मंगलवार, 7 अगस्त 2012

एक शहर मेले त्याची गोष्ट -- लेखकीय मनोगत

एक शहर मेले त्याची गोष्ट --  
लेखकाचे दोन शब्द ...

    मला लेखनाचा छंद जडला आणि लेखन जमू लागले .तरी पण कथा - कादंबऱ्लियाहण्याकडे माझा फारसा कल नाही. समाजातील प्रश्न जेंव्हा तीव्रतेने डोळयासमोर येतात आणि लेखनाला प्रवृत्त करतात तेव्हा प्रश्नांचे विवेचन आणि त्यावर उपाय कसे असावेत यावर विचारचक्र सुरु होते आणि लेखनाचा आकृतीबंध तसाच रहातो .पण एखादा प्रश्न आशाप्रकारे समोर येतो की, वाटत याच उत्तर कोणालाच नको आहे, कारण उत्तराला अपेक्षित आहे एक चिकाटी, एक वसा, एक व्रत, जे व्रतस्थ राहून दीर्घकाळ अंमलात अणावे लागले. पण समोर दिसतो आहे आजचा तत्कालिक फायदा. मग ज्या प्रश्नाच असतित्व  समजून घेण्याकरिता लोकांनी पाठ फिरवली, त्याचे विवेचन एखाद्या मार्मिक, तर्कशुद्ध लेखाने क्वचितच घडते, 
पण जी कथा लिहली गेली तिला दाद मिळाली हे समाधान  अशा माझ्या तीनच कथा या संग्रहात आहेत. एक शहर मेले त्याची गोष्ट ,मना अजाणा, आणि गोष्ट सन् २०३५ ची ! तिस-या कथेचे बीज माझ्या भावाचे आहे.  

पण अनुवादाची उर्मी माझ्या मनात सदैव असे . बालपण बिहारमध्ये, उन्हाळ्याची सुट्टी महाराष्ट्रात .त्यामुळे देशातील या दोन कोप-यांचे आपापले कॅनव्हास किती विशाल आणि एकमेकांपेक्षा वेगळे तरीही ,संवेदनांच्या जाणीवेतून एकमेकांना किती जवळचे हे नेहमी प्रत्ययाला येई ,त्यातूनच मला भावलेल्या कथांचा अनुवाद करीत गेले .यातील बहूतेक अनुवादित कथा अंतर्नाद मासिकामध्ये छापून आल्या  आहेत.
    मूळ कथा वाचनाचा स्रोत म्हणजे हंस ,नया ,ज्ञानोदय ,अक्षरपर्व ,कथादेश यासारखी नियतकालीन  हिंदी मासिक किंवा लेखकांचे कथासंग्रह .
     यानिमित्ताने माझ्या लेखकांचा  छोटा परीचय करून देणे मला आवश्यक वाटते .श्री.विभूति भूषण दास  गुप्ता (सेई महावर्षार राड्गाजल  ) हे स्वातंत्र सैनिक १९३० च्या आसपास ते बिहारमध्ये खतरनाक पोलिटिकल कैदी होते ,बरेचदा जेल मध्ये गेले .ते कोणी लेखक नव्हते ,पण स्वातंत्र्यानंतर त्या काळच्या आठवणी सांगणारे काही लेख त्यांनी लिहले .त्यामधील अगदी कोवळया वयात फाशी गेलेल्या वैकुंठ शुक्ल या क्रांतिकारकाची स्मरणगाथा अतिशय हेलावून टाकणारी आहे मूळ बंगालीतून  इंग्रजी ,हिंदी व आता मराठी असा प्रवास आहे .वैकुंठ शुक्ल यांचे नातू व वरिष्ठ इनकमटॅक्स  कमिश्नर शुक्ल यांनी वैकुंठ शुक्लाच्या खटल्याचा पूर्ण  इतिहास व संदर्भ संकलित करून पुस्तक छापल्यामुळे ही स्मरणगाथा आपल्यापर्यत पोचू शकली.
    श्री .फणीश्वरनाथ रेणू (पैलवानाचा ढोलक ) हे देखील स्वातंत्रसैनिक ,शिवाय नेपाळच्या लोकशाही संग्रमासाठी कोईराला परिवाराबरोबर राहून  आंदोलन चालविण्यात अग्रणी .त्याचा दुसरा परिचय ग्रामीण जीवनाचे अत्यंत प्रभावी चित्रण करणारा कथा-कादंबरीकार म्हणून आहे .त्यांच्या तीसरी कसम ,या कथेची भुरळ राज कपूरलादेखील पडली व त्यावर सिनेमा निघाला .त्यांनी केलेले व्यक्तीचित्रण खूप उदात्त वाटत असले तरी त्यांचे समकालीन लोक सांगतात की उदात्त व्यक्ती रेणूंच्या आसपास वावरल्या आहेत, त्यांचा कोणताही कथानायक काल्पनिक नव्हता .गोनीदांच्या लेखनाच्या बाजाशी बरेचसे साम्य असलेला हा लेखक . आणिबाणिच्या काळात ते जय प्रकाशजींच्या बरोबर लढले आणि त्या तणावातच पोटाच्या आजाराने लहान वयातच मरण पावले.
      बाकी सर्व लेखक वर्तमानकाळात जोरदार लेखन करणा-यांपैकी आहेत .अवधेश प्रीत (षौक) दैनिक हिंदुस्थानचे पटणा येथील ब्युरोचीफ आहेत .त्यांची राजकीय जाणीव किती प्रगल्भ आहे हे अमेरिका व सद्दाम हुसेन यांच्या इतिहासासाठी चौधरी आणि अरबी घोडा ही प्रतिके त्यावरून दिसून येते .लक्ष्मी कण्णन् (इंडिया गेट) तामिळमधल्या प्रसिद्ध लेखिका असून ,त्यांच्या हिंदी अनुवादित कथांचे तीन संग्रह उपलब्ध आहेत .सुधा अरोरा (तो काळा शुक्रवार )हिंदीच्याच प्रसिद्ध लेखिका आहेत .या दोघीही स्त्रियांचे प्रश्न हिरिरीने मांडणा-या म्हणून ओळखल्या जातात. अनिता अग्निहोत्री (अरूप रूप) या वरिष्ठ आयएएस अधिकारी व बंगालीच्या प्रसिद्ध लेखिका आहेत .नोकरीच्या निमित्ताने सामाजिक -प्रशासकीय जीवन फार जवळून पाहणा-या व अत्यंत मार्मिकपणे लेखणीतून मांडणा-या म्हणून ख्यातनाम आहेत .शिवाय माझी सख्खी वहिनी. आमच्या गावाच्या प्रेमात पडली आणि ही उत्कृष्ट कथा लिहून काढली .एस.आर.हरनोट (कागभाषा) हे ग्रामिण भारताच्या मानसिकतेवर विलक्षण पकड असलेले आणि त्यामध्ये राजकारणाने जो उच्छाद मांडला त्याचे नेमके चित्रण करणारे लेखक. हिमाचल प्रदेशमधील या वरिष्ठ अधिका-याला हिंदी साहित्य जगताचे कित्येक पुरस्कार मिळाले आहेत . रोमेश जोशी (पोलिसांची लैला )हे त्यांच्या खुमासदार लेखनासाठी ओळखले जातात.
     या सर्व लेखकांमुळे तसेच त्यांना छापणा-या मासिकांमुळे माझे साहित्यिक विश्व समृद्ध झाले आहे ,म्हणून त्यांचे आभार मानणे हे मी कर्तव्य समजते ,कथा संग्रहाचे प्रकाशन मनःपूर्वक हाती घेतल्याबद्दल सुनिताराजे पवार यांचे व सुंदर  मुखपृष्ठाबद्दल चित्रकार अभय जोशी यांचेही आभार मानले पाहिजेत .अंतर्नादचे संपादक भानु काळे यांचे मात्र आभार मानत नाही .बहुतेक कथा -सारांशाचे पहिले श्रोते तेच होते व लगेच, लीनाताई ,ही कथा अनुवाद करून द्याच ,आपल्या वाचकांना आवडेल ,अशी प्रतिक्रिया देऊन पाठपुरावा करून लिहून घेत असतात .कथासंग्रहाची प्रस्तावना  लिहिल्याबद्दल त्यांचे व डॉ .बोरस या दोघांचे ऋणनिर्देश करून माझे दोन शब्द आवरते घेते.
---------------------------------------------------------------------
     
  

कोई टिप्पणी नहीं: