त्या कुठे जातील, काय खातील? प्रत्येकीची पोटाची भूक वाढलेली. उरलंसुरलं खाऊन मनात राक्षसी भूक ठेवणाऱ्या या बायका ...ढेकर देत देत गळ्यापर्यत खाऊन घेणाऱ्या सासवा, शिळा भात, पाणी घातलेलं रस्सम किंवा बेचव ताक आणि पातेल्याला करवडलेली शितं खरवडून घेणाऱ्या जावा, त्यातच अमृताची गोडी माननाऱ्या.

गावातल्या इतक्या मुलींच्या, इतक्या सुनांच्या मनातसुद्धा येत नाही हे दार उघडून पलीकडे जावंसं? काय असेल पलीकडे? एक विस्तृत आव्हान देणारं जग असेल की असाच ब्राह्राणांच्या कडक रितीरिवाजात अडकलेला दुसरा एखादा मध्यवर्गीय संसार असेल?

कुणाची तरी चाहूल लागून तिने मागे वळून पाहीले. बलरामन होता. तिच्या तोंडावर हसू आल, पण तिने बघताच बलरामन शेजारच्या बाथरूममध्ये सा घसला जणू काही तिला पाहिलेच नाही.

...या माणसाबरोबर दिल्लीला जायचंय? हा खरचं कोणी माणूस आहे की तामिळींच्या पर्वापार प्रथा प्रतीबिंबीत करणारं, जपणार एक यंत्र?

दिल्लीत सुरवातीला पद्मिनी थोडी भांबावली होती. हे तर जणू तिरूचिरापल्लीचचं थोड वेगळ रूप होतं असं वाटलं. करोलबागेच्या गजबजलेल्या वस्तीत त्यांना घर मिळालं होत. दोन छोट्या- छोटया खोल्या. त्याला लागुन पॅसेज. त्यामध्येच निम्म्या जागेत डायनिंग टेबल आणि खुर्च्या मांडल्या होत्या. उरलेल्या जागेत किचन टेबलं. एका खोलीला एक बाल्कनी होती, त्यात जेमतेम दोन माणसं उभी राहू शकत होती. तिथं उभं राहिले की ती पूर्ण गल्लीला आणि सारी गल्ली तिला पाहू शकत होती. घरं इतकी जवळ जवळ की तिच्या खोलीची खिडकी उघडली तर शेजारच्यांच्या खिडक्यांना ती हात लावू शकत होती. आणि त्या सर्व खिडक्यांमधून सदा उत्सुकतेने पाहणारे डोळे.

पण तिची बँक मात्र कनॉट प्लेसला होती. त्या भागात येऊन पद्मिनीचं मन प्रफुल्लित होत असे. लंच अवरमध्ये ती बाजारात फेरफटका मारून यायची. चमकदार दुकान, त्यातल्या सजवलेल्या वस्तू, लोकांची गर्दी, त्यात प्रत्येक प्रांताचे, वंशाचे लोक मिसळलेले. हे सर्व तिला बरं वाटायच. आपण खप विस्तीर्ण जगात आलो आहोत, इथे खूप पाहायला, बोलायला मिळेल, संधी मिळेल, असा तिला विश्वास होता. अन्य व्यवसायिकांबरोबर ओळख व्हाव्यात, त्याचं क्षेत्र समजून घ्याव, अशी तिला हौस होती. ते सर्व या कॅनॉट प्लेसमध्ये, या दिल्लीमध्ये मिळू शकणार होत. विशेषकरून दिल्लीत निरनिराळया क्षेत्रांत काम करणाऱ्या स्त्रिया पाहिल्या की त्यांच्याबरोबर बोलावं, त्यांच अनुभव विचारावेत, तिच्या बीटमधल्या लेडी कॉन्स्टेबलचे इंटरव्ह्यु घ्यावेत, एखाद्या तामिळ मासिकाला पाठवावे, असं तिला खूप वाटे, पण या कामापुढे दुसरं काही करता येत नव्हत. कामं आणि घर...

दिल्लीत स्वयंपाकी ठेवायची सोय नाही. इतका पैसा कुठून आणणार? दमलं तरी दमलं म्हणता येत नाही अशी ही दिल्ली.

बँकेतून घरी आल्या-आल्या पद्मिनी एका स्र तामिळी जेवणाची तयारी करण्यात गुतून पडायची. प्रत्येक डिशचे वेगळे नियम आठवतच ती एकीकडे नारळाची चटणी वाटायची, दुसरीकडे इडलीसाठी तांदूळ भिजत घालायची, कधी कशावर मोहरी वाटून लावायची ...जेवण तयार झाल्यावर बलरामनला बोलवायची. एकीकडे त्याला वाढत असतानाच दुसरीकडे आपण पण पोटात दोन घास ढकलायची, दमल्यामुळे तिला खावसं वाटत नसे. जेवण झाल्यावर टेबल आवरून पुसून ठेवायची, भांडी उचलायची, झाकपाक करायची...शी ...हे काय जगणं म्हणायचं?

बलरामन मात्र खरचं राजाप्रमाणे वागत होता. टेबलावर दोन ताट-वाटया मांडायच्या, पाण्याची भांडी घ्यायची, बेल वाजली तर दार उघडायच, बस्स एवढंच त्याच काम. एरव्ही सोफ्यावर पाय पसरून पेपर वाचत पडून रहायचा.

आजूबाजूची वस्ती तामिळच होती. प्रत्येक परिवार म्हणजे याचीच पुनरावृत्ती. तामिळ संस्कृती सांभाळणारी ही छोटी-छोटी बेटच जणू. पिढ्यानपिढया मध्यवर्गीय ब्राह्राणी परिपाठ सांभाळणारे हे समूह. इथे या करोलबागेतच तुम्हाला तिरुचि, तंजावर, कोईंबतूर, चेंगलपेट इत्यादी गावांची रूप दिसतीलं. छोटी-छोटी गॉसिपबाज मंडळं, नाही तर भजनी मंडळं.

यांच्याबद्दल का जावेने तिला आशा लावली होती? ...तिरूचिचे कष्ट काय दोन दिवसांपुरते, मग तूच तुझी राणी.

पण त्या कुग्रामातलं बीज घेऊन बलरामन दिल्लीला गेला काय किंवा न्यूयॉर्क अगर टोकियोला गेला काय, त्याचा संसार तसाच गठूळलेला राहणार. गाठोडं उघडणारच नाही कधी. हा बलरामन काय माणूस म्हणायचा?

सुट्टीत अर्नड लीव्ह टाकून दोघं गावी गेले. मद्रासचे दोन दिवस भुर्रकन संपले. मरीन बीच, शहाळयाचे पाणी, ताडगोळे, निळा हिरवा समुद्र, त्याचा अंगभर खेळणारा समुद्री वारा आणि त्यानंतर लगेच तिरूची.

तिथे गेल्यावर बलरामन पुन्हा आईबाळ झाला. तेच तोंड लपवायचं नाटक तिच्या वाटयाला आले. तेच सकाळी चार वाजता उठणं, सर्वाना नमस्कार, लोण काढण, पुरूषांना देऊन उरलेली डिकॉक्शनसहित प्यावी लागणारी कॉफी अणि उरल्यासुरल्या रस्सम् सांबारबरोबर मिळणारा शिळा ...ताजा भात.

...मी मर्ख ती मर्खच राहीले. बँकेच्या नोकरीत पुरूषांच्या बरोबरीने काम करून सुद्धा हा गाढवाचा बोजा मलाच उचलावा लागतोय. इथे आल्यावर कमावती असनही मला तिळभर सन्मान नाही, मग मी इथे आलीच कशाला?

मागच्या अंगणातले दार अजूनही बंदच होते. त्यात काहीच फरक पडणार नव्हता.

पद्मिनी, सगळयांना कॉफी कर.

दुपारचा हा अटळ कार्यक्रम तिच्या वाटयाला होता. ताज्या दुधाची, ताज्या डिकॉक्शनची कॉफी करून वाफाळलेले कप बलरामन आणि मोठया दिराच्या हातात देताना ती विचार करू लागली ...

पोटभर जेवून कुंभकर्णी झोप पुरी करून, नुकत्याच जांभया देत उठलेला, आळसावलेल्या शरीराचा तिचा दीर कसाबसा सातवी पर्ण करून आता शेती सांभाळत होता. आणि सर्वांवर हुकूमत गाजवत होता. दुसरा भाऊ मॅट्रिक आणि एका सरकारी खात्यात क्लार्क. त्या खालचा भाऊ एका शाळेत गणिताचा शिक्षक, पण बहूधा त्याला गणिताशिवाय इतर काहीच येत नसावे. या पुरूषांपेक्षा ती निश्चितच जास्त शिकली होती. तिचा पगारही कितीतरी जास्त होता. बलरामन त्या भावांपेक्षा उच्चशिक्षित. बँकेत चांगल्या पोस्टवर. पण तोही तोंड लपवून तिच्या हातून कॉफी घेत होता. एकदाही कुणी विचारत नव्हतं, पद्मिनी तू पण कॉफी घेतलीस का? तू पण बालूसारखी सुट्टीवर आली आहेस.

बलरामनच्या तोडीच्या पोस्टवर काम करत असूनसुद्धा या घरात इतर कमी शिक्षित किंवा अशिक्षित जावांना जे स्थान होत तेच ति पण होतं. ती एक स्त्री आहे आणि शिवाय या घरातली स. सुनेचे म्हणून जे काबाडकष्ट, जे रिवाज, जी बंधने ती सर्व तिने पाळली पाहिजेत. या स्त्रीपणापुढे आणि सूनपणापुढे तिची हुशारी, तिच व्यक्तीमत्व, तिची नोकरी, तिला बँकेमध्ये मिळलेला तिचा दर्जा त्या आळशी, गप्पिष्ट, कूपमंडक जावांइतकाच किंवा त्याहूनही खालचा होता, इतकं शिकून आणि नोकरी करूनही बाईला जर तिच्या घरातही मान मिळत नसेल तर तिने शिकावच कशाला? ती पण जावासारखी घरातच का नाही बसून राहात? मग तिची दखल कोणी न का घेईना.

दखल घेण्यावरून पद्मिनीला अचानक वाटलं की तीही इथल्या हवेसारखी अदृश्य झाली असावी. म्हणूनच कुणाला ती दिसत नाही. कॉफचे रिकामे कप ताटात गोळा करताना वाऱ्याची एक झूळूक तिच्या अंगावरून बाहेर गेली. तिला पण तसंच निघून जाता येईल का? सर्वाच्या नकळत, कुणाला न दिसता? तिला हसू आलं. ती अंगणात मोरीत कपबश्या विसळायला बसली

समोर तेच दार होत. तोरणाकार डिझाईनच. त्या दारान तिच दिल्लीच विस्तृत जग कोंडून टाकल होतं. एक निर्जीव जुनाट दरवाजा पण दोन संसारांना पर्णपणे वेगळा करू शकतो. एकाला दुसऱ्यात मिक्सअप होऊ देणार नाही. या बंद दरवाजाचा अनुभव घेतल्यावर दिल्ली किती मोठी वाटते.

काही झाले तरी दिल्ली ती दिल्लीच. सुरवातीला पद्मिनीने अगदी उत्साहाने दिल्ली फिरून पाहून घेतली होती. काही ठिकाणी बलरामन घेऊन गेला, पण मग ती ऑफिसमधल्या मैत्रिणींबरोबर जाऊन आली. एकदा शहर ओळखीचं झाल्यानंतर मात्र तिला एकटीलाच फिरायला आवडायच. सुरवातीला वाटायच की आपल्याला साथ द्यायाला कोणीच नाही का? पण मग ती व्यथाही संपली. नसेल समजा कुणी तर आपण आपला आनंद घ्यायचा नाही का? हा विचार मनात आल्यावर तिला तिच्या एकटेपणाचे काही वाटेनासे झाले. आपल्याला स्वतःत, आपल्याला प्रत्येक कृतीत आनंद आणि रस वाटू लागला. त्या आनंदाने एकटेपणातही एक प्रकारची सुरक्षितता वाटू लागली. फिरुन- फिरुन काय नाही पाहिल तिने? झगमगणारा इंदिरा गांधी एअरपार्ट, फ्लाय ओव्हर्स, हुमायूमचा मकबरा, कुतुबमिनार, लाल किल्ला ...तिथली सर्व स्मृतिचिन्ह, बुद्ध गार्डन, राष्ट्रपती उद्यान, नॅशनल म्युझिअम....

पण तिला अतीव आनंद मिळायचा तो विजय चौकातील इंडिया गेट कडे पाहताना. एक धीरगंभीर, एकशे बेचाळीस फुट दगडावर कोरलेल गेट आणि त्याची कमान. त्याच्याबरोबर मुंबईच्या गेट वे ची किंवा पॅरिसच्या आर्क द ट्रायम्फची तुलना करून बघायला आवडेल. पण जाता येईल का तिला मुंबईला किंवा पॅरिसला? प्रथम विश्वयुद्धात कामी आलेल्या नव्वद हजार सैनिकांना श्रद्धांजली म्हणून ती कमान होती. कमानीवर सैनिकांची नावे कोरलेली होती. जवळच प्रज्वलित अमर जवान ज्योत पण होती.

इथे येऊन पद्मिनी अंतर्मुख व्हायची. तिच्या ब्रँचपासून जवळ होत इंडिया गेट. प्रत्येकवेळी तिला काहीतरी नवीन सुचायचं, नवीन वाटायचं या गेटातून इकडून तिकडे जाता येत आणि तिकडून इकडे पण येता येत. कशाच गेट आहे हे? आत येण्याचं की बाहेर जाण्याचं?

हे दोन्हीकडून विस्तीर्ण संसारात प्रवेश करण्याचंच गेट आहे, अडकवून ठेवण्याच नाही. चहूबाजूला कार, स्कुटर, बस, सायकल आणि पायी जाणाऱ्यांची गर्दी जणु वाहत होती. हे दिल्लीच गतीशील जीवन आहे. त्याला स्पंदन आहे. मी मात्र एक स्पंदनह, लग्नाच्या बाजारात खालमानने विकलेल वस्तू आहे. जिला न काही प्रेम मिळतय न काही सन्मान. एखादया वेठबिगारासारख फक्त राबत्येत मी. माझ नाव पण या इंडिया गेटच्या एखादया कोपऱ्यात खोदल गेले पाहीजे आणि माझ्यासारख्या कैक जणींच, ज्या लग्नांच्या व्यापारात जिवंतच बळी जात असतात. आम्हाला गौरवशाली मरण पण नसतं. नुसतं तिळतिळाने झिजणं. या इंडिया गेटमधून पलीकडे गेले तरी मुक्ती नाही, तिकडून पुन्हा इकडेच यायचं. मग माझ्यासाठी दिशा कोणती?

इंडिया गेटच्या तुलनेत त्या तिरुचिच्या दाराची काय मिजास? पण ते बंद होतं. आजपर्यंत ते कुणाला उघडाव वाटल नाही कारण पक्षी पिंजऱ्याच्या अधीन झाला होता. त्याला ही कैद, कैद वाटतच नव्हती? उलट छानच वाटू लागली होती?

पद्मिनीला अचानक वाटू लागले ....छे ते गेट सभ्यपणाने उघडण्याच्या लायकीचं नाही. ते तोडून, फोडून त्याच्या पलीकडे निघाल पाहिजे. ताठ मानेन.

सकाळी उठल्यापासून पद्मिनी पटापट घरातील कामं आटपत होती. अलीकडे ऑफिसात प्रेशर थोड वाढलेल होत. तिने ठरवल होत की आज लवकर निघून काही इतर गोष्टींसाठी वेळ द्यायचा, पण ऑफिसात एकापाठोपाठ एक अशी काम निघत गेली की तिला उलट जास्त वेळच बसाव लागल. त्या नादात इतर सहकारी केव्हा गेले तिला कळलचं नाही, मॅनेजर मात्र काम संपवीत बसले होते, बाहेर पदिमिनीला पाहून त्यांना आश्चर्य वाटलं.

अजून गेली नाहीस तू? चल मी तुला लिफ्ट देतो.

थॅक्स सर, बस आलेच मी, म्हणत शेवटच्या दोन फाईली संपवून ती त्यांच्याबरोहर निघाली.

इंडिया गेटपाशी उतरली. एव्हाना आईस्क्रिम आणि भेळपुरी खाणाऱ्यांच्या झुंडी तिथे वावरत होत्या. थोडा वेळ तिथेच पायी फिरून पद्मिनी झाकिर हुसेन मार्गाच्या कडेला गवतावर बसली. हा एकांत तिला आवडत होता. तिला वाटल तिचं जीवनपण असं एकटीचच आहे.

समोरच इंडिया गेट स्पष्ट दिसत होत. त्याच्या भोवतीच्या कोलाहालात, हिंदी, सिंधी, गुजराती सर्व तऱ्हेचे लोक होते. जणू तिच्या माहेरच्या घरून गेट उघडून तिच्याबरोबर आले आहेत. तीच ती मरीना बीचची विस्तारिता. तेच आईस्क्रिमचे ठेले विजय चौकातील गर्दी. कमानीवर खोदलेली जवानांची नाव ...सगळ पाहण्यामध्येच ती गुंगून गेली.

घरील यायला बराच उशीर झाला. तिला पाहताच बलरामन जणू तिच्यावर तुटून पडला. कुठे गेली होतीस इतका वेळ?

जरा उशीर झाला.

ते तर दिसतय, पण मी विचारतोय का झाला उशीर?

याच टोन मध्ये बलरामन त्यांच्याकडल्या कामवाल्या बाईवर ओरडत असतो.

मला भूक लागल्येय, आधी काही तरी खाते, म्हणत पद्यिनी डायनिंग टेबलाशी बसली. पुढयात प्लेट ओढून त्यात ब्रेडचे दोन स्लाईस तिने घेतले आणि बलरामनला विचारले, तुमचं खाण झाल का?

मग काय? दिसतय ना साडेसात वाजले. रात्रीच्या जेवणाला फक्त अर्धा तास उरलाय. तो तामिळ ब्राह्राणांच्या रुटीनला धक्का लागण्याच्या भीतीने ओरडला. फक्त अर्धा तास, आणि जेवणाची वेळ तर बदलू शकत नाही ना?

ठीक आहे. मी पटकन काहीतरी साधसचं जेवण बनवीन. .ब्रेडचा तुकडा मोडत ती म्हणाली. आज तिच्या हालचालीत एक प्रकारची लय होती ....रिलॅक्स असल्याची लय.

हूं, म्हणून बलरामन घाईने आत गेला. कपाटाचा आवाज येत होता. तिने उठून स्वतःसाठी चहा ठेवला. ती चहा गाळतच असताना तो परत आला. हातातले कागद तिच्यासमोर आपटत म्हणाला, काय आहेत ही सगळी थेर?

काय? तिने वळून विचारले

बलरामन रागाने लाल झाला होता. त्याच्या नाकपुडया थरथरत होत्या. याचा काय अर्थ? कागद पुन्हा तिच्यासमोर नाचवत तो ओरडला.

पद्मिनीने कागद ओळखले.

हे तुम्हाला कुठे मिळाले? मी तर माझ्या कपाटात एका लिफाफ्यात व्यवस्थित घालून ठेवले होते.

काही मोठ रहस्य होत का? तुला उशीर झाला म्हणून मी विचार केला, आज तुझ कपाट व्यवस्थित लावून ठेवाव. तुला वेळच मिळत नाही...तर हे, हे हाती लागलं...

ओ हो. पद्मिनी एवढंच म्हणाली .

ओहो म्हणजे काय? मला न विचारता घरासाठी तू बँक लोनचा अर्ज दिलास म्हणजे काय? तुझी हिम्मत कशी काय झाली?

आजूबाजूच्या खिडक्यांमधले चेहरे त्यांच्याकडे पहात होते. पद्यिनी शांतपणे पुन्हा खुर्चीत बसली. चहाचा एक घुटका घेऊन म्हणाली, यात हिमतीचा काय प्रश्न? स्वतःच्या पगारातून स्वतःसाठी फ्लॅट बुक करत आहे. त्याला हिम्मत कशाला लागते? तुझ्या नावाने? तुझ्या पैशाने? या गोष्टी आपण दोघांनी मिळून ठरवायच्या आहेत. पण त्याच्याही आगोदर तिरूचिला पत्र पाठवून माझ्या आईला आणि भावांना विचाराव लागेल. तुझ्या एकटीच्या नावाने फ्लॅट बुक करून कसे चालेल?

हे बघा, माझा वैयक्तिक मुद्दा आहे. कारण या फ्लॅट मध्ये मी एकटी राहणार आहे.

काय? आता बलरामन हबकून गेला, एकटी राहणार तू फ्लॅट मध्ये? म्हणजे तुला काय म्हणायचय?

हेच की तिरुचिच्या तुमच्या अंगणातलं दार उघडल आणि त्याचं इंडिया गेट झालयं.

ए पद्मिनी, काय मूर्खासारखी बडबड करत्येय?

मूर्खासारखी नाही. मी बोलतेय ते समजून उमजून. आणि तुम्हाला पण लवकर ते कळेल. माझा वकील तुम्हाला व्यवस्थित समजावून सांगेल, हा फ्लॅट मी माझ्या एकटीच्या नावाने बुक करणार आहे, कारण मला आता कळलय की आतापर्यत उगीचच मी तुमच नाव माझ्या नावापुढे जोडत होते. ते उधारीच नाव मी आता फेकून देणार आहे, भलेही ते करताना कितीही त्रास होवो. यापुढे मी माझे नाव पद्मिनी अय़्यर हेच लावणार आहे. हे नाव एस्टॅब्लिश करण्यासाठी मला फार काय करावे लागेल ...एक घर फक्त, बस.

एवढ बोलून पद्मिनीने चहाची कपबशी विसळून ठेवली आणि बाथरूममध्ये जाऊन ती हात-पाय धुवायला लागली.

-- मूळ तामिळ कथा- लक्ष्मी कण्णन्

हिंदी पक्राशन हंस - मराठी प्रकाशन अंतर्नाद