बुधवार, 7 दिसंबर 2016

पैलवानाचा ढोलक --फणीश्वरनाथ रेणु

पैलवानाचा ढोलक
--फणीश्वरनाथ रेणु
   
      कडाक्याच्या थंडीचे दिवस .अवसेची रात्र .काळीकुट्ट आणि हाडांपर्यत गोठवून टाकणारी थंडी .त्यातच गावावर महामारीची सावली पडलेली१ मलेरिया आणि कॉलरा या दोन्ही साथीच्या कचाटयात सापडलेला गाव भयार्त शिशुप्रमाणे थरथर कापत होता .बांबू आणि गवताने शाकारलेल्या झोपड्यांमधून अंधार आणि निःस्तब्धतेचे साम्राज्य पसरलेले होते .
     अंधार जणू गावाच्या दुर्दशेवर चार अश्रू ढाळीत होता ,तर निःस्तब्धता स्वतःच गदगदत होती .एखादा भावूक तारा आकाश सोडून त्या गावाकडे झेपावत होता ,तिथला अंधार थोडा कमी करण्यासाठी  ,पण वाटेतच तो नामशेष होत होता . मग त्याच्या भावूकतेवर आणि पराजयावर इतर चांदण्या खदखदून हसत होत्या .मधूनच कोल्ह्यांची कोल्हेकुई किंवा एखाद्या तरसाचा हुंकार ऐकू यायचा .तो वातावरणातील भीती अधिकच वाढवून जायचा .एखाद्या झोपडीतून ओकारी आणि हगवणीचे आवाज येत आणि वेदनेने पिळवून कुणीतरी हे राम ,अरे देवा ,भगवंता .अशा हाका  मारीत राही .वेदनेने तडफडणारे एखादे मूल ,आई ,पाणी असा आक्रोशही करत असे .तरीपण एकूण त्या निःस्तब्धतेला काही खिंडार पडत नव्हते.

    परिस्थितीची भयानकता जाणण्याची काही वेगळी बुद्धी कुत्र्यांना असते .दिवसभर ते कुठल्याही राखेच्या ढिगात  अंगात वेटोळे   करून सुस्त पडून रहायचे .मात्र दिवेलागणीला किंवा कधी-कधी अर्ध्या रात्री सगळे गळा काढून रडत अशी रात्र सर्व बाजूंनी आपली भयाणता सिद्ध करून येई. 
   त्या भयानतेला शह देणारी एक गोष्ट गावात होती .पैलवानाचा ढोलक  रात्रीच्या समोर शड्डू ठोकत हा ढोलक उतरत असे आणि रात्रभर रात्रीला आव्हान देत असे .संध्याकाळपासून ढोलक सुरु होई .तट धा, तट धा ,गिड धा, अर्थात आ ,जा ,भिड जा .आणि मध्येच तटाक तट धा, तटाक तट धा, म्हणजे उचल आणि पटक त्याला ,हीच लय आसमंतात संजीवनी भरून ठेवत असे.
    लुट्टनसिंग पैलवान तो आठ वर्षाचा असतानाच आजारपणात आई -वडील मरण पावले .विधवा सासूनेच त्यांचा सांभाळ केला .त्यावेळी तो गाई चरायला न्यायचा . धारोष्ण दूध प्यायचा आणि कसरत करायचा .विधवा सासूला त्रास देण्यासाठी बरेच लोक टपलेले होते .त्यांचा प्रतिकार करता यावा म्हणून लुट्टन कसरत करत होता .त्याला इतर कशाची फिकीर नव्हती .लवकरच किशोरवयीन लुट्टनच्या दंडावर फुगीर बेडक्या दिसू लागल्या .तारूण्यात येईपर्यंत तो गावातला सर्वश्रेष्ठ पैलवान मानला जाऊ लागला .कुस्तीच्या आखाडयात त्याचे नाव गरजू लागले .
    एकदा तो कुस्तीची लढत पाहायला शामनगरला गेला .भली थोरली जत्रा भरलेली होती आणि कुस्तीच्या मैदानावर ही , गर्दी होती . आखाडयाच्या रिंगणात उतरलेले पैलवान आणि त्यांना जोश देणा-या ढोलकाच्या आवाजाने लूट्टनच्या नसानसांत वीज सरसरून गेली .त्याने मागचा-पुढचा विचार न करता एकदम सिंहाच्या छाव्या,ला ललकारले त्याचे खरे नाव होते चाँद सिंह आणि तो आपल्या वस्ताद गुरू बादल सिंहबरोबर पंजाबमधूनच प्रथमच शामनगरच्या कुस्तीसाठी आला होता .बरोबरीच्या सर्व पंजाबी आणि पठाण पैलवानांना जिंकूनच त्याने शेर का बच्चा ही उपाधी मिळवली होती .कुस्तीच्या  रिंगणात तो एक लंगोट लावून नुसताच उंडारत होता .आपली उपाधी सिद्ध करण्यासाठी मधूनच तो जोरजोराने मांडया आणि बाहू ठोकायचा .देशावरची पैलवान मुले त्याच्याशी लढण्याच्या कल्पनेच रिंगणातून  दूर सरायची.
    
     शिकार आणि कुस्तीचे प्रेमी ,शामनगरचे वृद्ध राजेसाहेब त्याला आपल्या दरबारातच कायमचा ठेवून घेण्याची घोषणा करणार होते .एवढ्यातच लुट्टनने त्या शेर का बच्चा ,ला ललकारले .मानसन्मानाने फूलून आलेला चाँद सिंह क्षणभर त्याच्या ईर्षेकडे पाहून जरासा हसला ,पण दुस-याच क्षणी ससाण्याच्या गतीने त्याच्यावर तुटून पडला .
    बघ्यांच्या गर्दीमध्ये एकच आक्रोश उठला ,अरे मेला ,मेला ,पण अरे वारे बहादूर लुटटननेही तेवढयाच चपळाईने आपली सुटका करून घेतली आणि तो स्वतःचे डावपेज दाखवू लागला .
    वृद्ध राजाने कुस्ती थांबवली आणि लुटटनला जवळ बोलावून समजावले .तो ऐकेना तेव्हा त्याला दहा- दहाच्या दोन नोटा काढून दिल्या आणि म्हणाला ,हे घे जत्रा बघ आणि घरी जा ,
    पण लुट्टन अडून बसला ,मी लढणार राजेसाहेब ,फक्त आपण हुकूम करा,
        तू वेडा झाला आहेस ,जा घरी जा,
   मॅनेजरपासून शिपायांपर्यत सर्वांनी लुट्टनला सुनावले ,अंगात मांस नाही छटाकभर आणि लढणार म्हणे कुस्ती ,राजेसाहेब एवढं समजावून सांगताहेत .......
      दूहाई आहे सरकार मी दगडावर डोक आपटून जीव देईन .बस आपण हूकूम करा .... तो दोन्ही हात जोडून विनवत होता
     गर्दी आता अधीर होत चालली .इतर वाद्ये बंद झाली ,पंजाबी पैलवानांच्या गोटातून लू्टट्नवर शिव्यांचा वर्षाव होऊ लागला .दर्शक उत्तेजीत झाले होते .
        कुणीतरी पुकारले ,त्याला लढू दया महाराज,
       कुस्तीच्या रिंगणात एकटा चाँद सिंह तोंडावर उसने हास्य आणून उभा होता .पहील्या पकडीतच त्याला आपल्या प्रतिस्पर्ध्याच्या ताकदीचा अंदाज येऊन गेलेला होता .शेवटी गर्दीसमोर आणि लुट्टनच्या हट्टासमोर विवश होऊन राजाने आज्ञा दिली ,लढ कुस्ती,
      पुन्हा एकदा कुस्तीचे डफ आणि ढोलक वाजू लागले .जमाव आता पूर्ण जोशात होता .जत्रेतील दुकानदारांनी दुकाने बंद केली .चाँद सिंगची कुस्ती ही पाहायलाच पाहिजे ,
    तट धा ,गिड धा ,तट धा गिड धा,
    दोन्ही पैलवान आपापले डावपेज दाखवू लागले .मोठया आवाजात एक ढोल वाजू लागला ,ढाक ढिन्ना ,ढाक ढिन्ना .अर्थात वा पठ्ठे ,भले पठ्ठे.
    लुट्टनला चाँद सिंह ने आवळून धरले होते .गेला गेला ,दर्शकांनी टाळ्या वाजवल्या .भरीत होऊन जाईल भरीत हा काही हसण्यावारी नेण्याचा खेळ नाही .तो शेर का बच्चा आहे म्हणाव ,
    चट गिड धा,चट गिड धा अर्थात डरू नकोस ,डरू नकोस  चाँदचा  मजबूत हात लुट्टनच्या मानेवर होता आणि तो त्याला चित्त करू पाहत होता .इथेच पुरून टाक त्याला बादल सिंह आपल्या शिष्याला प्रोत्साहन देत होता .
    लुट्टनचे डोळे बाहेर येऊन पडू  पाहत होते .त्याच्या बाजूने होता  फक्त ढोलकाचा इशारा .त्याच्या तालावरच लुट्टन आपल्या शक्तीची परीक्षा घेत होता ,स्वतःची हिम्मत वाढवीत होता.
    अचानक खर्जातल्या ढोलाने एक वेगला बारीक चित्तकार काढला ,धाक धिना ,धाक धिना,
    लुट्टनला ढोलाचे बोल स्पष्ट सांगत होते ,पेच सोडव ,बाहेर पड ,पेच सोडव बाहेर पड,
    लोकांच्या आश्चर्याला पारावार राहिला नाही .लुट्टन आचानक पेच तोडून चांदच्या पकडीतून निसटला आणि आता त्याने चाँदची मजबूत मान पकडली होती .वाह रे मिट्टी के शेर अच्छा ,निसटला पकडीतून ,च्या मारी ,जनमत बदलू लागले होते .ढोल अजून वाजतच होता ,तटाक तट धा, चटाक चट धा, ....अर्थात उचल आणि पटक त्याला ,उचल आणि पटक त्याला ,
     लुट्टनने  एक ठेवणीतला डावपेज काढला आणि क्षणात चाँदला उचलून जमिनीवर आळला .
     धा गिड गिड ,धा गिड गिड..., अर्थात वा ,बहादूर -वा ,बहादूर अचानक झालेल्या या कुस्तीच्या शेवटाने कोणाचा जयजयकार करावा ते ने सुचून गर्दीतील कुणी जय दुर्गे ,कुणी जय बजरंगबली तर कुणी जय शामानंद राजेसाहेब असे म्हणत सर्वानी जयघोषाने आकाश दुमदुमून टाकले.
    विजयी लुट्टनने धावत जाऊन सगळ्या ढोलांना स्पर्श करून नमन केले .मग राजेसाहेबांच्या जवळ येताच ,त्यांनाच उचलून डोक्यावर घेऊन तो नाचू लागला. राजेसाहेबांचे किमती कपडे मातीने भरून गेले .मॅनेजरसाहेब अरे,अरे करतच राहीले ,पण राजांनी स्वतः त्याला उचलून छातीशी धरले आणि म्हणाले ,शाबास रे माझ्या बहादूरा , वतनाच्या मातीची लाज  राखलीच तू आज .
    पंजाबी पैलवानाचा गट चाँदची समजूत काढत होता .राजेसाहेबांनी लुट्टनला नुसते बक्षीस दिले नाही ,तर त्याची लगेच राजदरबारात जागा मुक्रर करून टाकली .राज-पंडीतांनी आक्षेप घेतला ,महाराज ,तो जातीने ढोर आहे .
   असू दे .त्यांन काम क्षत्रियाचं केलेलं आहे ,राजेसाहेब मॅनेजरकडे पाहून म्हणाले .मॅनेजर क्षत्रिय होता .त्याने तोंड फिरवले.

तेंव्हापासून लुट्टनची .किर्ती दूरवर पसरली दरबारातून त्याच्या शिध्याची व्यवस्था झाली .आता पौष्टीक अन्न दूप्पट जोमाने व्यायाम आणि राजेसाहेबांचा स्नेह ,मग त्याला प्रसिद्धी मिळाली यात काय नवल .
    काही वर्षात त्याने मोठ  -मोठया पैलवानांशी कुस्ती खेळून त्यांना जिंकून घेतले .शेवटी त्याने काले खाँलापण जिंकले .काले  खाँ ,आली म्हणत प्रतिस्पर्ध्यावर तुटून पडला की .त्या आरोळीने बिचारा प्रतिस्पर्धी पक्षाघात झाल्यासारखा लूळा पडायचा .अशा काले खाँलादेखील लुट्टनने हरवले .
    त्यानंतर मात्र तो दरबारात एक दर्शनीय व्यक्ती म्हणून उरला .जत्रेत तो लांब अंगरखा व पगडी घालुन एखाद्या मस्त हत्तीप्रमाणे झुलत जायचा .कुणी हलवाई गमतीने म्हणे ,ताजे रसगुल्ले आहेत ,खाणार का पाच-दहा१
    तो म्हणायचा ,पाच -दहा काय ,आणा दिड -दोन शेर ,एवढी मिठाई खाऊन पाच-दहा पानांचा तोबारा भरून फिरायचा .जत्रेतून परत येताना वेश कसा असायचा १ डोळयांवर रंगीत प्लॅस्टिकचा चष्मा ,हातात खेळणी ,एखादी पितळी शिट्टी
    वय आणि ताकद वाढत गेली ,तशी त्याची बुद्धी मात्र अगदी बालबुद्धी झाली .जत्रेत ढोलाचा आवाज ऐकला की तो शरीर-प्रदर्शन करू लागायचा .लंगोटीचा पट काढून आखाड्यात फे-या मारायचा .आधी त्याला कुस्तीसाठी जोडीदार भेटत नसे .पुढे-पुढे राजेसाहेबच त्याला कुस्तीसाठी मानाई करू लागले .मग तो फक्त अंगाला तेल आणि लाल मातीने मर्दन करायचा .वृद्ध राजे त्याला बघून नुसते स्मित करायचे .
     पंधरा वर्षे झाली .लुटटन पैलवान अजिंक्य राहिला .आखाडयात तो आपल्या दोन-दोन पैलवान मुलांसोबत यायचा . विधवा सासू कधीच वारली  होती .दोन मुलांना जन्म देऊन बायकोसुद्धा पुर्वीच मरून गेली दोन्ही मुले बापासारखी सशक्त आणि तगडी होती .जत्रेच्या आखाडयात त्या तिघांना पाहून लोक वाहवाही करू लागत .त्या दोघांनाही राज- पहलवान घोषित केलेले होते .त्यांच्या शिध्याची व्यवस्था राजकोषातूनच केली होती .
      रोज सकाळी पैलवान स्वतः ढोल वाजवायला बसत असे आणि त्या तालावरच पोरांना कसरत शिकवत असे. .दुपारी जेवणानंतर पडल्या-पडल्या अधिक माहीती देत असे, बर का पोरांनो ,ढोलकाच्या आवाजावर आणि तालावर पुर्ण लक्ष ठेवायचे ,माझा गुरू कोणी पैलवान नव्हता ,हा ढोलकच माझा गुरू .याच्या तालाच्या प्रतापानेच मी पैलवान झालो. दंगलीत उतरण्याआधी या ढोलकाला नमन करायचे .यानंतर राजेसाहेबांशी इमान ,आपली जमीन ,आपला गाव ...इत्यादी ब-याच गोष्टी सांगायचा
     पण हे सगळे एकीकडे राहूनच गेले .मुलांना कुठे कुस्तीचे फड जिंकायची संधी मिळालीच नाही .वृद्ध राजेसाहेब वारले आणि युवराजांनी ताबा घेतला बरेच बदल झाले .कुस्त्यांऐवजी घोडयांच्या  रेसमधे नव्या राजाने मन जास्त रमू लागले .पैलवान आणि दोन्ही भावी पैलवानांचा शिध्याचा खर्च बघून नव्या राजाने उदगार काढले ,टेरिबल
    पैलवानाला काही बोलायची संधीच नव्हती .राज -दरबारात त्याची गरज नाही म्हणताच तो ढोलक खांदयावर घेऊन आपल्या मुलांबरोबर चालू लागला .परत गावात येऊन राहिला .आता त्याला त्रास देणारे विरोधक गावात कोणी नव्हते .एका कोप-यात नवी झोपडी बांधून तो राहू लागला .धनगराच्या पोरांना कुस्तीचे डाव पेज  शिकवू लागला .त्याच्या शिध्याची व्यवस्था गावक-यांनी सांभाळली ,पण शेतक-यांची -धनगरांची पोर काय खुराक खाणार आणि काय कुस्ती खेळणार १ पैलवानाची शाळा लवकरच ओस पडली .शेवटी फक्त त्याची दोन मुलेच त्याच्या शाळेत राहिली .दोघेही दिवसभर मजुरी करून जे मिळेल ते आणित .त्यातच कसेबसे भागत असे.
      आणि अचानक गावावर वज्राघात झाला .आधी अनावृष्टी ,मग अन्नाचा दुष्काळ आणि आता कॉलरा आणि मलेरिया यादोन साथीच्या रोगांनी गावाचा ताबा घेतला .एक -एक घर ओस पडू लागले .लोक कण्हत कुथत आपापल्या घरातून निघून शेजा-यांकडे सांत्वन करायला जायचे ,
    किती वेळ रडत बसशील सुनबाई १जो राहणार होता तो तुझा नव्हता .आता जो आहे ,त्याच्याकडे बघ ,किंवा अरे बाबा ,घरात प्रेत ठेऊन किती काळ रडत बसशील १ कफन १ कफनाची काय गरज१ नदीत टाकून ये .इत्यादी
    पण एकदा सुर्य बुडाला आणि अंधार झाला की त्यांची काही बोलण्याची हिंमतही संपुन जायची .शेजारी एखादे मुल शेवटचे श्र्वास मोजत असले तरी त्याच्याशी बोलायची हिंमत आयांना होत नव्हती .
    फक्त लुटटन पैलवानाचा ढोलक रात्रभर वाजत राही आणि रात्रीला ललकारत राही .गावाच्या अर्धमृत माणसांना हीच संजीवनी होती .लहानथोर ,स्त्री -पुरूष ,सगळयांच्या डोळयांपुढे कुस्तीच्या दंगलीचे दृश्य तरळून जायचे .स्पदंनशुन्य ,शक्तिशुन्य नसांमधून वीज तमकून जाई .ढोलकीच्या आवाजात कुठलाही आजार कमी करण्याचा गुण नव्हता किंवा महामारीची सर्वनाशी गती थांबवायची शक्ती नव्हती .तरीपण मरणाच्या दारातून पलीकडे जाणा-या लोकांना डोळे मिटताना  ढोलकाच्या आवाजाचा दिलासा वाटे .मृत्यूचे भय कुठल्या कुठे उडून जाई.
    ज्या दिवशी काही तासांच्या अंतरानेच पैलवानाचे दोन्ही मुलगे क्रूर काळाच्या दाढेत सामावले ,तेव्हाही त्यांनी म्हटले होते ,बाबा उचल आणि पटक त्याला ,हा तुझा आवडता ताल वाजव,
    चटाक चट धा ,चटाक चट धा रात्रभर पैलवान ढोलक बडवत राहिला .मधूनच तोंडाने म्हणायला ,मारा बहादुरांनो,
    पहाट झाली तेव्हा दोघे निःस्तब्ध पडलेले होते .दोघे पोटावर पडले होते .मरतानाही त्यांनी आपली पाठ जमिनीला टेकू दिली नव्हती .एकाने तर वेदनेचा शब्द निघू नये म्हणुन दातांनी मातीच उकरली होती .दीर्घ निःश्र्वास सोडून पैलवान म्हणाला ,दोघे बहादूर कोसळले
    थोडया वेळाने त्याने राजा शामानंदने दिलेला रेशमी लंगोट लावला .सा-या अंगावर माती चोळून थोडा व्यायाम केला .मग दोन्ही मुलांची  कलेवरे खांद्यावर टाकून नदीच्या प्रवाहात सोडून आला .लोकांनी  ऐकले आणि आश्चर्य व्यक्त केले .कित्येकांची हिंमत खचली .
    पण रात्री पैलवानाच्या ढोलकाचा आवाज पुन्हा ऐकू आला तशी लोकांची हिंमत पुन्हा वाढली .पुत्रशोकाने व्याकूळ माता-पित्यांना लोक सांगू लागले ,दोन्ही तरूण मुलगे होते ,पण पैलवानाची हिंमत तर बघा
      काही दिवस गेले .एका रात्री ढोलक बोलला नाही .पैलवानाच्या काही जुन्या शिष्यांनी सकाळी उठून त्याच्या झोपडीकडे धाव घेतली .पैलवान चित पडलेला होता .रात्री कोल्हयांनी त्याच्या डाव्या जांघेचे मांस खाऊन टाकले होते .थोडे पोटावरचे पण .
       अश्रू आवरत एक शिष्य सांगू लागला ,गुरूजी म्हणत ,मी मेलो की चितेवर ठेवतानासुद्धा मला पोटावरच ठेवा .मी आयुष्यात कधी चित झालो नाही आणि चिता जळेपर्यत ढोलक वाजवा .... पुढे तो बोलू शकला नाही .
     शेजारीच ढोलक घरंगळून पडलेला होता .कोल्ह्यांनी त्याचे चामडेही फाडून टाकले होते.
                                                                  लेखक -फणीश्वरनाथ रेणू  
----------------------------------------------------------------------

कोई टिप्पणी नहीं: