मंगलवार, 7 अगस्त 2012

******* एक शहर मेले त्याची गोष्ट --भानू काळे - डॉ सदानंद बोरसे निवेदन

एक शहर मेले त्याची गोष्ट --भानू काळे निवेदन
...........................
...........................
...........................
अहो ,बरीच मराठी पुस्तक गुजरातीत गेली आहेत आता तुम्ही मला सहा गुजराती लेखकांची नाव सांगा बघू १ खोलीत आजूबाजूला बसलेल्या आम्हा सर्वानाच उद्देशुन जोषींनी प्रश्न केला ,पण बराच  प्रयत्न करूनही आम्हाला कोणालाच दोनतीनपेक्षा अधिक गुजराती लेखकांची नावे आठवेतनात .
मागे एकदा कुठल्याशा साहित्य संमेलनाचे उदघाटन करताना ,मराठीने इतर भाषांबरोबर  देवाण बरीच  केली ,पण घेवण मात्र पुरेशी केली नाही , अशा आशयाचे उदगार माजी पंतप्रधान व बहूभाषाकोविद पी .व्ही नरसिंहराव यांनी यांनी काढले होते. ,त्याची आठवण झाली .मराठीतील अनुवादाचे दालन किती ओकेबोके आहे याचीही तेव्हा जाणीव झाली .
युनायटेड स्टेट्स इन्फर्मेशन सर्व्हिसेसच्या (USIS च्या) एका योजनेंतर्गत चाळीसएक वर्षापुर्वी अनेक अमेरीकन पुस्तकांचा मराठीत  अनुवाद झाला होता व त्यावेळच्या अनेक मान्यवर लेखकांनी हे काम केले होते ,पण अनुवादाचा शब्दांगणिक ठरवला गेलेला मोबदला मराठीत आजही  आणि तेही स्वतंत्र लेखनालाही ,मिळणा-या मोबदल्यापेक्षा कितीतरी जास्त होता .हे त्यामागचे मोठे आकर्षण असावे .एरवी अनुवादाकडे चांगले लेखक फारसे वळत नाहीत, असे दिसते .या कामात पैसा व प्रतिष्ठा दोन्ही फरसे नाही ,हे कदाचित त्यामागचे एक कारण असावे.
     चांगला ,रसाळ ,अनुवाद करणे हे एकूणच खूप कठीण आहे ,हेही अनुवादांच्या  वानवेमागचे एक कारण असावे .साहीत्याचा एका भाषेतून दूस-या भाषेत अनुवाद करणे म्हणजे अत्तराच्या एका कुपीतले अत्तर दुस-या कुपीत ओतण्यासारखे आहे .हे काम वाटते तितके सोपे नाही ,थोडे अत्तर सांडणारच ,थोडासा सुगंध उडून जाणारच .मूळ लेखनापेक्षाही अनुवादाचे काम कधीकधी अधिक कठीण असू शकते .मूळ लेखक गरजेनुसार शब्द बदलू शकतो. पण एकदा प्रकाशित झालेल्या साहित्यातील शब्दही बदलायची अनुवादकाला मुभा नसते .लिओ टॉलस्टॉय यांच्या वॉर अँड पीस कादंबरीचा हिंदीत अनुवाद करताना भीष्म सहानी यांना शासनाने टॉलस्टॉयचा शब्दच काय ,पण एखादा स्वल्पविरामही बदलण्यास मनाई केली होती  .खूपदा यामुळे अनुवाद बोजड बनतात ,वाचकाच्या मनाची पकड घेत नाही .(कृष्णा हाथीसिंग या पंडित नेहरूंच्या भगिनी ,त्यांच्या With no Regrets या आत्मकथेचा साने गुरूजींनी उत्तम अनुवाद केला होता ,ज्याचे शीर्षक होते ना खंत ,ना खेद ,समर्पक अनुवादकाचा हा एक आदर्शच मानता येईल .)
        पण अनुवादकाची म्हणजे वाचनीय अनुवादकाची वाट ही अशी बिकट आहे म्हणूनच एक शहर मेले त्याची गोष्ट ,या कथासंग्रहाचे मनापासून स्वागत करावेसे वाटते आणि चांगल्या अनुवादकाचे आव्हान स्वीकारायला लीना मेहंदळे समर्थ आहेत ,याचीही खात्री वाटते  .भारतीय प्रशासकिय सेवेतील एका उच्चाधिकारी म्हणून ह्या प्रसिद्ध आहेतच ,पण त्याच जोडीने ह्या बहूभाषाकोविद  आहेत हेही नमूद करायला हवे .मुळ खानदेशातल्या असल्यातरी त्यांचे शिक्षण बिहारमधल्या दरभंगा जिल्ह्यासारख्या दूरच्या ठिकाणी झाले आहे .इंग्रजी ,संस्कृत ,उर्दू ,बंगाली ,नेपाळी मैथिली ,भोजपूरी ,पंजाबी ,ओरिया ,आसामी,गुजराती ,मारवाडी हरियाणवी ,अवधी ,ब्रज, छत्तीसगढी व अहिराणी या मराठी व्यतिरिक्तच्या तब्बल सतरा भाषा त्यांना ब-यापैकी येतात .यात जराही अतिशयोक्ती नाही .अंतर्नाद मासिकाच्या सप्टेंबर २००२ अंकातील हिंदिला धोपटणे थांबवा ,या आपल्या लेखात मेहेंदळे लिहतात ,यासर्व अनूभवांतून मी ठाम पणे सांगू शकते,की भाषांचा बोजा पडतो ,असा आरडा-ओरडा लोक उगीचच करतात .माझी धाकटी भाची आहे ,तिला वय वर्षे पाचपासून उत्तम हिंदी ,मराठी ,बंगाली ,ओरिया ,इंग्रजी आणि संस्कृत येऊ लागले आणि हसत -खेळत ते ती शिकली .कुठला आलाय बोजा ! आज तिच्या ज्ञानाच्या कथा इतरांपेक्षा कितीतरी अधिक विस्तीर्ण आहेत ,हे शेवटचे वाक्य महत्वाचे .
        हे बहूभाषापटूत्व अनुवादकालाही खूप उत्तम आहे -विशेषःत हिंदीतून मराठीत अनुवाद करताना .कारण हिंदीचा पट अन्य भाषांपेक्षा खूपच विशाल आहे. भौगोलिक ,ऐतिहासिक व सामाजिक वैविध्य तिच्यात खूप आढळते .प्रस्तुत संग्रहातील पटण्याचे अवधेश प्रीत यांची षौक ही कथा किंवा  फारबिसगंजचे फणीश्वरनाथ रेणू यांची पैलवानाचा ढोलक हा कथा किंवा मुंबईच्या सुधा अरोरा यांची तो काळा शुक्रवार ही कथा किंवा हिमाचल प्रदेशच्या एस.आर हरनोट यांची कागभाषा ही कथा यांचा तौलनिक अभ्यास खुप उपयुक्त ठरावा त्या दृष्टीने आपली भुमिका व्यक्त करणारे एखादे प्रास्ताविक लेखिकेने लिहिले असते ,तसेच मूळ लेखकाचा अल्प परीचय प्रत्येक कथेशेवटी दिला असता तर या संग्रहाचे संदर्भमूल्य अधिक वाढले असते ,असे वाटते .
        आणखी एक सूचना करावीशी वाटते  -कथांच्या पलीकडे जाऊन आता हिंदीतली एखादी महान कादंबरी (एखादा मास्टरपीस) लीना मेहंदळे यांनी मराठीत आणावी मराठीतील आनुभवाचे दालन खूप समृद्ध करणारी ती कृती असेल .
       असो .मराठीतील अनुवादांमध्ये ही एक महत्तवाची भर घातल्याबद्दल लीना मेहंदळे यांचे अभिनंदन .रसिक वाचकांचा उत्तम प्रतिसाद या संग्रहास मिळेल ,अशी आशा व्यक्त करतो.                                                   -भानु काळे
----------------------------------------------------------
मला जे भावले
श्रीमती लीना मेहंदळे हे एक बहूपेडी व्यक्तिमत्व आहे .त्यांना  प्रत्यक्ष भेटलेले किती तरी जण त्यांच्या व्यक्तिमत्वातील विविध पैलूंनी प्रभावित झालेले असतातच ,पण त्यांना  प्रत्यक्ष न भेटलेल्या आणि फक्त त्यांच्या लेखनातूनच त्यांच्याशी परिचित असलेल्या अनेकांनाही त्यांचे अनेक व्यक्तिविशेष ठळकपणे जाणवल्याशिवाय रहात नाहित .
    त्या स्वतः सर्जनशील लेखिका आहेतच ,पण मराठी ,हिंदी आणि इंग्रजीवरील प्रभुत्वामुळे त्यांनी स्वतःला भावलेल्या अनेक  साहित्यकृतींचा अनुवाद करून भाषांची परस्परसमृद्धीही साधली आहे.
     एक शहर मेले त्याची गोष्ट हे श्रीमती लीना मेहंदळे यांचे नवे पुस्तक ,त्यांच्या स्वतःच्या दोन कथा आणि इतर भाषांमधील अनुवादीत नऊ कथा अशा एकुण अकरा  कथापुष्पांचा हा गुच्छ हिंदी ,बंगाली ,तामिळ अशा वेगवेगळया भाषांमध्ये मुळात प्रसिद्ध झालेल्या या कथा त्यांनी निवडल्या.
या अकरा कथा वेगवेगळ्या विषयांवर आहेत .यात पर्यावरण आहे, मूल्यविचार आहे,  भावनिक घुसमट आहे ,पुरूषप्रधान संस्कृतीला तगमगणारी स्त्री आहे ,राजकिय टिप्पणी आहे ,अगदी पोलिसांची लैला  अशी हलकीफुलकी (तिच्यामध्येसुद्धा काही बोचरे ,ओरखडणारे उल्लेख येतातच,) कथासुद्धा आहे एका बाजूला या कथांमध्ये निसर्गाला  जवळ करणा-या , निसर्गात रमणा-या परंपरांचे धागे मूळ धरून आहेत ,तर दुस-या बाजूला भविष्यातील समस्यांचा  वेध घेणारी , क्षितिजापलिकडे डोकावू पाहणारी नजर  दिसते आणि असे  विषयांचे वैविध्य असलेल्या ,वेगवेगळया  लेखकांनी  लिहलेल्या  निरनिराळया कथा असूनसूद्धा  या सा-या कथांमधून एक समान धागा वाचकाला जाणवत राहतो. तो श्रीमती लीना मेहंदळे यांच्या  व्यक्तिमत्वाचा .
त्या स्वतः जवळजवळ तीन तपे भारतीय प्रशासकीय सेवेत  अधिकारीपदावर  आहेत .अंत्यंत कार्यक्षम ,स्वच्छ आणि संवेदनशील अधिकारी असा यथार्थ  लौकिक त्यांनी कमावला आहे .प्रशासनातील भ्रष्टाचार निपटण्याचा प्रयत्न करणे,ते अधिकाअधिक जनभिमुख बनवणे ,वेगवेगळया  कामांमध्ये लोकांचा प्रत्यक्षाप्रत्यक्ष सहभाग वाढवणे यासाठी त्यांचे प्रशासकिय आणि व्यक्तिगत पातळीवर सतत प्रयत्न चालू असतात .त्यांनी राबवलेल्या अनेक योजनांनधून प्रशासनाची पोलादी चौकट बाजूला सारून सामान्य माणसाला त्याचे  केंद्रस्थान बहाल केले आहे ,आणि हे सारे त्यांनी केले ,आजही करत आहेत, ते अगदी अकृत्रिम  स्नेहाळपणे ,डोळस संवेदनशीलतेने आणि कोणत्याही अभिनिवेशाविना  आणि सारेच विशेष त्यांच्या कथाविषय निवडीपासून लेखनापर्यंत ठळकपणे दिसतात .या अधिकारी लीना मेहंदळयांबरोबर आणखी एक लीना मेहंदळे वावरत असतात .एखाद्या उत्साही लहान बालकाचे निरागस कूतूहूल आणि एखाद्या निष्णात पदार्थ वैज्ञानिकाची गोष्टीच्या मुळापर्यत जाण्याची चिकित्सक जिज्ञासा एकाचवेळी बाळगणा-या लीना मेहंदळे .साहजिकच त्यांच्या कथांच्या आवडनिवडीमध्ये या लीना मेहंदळयांचेही प्रतिबिंब स्पष्ट दिसते .तसेच त्यांच्या स्वतःच्या कथालेखनामध्ये सुद्धा .निसर्गावर भरभरून प्रेम करणा-या लीना मेहंदळे .माणसामाणसातील भिंती अन् कुंपणे भेटून सा-यांना समान स्हेधाग्याने बांधण्याची इच्छा धरणा-या लीना मेहंदळे ,अशी कितीतरी रूपे कथांमधून भेटतात.
        या कथासंग्रहामध्ये नऊ कथा अनुवादीत आहेत .अनुवादामध्ये अनुवादकावर कठीण जबाबदारी असते .त्याला तो अनुवाद अनुवाद वाटणार नाही असा भाषेचा वापर करायचा असतो ,पण त्या जोडीलाच मूळ साहित्यकृतीचा आशय ,त्या साहित्यकृतीच्या स्थळ -काळ- व्यक्तींची वैशिष्टये ,त्या साहित्यकृतीचा प्रादेशिक विशेष जपणारा भाषेचा लहेजा आणि काही प्रमाणात मूळ लेखकाची शैली असे सारे कलम आपल्या लेखनावर लावून ते एकजीव करावे लागते .या कथासंग्रहात लीना मेहंदळयांनी अनुवादक म्हणून ही जबाबदारी अत्यंत समर्थपणे पेलली आहे .नितळ पाण्यासारखी पारदर्शी अशी स्वतःची लेखनशैली बनवून त्यांनी त्या -त्या अनुवादीत कथेची अन् मूळ कथाकारकाची  वैशिष्टये स्पष्ट दिसतील अशा पद्धतीने अनुवादकाचे काम केले आहे आणि कुठेही कलमाचा जोड जाणवणार नाही ,अशा पद्धतीने ही कलमकारी त्यांनी केली आहे.
      श्रीमती लीना मेहंदळयांनी सादर केलेले हे अकरा कथांचे कोलाज .वाचताना त्यातील प्रत्येक  तुकडयाचे स्वतंत्र ,स्वायत्त, वेगळेपण भिडतेच, पण सर्वात जास्त भावतात त्या या सा-या कोलाजमधून साकारणा-या, या सा-या तुकड्यांना सांधणा-या एकजीव -एकरस बनवणा-या बहूपेडी व्यक्तिमत्वाच्या लीना मेहंदळे.
--डॉ सदानंद बोरसे     
 ------------------------------------------------------------------------------------------



        

कोई टिप्पणी नहीं: