सोमवार, 27 मार्च 2017

गच्चीवरून --लेखिका सूर्यबाला

गच्चीवरून
--लेखिका सूर्यबाला, अनु. लीना महेंदळे प्रका. -- अंतर्नाद
               ते दिवस परत आणणं कस शक्य  आहे?  पण आता आणता  आले असते  तर  आताच्या  शिदोरीमुळे  खूप काही  वेगळं  केलं अस वाटत.  पम जर ते  दिवस  परत आणता  आले असते तर  आताची  शिदोरी  त्या  दिवसांसाठी  वापरता येईल का?
             आता माझ्याजवळ  खूप खूप  शब्द  आहेत. कोणताही  प्रसंग , कोणतीही भावना , लीलया व्यक्त करू शकणारे  शब्द! प्रसंग कितीही उत्कट, भावना कितीही सूक्ष्म असो, त्यांना शब्दांच्या  झालरीत  मढवून  टाकण्यांच  सामर्थ्य आहे. मी आता त्यांना फुलवू  शकते,  गोंजारू  शकते, सजवू शकते. पण त्या भावना आता कुठे आहेत? जेव्हा त्या होत्या  तेव्हा त्यांना नाव-गावं , संदर्भ देता आले असते, त्यांना शब्दांत   मांडता आले  असते, तर आयुष्याची  सुरवातच  अशी  अपूर्ण , हुरहूर लावणारी झाली नसती. आता सगळीकडेच शब्दच शब्द आहेत,   फुकट्य़ा  शब्दांपासून  ते लाखमोलाचे शब्द आहेत
               पण आता प्रकट करण्याची ओढ लागावी-  स्वतःला आणि समोरच्याला पण ,  अशा भावनाच राहिल्या नाहीत.  नाही म्हणायला आयुष्य  सुखी -समाधानी  आहे, यशस्वी आहे.  चारचौघींसारखा मोठा पगारवाला नवरा, हुषार आणि  स्मार्ट मुलं  आहेत,  फावल्या वेळात शब्दांचा  धूर काढत बसल्यामुळे  लेखिका  म्हणून  पण नावारूपाला आले आहे. पण  ती तन्मयता आणि उत्कटता कुठे आहे?  आणि सुखाला आकंठ पिऊन घ्यायची ओढ तरी कुठे आहे?  सुखं शेजारी  आहेत का, राहू  देत बापडी तसीच :  जेव्हा वाटेल  तेव्हा घेईल कुणाचा तरी स्वाद!
              आतासारखी नसली तरी सुद्धा माझ्या मालकी  हक्काच्या   गोष्टींची यादी  काही लहान नव्हती!
               पहिल्या मजल्यावर अभ्यासासाठी  एक स्वतंत्र खोली. कंटाळा आला तर जागा बदलण्यासाठी बाल्कनी . तरी  कंटाळा आला तर वरची गच्ची, त्या  गच्चीतला तो लकी कोपरा. गच्चीत फे-या मारत किंवा  कोप-यातल्या  दगडी  स्टुलावर  बसून अभ्यास केला तर हटकून चांगले मार्क मिळायचे.  कसे ते मात्र विचारू  नका. कारणं.  खरं तर  अभ्यासापेक्षा नजर  अटकून  राहायची ती वर  उडणा-या रंगीबेरंगी पतंगावर, किंवा थव्या-थव्यांनी कानांवर  धडकणा-या  चिवचिवाटावर, किंवा ढगांनी आकाशात पेरलेल्या  रांगोळीवर  हे सर्व  पण  माझ्याच हक्काचे  नव्हते का ?आणि हिच वर्णन सांगणा-या कविता-शेली, कीटस, वर्डस्वर्थ-किंवा आपल्या हिंदीतले प्रसाद, महादेवी, निराला-त्यांच्यावर  पण माझीच मालकी नव्हती का? फक्त तेव्हा ही मालकी मला शब्दांत नसती पकडता आली एवढंच.
              आणि संध्याकाळी ती सोनेरी किरणं आणि  त्यांच्याबरोबर भिरभिरणारी माझी  सूर्यमुखी नजर पण!  ती सोनं पांघरून घेतलेली जाळीची खिडकी  आणि  खिडकीच्या  आत खूप काही  काही! खूप म्हणजे काय?  तसं काहीच  नाही!   एका किचन ओटयावर मांडून  ठेवलेलं थोडसं सामान-स्टोव्ह, सॉसपॅन, चहा-साखर डबे, आगपेटी, एखाद-दुसरी कागदी पुडी;  बस!  रात्रीच्या अंधारात बाल्कनीतून  पाहिलं तर थोडं वेगळं  दृश्य -किचव ओटा अंधारात गुडूप आणि  खोलीच्या  मध्यावर  एक टेबल , शेजारी खुर्ची, त्यावर एक  टेबल-लॅंप आणि पुस्तकाच्या थप्प्या, खुर्चीवर एक पाठ आणि एक पाठमोरं डोकं .जणू  समाधिस्थ! ती समाधी भंग करू पाहणार एक अलार्म घड्याळ टिक्-टिक् वाजणार. कधी कधी  त्याची  टिक-टिक बाल्कनीत सुद्धा मला नस-नसात जाणवाची.
             "ताईसाहेब, ही... ही किल्ली!"  लख्ख धुतलेली हाफ-पॅंट, शर्ट घातलेला  तो आठ-दहा वर्षाचा पो-या होता.
                 "किल्ली , कसली किल्ली, कुणाची  किल्ली?" -मी माझ्याच बेफिकरित, उगीचच विचारलेला प्रश्न!
"ते ...ते समोर दादा राहतात ना ....!"
"मी कोण्या  दादा-बिदाला ओळखत नाही!
                            "पण तुमच्या मम्मी ओळखतात!"
                            "ए वेडया-ती  माझी मम्मी नाही, वहिनी आहे!  आणि तुझ्या दादाची किल्ली इथे  कशाला   आणली आहेस? " त्या  पोराला चिडवण्यात मला गंमत वाटू लागली होती.
                           "दादा म्हणजे किनई, ते साहेबच आहेत माझे पण  मी  त्यांच्याकडे  कामाला आहे पण  ते साहेब म्हणू देत नाहीत अजून  विद्यार्थीच आहेत ना, म्हणून!"
                         "बापरे! तू तर हजार किलोमीटर लांबीच भाषण  ठोकतोस !  ठेव तिथे किल्ली आणि  पळ!"
                         "बरं!" म्हणून  तो  निघाला.पण परत फिरला.   "तुमच्या मम्... वहिनींना सांगा, संध्याकाळी  ते मागायला येतील  तेव्हा  किल्ली द्या!"
                      "देऊ बाबा देऊ, आताजा, माझा खूप अभ्यास पडलाय माझा!"
                     इथे समोरच  राहातो आम्ही ती... जाळीची  खिडकी दिसत्येय ना....!"
            अस्सं! म्हणजे तोच जाळीतून दिसणारा  समाधिस्थ चेहरा ! इथे  अभ्यासाला राहिलाय म्हणायचा! ते कळतच होत म्हणा ! काय  त्याचा पो-या आणि काय  त्याचा  अभिमान ! अशी  किल्ली जपत  होता  जणू त्याच्या  साहेबाच्या  घरात काही  लाखमोलाच्या  वस्तू  ठेवल्यात. शेजारची  किल्ली  उचलून  मी तिच्याशी  थोडावेळ खेळत बसले. एक पितळी  किल्ली  आणि  धनुष्याचे सप्तरंग  घेतलेला प्लास्टिकचा एक तुकडा! काय खास आहे त्यात? त्यापेक्षा उठावं आता आणि तंबो-यावर प्रॅक्टीस सुरू करावी! मीना दत्ताला कॉम्पीटीशनमध्ये हरवून  विजयश्री खेचून आणायची आहे! काय बरं आजचा  चॉईस? हो, जयजयवंतीच.....कोमल गंधारपासून  मींड घेऊन  मध्यापर्यंत  पोचता आलं पाहिजे -करत कान्ह बरजोरी मों सों .......!
              "अंजू~~ !" खालच्या  हॉलमधून वहिनींची हाक येते." सकाळी कोणी लहान मुलगा  किल्ली  देऊन  गेला होता का?"
               " हो हो- तिथेच  ठेवली आहे ना टेबलावर!"
             "अगं! तू बोललीच नाहीस आधी! हे तसेच  परत निघाले होते. मी म्हटलं, आज  किल्ली नाही  दिली  तुमच्या चंदूने.....!  सॉरी हं, आहे , ही पहा, आहेच तुमची  किल्ली  इथे , रियली सॉरी!"
          "नाही हो,  होतं असं कधी  कधी  ! खरं तर मीच तुम्हाला सॉरी  म्हणायला हवं. फॉर ट्रबलिंग यू  सो मच!"
             त्याचाच आवाज! पटकन  जिन्यातून डोकावून  मी बघितलं .मस्टर्ड पुलोव्हर  घातलेला  सावळा  चेहरा . हा पुलोव्हर पाठमोरा माझ्या ओळखीचाच आहे, समोरून नाही, ! आणि जोडीला  त्याचे चहा-साखरेचे डबे पण ओळखीचे  आहेत....  नीघ बाबा आता! झाली ना तुमची सॉरी, थॅक्स ची देवाण -घेवाण!  मग जा  आणि बस  तुझ्या  खुराड्यातच  पुस्तकांचारामरगाडा मांडून . तुझा तो चेंडू  सारखा गोल गरगरीत चेह-याचा पो-या  छातीवर  हात बांधून  चेंडूसारखाच  उडया मारत येत असेल. नाहीच आला लवकर तर उकळून  घे स्वतःच चहा, साखर, दूध पाणी आणि बस जाऊन आपल्या  घडय़ाळाजवळ घोकंपट्टी करायला. तुला पण कुणाबरोबर तरी कॉम्पिटीशन  जिंकायची  असणार!
                म्हणून तर रोज रात्री कितीतरी  उशीरा तुझी  खुर्ची सरकवल्याचा आवाज येतो आणि माझी  झोप  उडते!  रात्रीच्या  निस्तब्धतेत मी  डोकावून  बघते.  बाल्कनीतून .तर तू  पुस्तकं आवरत असतोस. मग टूपकन् स्विच बंद  केल्याचा  आवाज आणि अंधार! ओ  तर आता झोपणार हे महाशय इतक्या उशीरा‍! टेबल लॅंपवर गोलाकार जादुई उजेडात झळाळणारा तुझा समाधिस्थ  चेहरा( मला फक्त पाठमोरं डोकंच  दिसतं असतं.) अंधारात जादूसारखाच  गायब झालेला असतो.  पण माझी झोप  मात्र पार उडून   जाते.  बरचं झालं आता मी  माझा अभ्यास  सुरू करू शकेनं. असं कल्पना जगात उठल्यावर  आळस  पण नाही येत उठायचा. अजाणताच तू मला रोज असं  उठवत राहा. बोर्डात पहिला नंबर काढला तर तिकडे  जसे मारूतीच्या  मंदिरात  सव्वा पावशेर लाडू  पाठवीन तसेच तुझ्याकडे  पाठवीन! हो! ही अंजू  कुणाचेही कळत काय पण नकळत  केलेले उपकारही  ठेवणा-यांपैकी नाही!  तुला तर माहीतच नाही, अजून  अंजू  कोणाला म्हणतात ते! पण  लाडवांचा  डबा पोचला की आपल्या  समाधीतून  बाहेर येशील आणि तुझ्या  चंदूला विचारशील, काय रे, ? कोणी  पाठवली ही मिठाई ? कोण बोर्डात पहिली आली  ? कोण अंजू?
            एकूण या जगाची खबरच नाही!माझ्यासारख. मला तरी कुठे माहीत आहे की तो कोण  आहे ? कुठल्या गावचा ? कोणत्या कॉलेजात ? कितव्या वर्षाला?  त्याला पण  युनिव्हर्सिटीत टॉप यायचय का? त्याच्या  घरी कोण  कोण  आहेत?  तो सुरेख डिझाईनचा मस्टर्ड  स्वेटर ....कुणी  विणून  दिला  आहे त्याला? मला  कुठे काय माहीत आहे...
              आणि माहीत असायची गरजच  काय.... मला नाही इतर टवाळ  मुलींसारखं नसत्या  चांभार चौकशा करायला आवडत!  इतका वेळ  इथे आहेच  कुणाला!  किती कामं पडलीत -अभ्यासाची, प्रॅक्टीसची! त्या मीना दत्ताला हरवायचं पण आहे.
                 "अरे: ; तू! किल्ली द्यायला असा चोरपावलांनी का आलास ?  तुला माहीत नाही कुणाच्याही घरात जाताना बेल वाजवायची  असते!"  या पो-याची  फिरकी घेण्यात मला मौज वाटत होती.  आणि रूबाबपण!
                "हो! माहीत आहे ! "
                "मग?''
                "दादांनी म्हटलं, जोरजोरात बेल वाजवून अभ्यासात डिस्टर्ब करू नको!"
               "कमाल आहे! इथे बेल बाजवून  तिकडे  त्यांच्या  इभ्यासात डिस्टर्ब होतं?"
                  "त्यांच्या नाही, तुमच्या!"
                "मी, माझ्या...." माझा आवंढा गळ्यातच फिरू लागला. मी जणू  आकाशातून खाली पडले.
                "हो! म्हणाले, हॉलच्या दाराजवळच्या  हूक -बोर्डावर गुपचूप किल्ली ठेवत जा किंवा  हळू आवाजात वहिनीला सांगत जा!"
                  "ठीक.व्हेरी गुड! मग टांगलीस ना किल्ली  हुकावर !" मला कसाबसा माझा आवाज परत मिळतो.
                  "हो! " तो चटपटीतपणे मागे  वळतो.  जायला लागतो.  पण आता  पुनः  मला त्याची  फिरकी घ्यायची हुक्की येते.
               "ए, थांब जरा,  खूप स्मार्ट आहेस  रे तू! काय  नाव तुझं?'
                 "माझं नाव? चंदू पण दादा मला चेंडूच म्हणतात."
                   "हा: हा: हा: आणि बरं ,काय काय कामं करतोस तू?"
                   "सगळं काही  करतो.....' हे सांगताना संकोचाने तो लालीलाल झालेला असतो."सकाळी उठून दूधाची पिशवी आणतो, भांडी घासतो, मग  दादांसाठी आमलेट आणि चहा करतो!"
             "वा, वा, तुला आमलेट पण बनवता येतं?"
              "हो!" त्याचा चेहरा खुलतो.. "शिवाय बटाट्याचा रस्सा, खिचडी ,फुलके, पराठे.....!
               "अजून?" मला मौज वाटत होती.
               "दादांची कपडे लॉंड्रीतून घेऊन येतो, त्यांची खोली नीट आवरून  ठेवतो ."
               "शाब्बास, छान ! पळ तू आता, मसा अभ्यास करू दे!"
               परीक्षा आठ दिवसांवर आलेली शकून  येते म्हणते,"अंजू, या निराला नामक कविवर्यांना कॉमा, फुलस्टॉप असे  पंक्च्युएशनचे प्रकार कुणी शिकवलेच नाहीत का?  ती कविता आहे ना रामकी शक्ति-पूजा ती संपता संपत नाही बघ! मी जितकी वाचते तितकिच नव्हर्स होते.  पण परीक्षेसाठी   हॉट- टॉपिक आहे,  बघच तू! चल ना जरा गच्चीतल्या   तुझ्या  लकी  कॉर्नरमधे! नाहीतर तुझ्या नोटस् दे .मी  घोकूनच टाकते."
                  आम्ही  दोघी वर येतो. "अगं, ही कविता म्हणजे  द्रौपदीच्या चीरासारखी लांबच लांब वाढतच जाते नाही! पण तिच्यातले काही उतारे पाठ करायलाच  हवेत."
                  "रवी हुआ असेत, ज्योति के  पत्र पर लिखा  अमर रह गया राम-रावण का  अपराजेय समर"
                   "थांब, ए समोर तो कोण आहे? "  शकुनची दृष्टी पण त्या सोनेरी जाळीत अडकली.
                    "कोण म्हणजे, या जगातल्या  हजारो, लाखोंसारखा एक माणूस  ,किंवा मुलगा, काहीही  म्हण!"
                    "ते दिसतय-मी म्हणते, तुमच्या  घरी येणं -जाणं आहे की  नाही?"
                     "आहे ना,  वहिनीकडे! किल्ल्या  सॉरी, थॅक्यू आणि प्लीज असं चालूच असतं!"
                    "तू एवढी सेल्फ-कॉन्शस का झालीस?"
                   हे तुझ्या डोक्यातलचं काहीतरी!"
                   "लपवू  नकोस हं, चोराच्या मनांत चांदणं!"
                  "कप्पाळ तुझं! मला इतर  खूप उद्योग आहेत."
                  "माहीत आहे, उदाहरणार्थ मीना दत्ताला हरवणं! "
                चेंडू दोन दिवस फिरकलाच नाही. माझं  रूटीन  कुठेतरी  बिनसलं,अस्ताव्यस्त वाटू लागलं. विहिनी

                              गच्चीवरून
           चेंडू दोन दिवस  फिरकलाच नाही . माझं रूटीन  कुठेतरी  बिनसलं, अस्ताव्यस्त वाटू लागलं. वहिनी  पण पुटपुटली. तिला सवय जास्त होती ना!  तिस-या दिवशी  हॉलच्या  दारावर  पावलं वाजली आणि माझे कान टवकारले. पम  आवाज  चेंडोंबाच्या  पावलांचा  नव्हता तर  कर्र... कर्र चकचकीत बुटांचा होता.  वहिनी खाली हॉलमध्येच होती.
             "काय, आज तुम्हीच?  आणि दोन  दिवस चंदू  आला नाही तुमचा ? "
            "हो, तो गांवी  गेलाय्.  त्याची  मुंज करायची  असा निरोप  आला होता. गावाहून!"
            "आज दुपारी चंदू येईल. म्हणून किल्ली ठेऊन जातोय."

            "बरं. बरं!"  वहिनीच्या  हास्य लकेरी  अजून उमटत होत्या. त्यांचं रूटून  पुनः मार्गी लागत होतं.
               परत फिरलेली  पावलं पुनः मागे  वळतात.- प्लीज, त्याला म्हणावं, कपडे भिजवून  ठेवलेत तेवढे  धूवून टाक माझं रात्रीच जेवण  बनवू  नको.पण  स्वतःसाठी  मात्र  काहीतरी  करून घे  खायला. लहान आहे ना, मला जेवायचं नसलं  तर स्वतःसाठी  बनवायचा आळस करतो आणि उपाशीच झोपतो! दामटून  सांगावं लागतं."
             दुपारी खरंच डोक्याची  घोटी केलेला , शेंडीधारी चंदू  आला. अभिमानाने त्याचा चेहरा फुलला होता. तो मोठा झाल्याची  पावती मिळाली होती ना!  त्याला बघून  मी मात्र  हसतच  सुटले. काय  ते ध्यान  दिसत होत.!  वबिनीने आधी  डोळे वटारून  माझ्याकडे पाहिलं  आणि त्याच्या  खांद्यावर थापटून  किल्ली  त्याला  दिली . त्याने माझ्याकडे  सुकल्याचा चेहरा करून  पाहिलं आणि  रोजच्यापेक्षा वेगानं पळत गेला.
            तो दिवसभर मी चंदूचीच आठवण काढून हसत  राहिले. आणि  वहिनी मला सारखं रागावत राहिली. " आज झालय तरी काय  या अंजूला ? परिक्षा  संपताच  बहुतेक  हिला  एखाद्या  सायकिअट्रिस्टकडे न्यावं लागणार!"
               पण माझं हसणं थांबत  नव्हतं.  मधेच  थांबून मी म्हटलं "परत येऊ  दे - चिडवायला मजा येईल   त्याला 'लम्बू दादाचा गंजा चंदू.' वहिनीने हातच उगारला! मी पटकन वही उचलून वर पळाले.
              बिचा-याला चंदूला इतकाका चिडवत होते मी ?
                  "एक्सक्यूज मी......"
              मी  दचकून  वर पाहिल.
              "जरा किल्ली न्यायची होती."
               - तोच  तो लॅम्पच्या प्रकाशानं  कधी तरी  दिसणारा समाधिस्थ चेहरा, आज संपूर्ण चेतन , साकार होऊन  माझ्यासमोर उभा होता. पण मी भानावर येत नव्हते .तशीच बसून  राहिले.
              "कुठे  ठेवलीय किल्ली ? जरा  विचारता का ?"
              "किल्ली ना, हो ही काय किल्ली!"
            जणू काहीच झालं नाही असं  दाखवत  मी वहीखालचा तो सप्तरंगी प्लॅस्चिकचा तुकडा त्याच्याकडे सरकवला आणि  काहीच न बोलता वहीवर झुकले.
             "थॅक्स अ लॉट..."
           मी तशीच.
            "अंजू  , हसणं थांबलं असेल तर आत ये चहा प्यायला"  आतून वहिनीचा आवाज.
          कसं  थांबल माझं हसणं  एका  झटक्यात?  तू आल्यावर मी थोडी बेपर्वा वागली असेन. तुझ्याकडे न बघताच  की- रींग तशीच सरकवली असेल. कदाचित  सामान्य  शिष्टाचारपणा पाळला नसेल !  पण काही बिघडलं का? मी स्वतःशीच जस्टिफिकेशन देत बसले मला माझा अभ्यास असतो की नाही?  कुणाकुणाशी गोड हसून   बोलण्यात वेळ दडवायचा?  मला तसल्या  फॉर्मलिटीत काहीही इंटरेस्ट नाही. तू किल्लीशिवाय काहीही विचारलं नाहीस, मी  किल्लीशिवाय काहीही सांगितलं नाही.
   -बस ! तू  तर ' थॅक्स अ लॉट' पण  म्हणालास. म्हणजे  तटस्थेची एक तरी  पायरी  माझ्यापेक्षा खालीच राहिलास.
       पण मला किती अभ्यास आहे.  मला ही  तटस्थाच ठीक आहे.  शिवाय  मीना दत्ता बरोबर  कॉम्पिटीशन पण  जिंकायची आहे.
            पण  आता इथे  हॉलमध्ये बसून  अभ्यास होऊ शकत नाही. गच्चीवरून  जायला पाहिजे. त्या  आवडत्या  कोप-यात! तिथून  तुझी  खिडकी   दिसते!  सूर्य आत्ताच बुडालाय!  तुझ्या  मस्टर्ड कलरचा पुलोव्हरा रंगय ढगांवर  पण  आहे  हो  आठवलं कारणं एकच  तर स्वेटर  आहे  त्याच्याजवळ म्हणून  बघणा-याला रंग लक्षात  राहातो. किंवा  काही काही  रंगच असे  असतात जे  काही लक्षात राहतात. बाकी खास  काही  नाही  त्याच्या  स्वेटरात.
              आकाशात रंगीत पतंग  डोलतायत.  लाल, गुलाबी, निळा, हिरवा- इंद्रधनुष्याचे सर्व रंग घेऊन  .त्याच्या  कीरंग मधल्या  सप्तरंगी  प्लॅस्टिकसारखे!  जाऊ दे. आता रंगाशी नको, साक्षाते वर्डस्वर्थशीच सामना  द्यायला  हवा. बापरे! एक इंद्रधनुष्य पाहिलं आणि  डोक्यावर  घेऊन  नाचत सुटला !  शेकडो  पिढ्यांतील  विद्यार्थ्यांना डोकेदुखी  देऊन  गेला!   "सो  वॉज इट व्हेन माय् लाइफ  बिगॅन, सो  इज इट  व्हेन आय ऑम अ  मॅन, सो बी इट सो, व्हेन आय् ग्रो ओल्ड, ऑर लेट मी डाय.'
           इंद्रधनुषी पतंगांतून निघून अबलख दृष्टी जातेच  त्या सोनेरी जाळीवर आणि  अडकतेच तिथे तसं काय आहे म्हणा आतमध्ये?  तेच ते पसरलेले डबे, स्टोव्ह, गाळणं..., आज एक शेविंग क्रिम, टूथपेस्ट आणि टाल्कम पावडरचा डबा पण दिसतोय. त्या  चंदूने आवराआवरी  केली नाही वाटतं अजून ?  याच्या  सर्व  गोष्टी  अशाच  विखरून  पडल्यात!  ठिक आहे, दृष्टी अडकली त्याच्या  खोलीत म्हणून  बिघडत काहीच नाही.  तेवढीच अभ्यासातली मोनोटोनी संपते.
          बरं चल , आता  तो पुन्हा आला किल्ली मागायला, आणि मी हॉलमध्येच  टेबलावर  नोट  लिहित बसले असले, तर  नीट बोलेल ना त्याच्याशी? तो थॅक्स म्हणाला तर मी  म्हणेन, इटसं ऑल  राइट पण तो  चंदूबद्दल काही बोलायला लागला तर  मात्र मला  हसूच  येईल  कदाचित  तो पण  हसेल.वहिनींबरोबर कसा हसून  बोलत होता. सकाळी!  पण तो यायला त हवा, किल्ली मागावी..... काही बोलावं, चंदूबद्दल बोलावं.... तरच त्याचं हसू  ऐकायला  मिळेल ना.... !
             जाऊ दे, हे तर  असेच  डोक्यात  विचार आले .नाहीतर माझी  किती कामं पडली  आहेत.  पण मी  ही कविता  डोक्यातून  जात नाही.
             'कौन आई, माया में  लिपटी,
          अंधरोंपर उंगली धरे हुए;
             माधव के  सरस कौतुहल का,
          ऑंखो में  जादू भरे हुए....'
            कोण आली? आली.... आला
         .... आला..... आली..... आला...!
           घरात  शिरता शिरता वहिनी  कोणाशी तरी बोलत असल्याचा आवाज ऐकू येतो. माझ्या ह्दयाचा एक ठोका चुकतो. एकाच का, कितीतरी? पण वहिनी चंदूशी बोलत असते.
           "अरे, ते तर गेले. काहीतरी घरून तार आली होती. तुला आता येऊ नको, म्हणून  सांगितलं आहे .जेव्हा ते येतील तेव्हा तुला बोलावणं पाठवतील!
          चंदून सर्व समजल्यासारखी मान  हलवली. पण त्यांच मन हे सर्व  स्वीकार करत नसावं.  तो उदास झाला होता. तुटक तुटक वाक्यांत विचारत होता. अजून काय म्हणाले, अंदाजे किती दिवसांनी येणार म्हणून  बोलले? की मी पाच- सहा दिवसांनी   चक्कर  टाकून  जाऊ ?  तुम्हाला काही पत्राने कळवणार आहेत का?.......
             वहिनी काहीशा त्राग्यान् म्हणाली "हे सर्व मला विचारू नकोस. जेवढा निरोप होता तो तुला सांगितला!"
              उदास होऊन  पो-या बिचारा परतला. खाली मानेने  जाता जाता अचानक  उघडया खिडकितून  आत डोकावला आणि  स्वतःशीच  म्हणाला, "स्टोवर सकाळचा शिरा झाकून  तसाच  पडलाय. काही  न  खाताच गेले वाटतं..."
              मी बाल्कनीतून  वाकून  त्याला पहात  होते. वाटलं  त्याला   ओरडून  बोलवावं  विचारावं  त्याच्या  मनात काय  चाललय या क्षणी?  तुझ्या  कोणत्या  आठवणी  येताहेत? चांगलं आमलेट केल्याबद्दल तू त्याला शाबासकी  द्यायचास ते?  किंवा तो असता तर तुला काही तरी  खाल्ल्याशिवाय त्याने  जाऊचं  दिलं नसतं, हे? कधी  कधी तू त्याला  तुझ्यातलं ग्लासभर दूध आणि  ब्रेडचे  स्लाईस खायला द्यायचास ते  ?   का फक्त एकच  गोष्ट- तू कधी  परत येणार? पाच  सहा दिवसांनी   ?  नाही ,  लवकर पण येऊ शकतोस. कदाचित दोन दिवसांत! मग तो    जर दोन  दिवसांनी  चक्कर  टाकून  गेला तर?  आणि  दोन  तरी का?  तो  रोजच  चक्कर  टाकू  शकतो,  खरंच  म्हणजे  मी नाही -तो चंदू  हा सगळा विचार  करत असणार!
             मला तर म्युझिक स्पर्धेसाठी जयजयवंती पक्का करायचा आहे. ताना पाठ करायच्या आहेत. गंधावरून  धैवतापर्यंत मींड   न्यायची  आहे.  शिवाय  गच्चीवर जाऊन  निबंधासाठी काही  कोटेशन्स पण पाठ  करायची  आहेत.  बस...
           असेच दिवस येतात आणि जाताता. मी खिडकी बघत असते. एवढंच- खास  काहीच नाही, पण खूप  दिवस  झाले- दोन, चार, सहा, आठ! किती विचीत्र वाटतयं! काय  कारण  झालं  असेल त्याने  न परतायला!  तो पोगरा अजून  उदासच असेल कां?
                
                                       गच्चीवरून
            बूडत्या  सूर्याची  किरणं  अजून  त्या  जाळीला  सोनेरी  वर्षावात  बुडवतच असतात.  म्हणून  मी त्या  खि़डकीकडे  बघत असते.  आणि हे जे अवचित  डोळ्यांत पाणि येत ना ते  महादेवींची कविता पाठ करत राहिल्याचा परिणाम- बाकी खास काही नाही.  आता तर  खिडकिच्या  पलीकडच्या अवस्थेत पण  काही  नवीन  बदल झालेला नाही.
            कोप-यांतलं गाळणं, स्टोवरंच शि-याच पातेलं , खुर्चीवरचा नॅपकिन  हे  सगळ  बदलत  पण नाही ,रोज  रोज तेच  तेच काय  बघायच?  पण सवय जडली ना  की ती  पटकन मोडत  नाही.
               एक दिवस  कॉलेजमधून परतताना दिसलं- खिडकिची  दांर बंद  झालेली  होती.  माझं मन  एकदम  फुलून  आलं,  कुतूहुल, जिज्ञासा आणि अशाच  खूप  खूप भावना .त्यांना शब्दच  सापडेनात. तू  आलास!  किती दिवसांनी  आलास. आता उद्या तो पो-या किल्ली द्यायला येईल. तेव्हा चेडवीन  पुन्हा त्याला ! पण  उद्या  का?  आजही कदाचित तू किल्ली ठेवली  असशील ? म्हणजे संध्याकाळी  येशील.
                आज खूप  अभ्यास पडलाय. आज  संध्याकाळी हॉलमध्या टेबल खुर्चीवर  बैठक मांडून  सगळ्या नोट्स  काढायलाच हव्यात . आज गच्चीवरचा अभ्यास बंद!
                घरात शिरताना कानोसा घेतला पण कसलीच चाहूल नव्हती. वाहिनी किचन  मधून  फक्त  म्हणाली,"आलीस, चहा  घेऊ   या जराश्याने."
          कमाल आहे! एरवी  इतक्या गप्पा करते- त्या चंदूच्या, त्याच्या  दादासाहेबांच्या, आणि  आज  काहीच  नाही.  तिने काहीतरी  बोलायलाच हवं  त्या खिडकिची  दारं बंद  कशी ?  तू आलास ना म्हणूनच?
                     "अंजू ये ! "  आणि मग  किटलीतून चहा ओतत वहिनी म्हणाली, "बिच्चारा चंदू! आज खूप रडत होता. - तो निघून गेला ना!"
             मला एकाएकी  वाटलं वहिनीचे  शब्द या कपातल्या चहासारखेच  आहेत.  साठत चाललेत. पुढे सरकतच नाहीत.
             "कोण?  कोण निघून गेला?"
      माझ्या आत काहीतर धडधडत होतं.
       "तोच- अमित- ज्याच्याकडे चंदू कामाला होता. चांगला वागावायचा त्याला! आज  सकाळीच  आला होता. आणि सामान  बांधून लगेच  पुढच्या  गाडीने परत गेला. त्याच्या  घरून तार आली.  ती वडीलांची होती.  त्यांना  हार्ट ऑटॅक  ाला .बिच्चारे  आता   घरात बघणांर कुणीच नाही. भावंड सगळी लहान आहेत.  तिथल्याच कॉलोजात शिकणार आता. नोकरी पण  बघणार . चंदू तर किती रडत होता.  खूप समजावायचा प्रयत्न केला अमितने त्याच्या  पायाला विळखा घालून  रडत  होता. तो गेला तरी हा खिडकीपाशीच  उभा राहून  रडत होता."
           माझ्या डोळ्यांत काहीतरी गेले आणि  मी तडक बाथरूममध्ये  घुसले. खूप  वेळ तिथेच होते.
         मग पुस्तकं  उचलली आणि  गच्चीवर निघून  आले. ती जाळीदार खिडकी आज  नव्हती, पण बाकी काही बदललं  नव्हतं, काहीच!  तेच ते घरटयाकडे परतणारे थवे,  झाडांच्या टोकांवर कधीतरी अडकलेले पतंग  ,सुर्य बुडालेला आणि आसमंतात दाटून  येणारा काळोख!
         मनातं आलं , चंदूला बोलवावं. त्याचे  खरबरीत  हात हाताता घ्यावे. ज्या  हातांनी तो तुझी भांडी धुवायचा, खोली आवरायचा, तुझ्या हातात चहाचा कप  द्यायचा. जाताना तुझ्या पायाला विळखा घातलेले त्याचे हात. ते बघावे . असंच, सहज म्हणून आणि जमलं तर त्या  तळहातांना स्पर्श करावा....
        पण हे काहीच  केलं नाही. कुठून  तरी ओढून , ताणून  धमकावून काही  शब्द गोळा केले-त्यांनीच मग  मला सांगितल, चल जाऊ  दे .असेल कुणी  अमित - तो चंदूला मानत होता आणि चंदू त्याला तुझं काय ? आता ही कथा इथेच  पुरे!
              तसं झालंच .तो प्रसंग संपला दिवस  जाऊ लागले.  महिने , वर्षे, गेली, वयाबरोबर खूप काही कमावलं. विशेषतः लेखिका म्हणून!
                 मग अलीकडेच माझी एक  गोष्ट  छापून आली .त्या  जाळीवाल्या खिडकीची.
                मग काही दिवसांनी एक पत्र आलं . "माझ्या आयुष्यातल्या, किशोर वयातला हा एवढाच छोटा अबोध  तुकडा मी फक्त माझा म्हणून  जपला होता. अबोध अशासाठी म्हणतोकी तेव्हा मला शब्दच  सापडले नव्हते माझ्या भावना व्यक्त करायला.  त्या भावनांना काही नावही देऊ  शकलो नाही.  त्या आधीच सर्व  काही संपंल!  ती जाळीची खिडकी. चंदू,किल्ली ठेवण्याची सवय.. आणि खूप काही!  आजही त्यासाठी शब्द सापडत नाहीत.  पण तुम्हाला हे कसं  कळलं? यथार्थ समजून  घेण्याचं सामर्थ्य कल्पनेत पण असतं का?....'
              पत्र घेऊन  सरळ वहिनीकडे आले.  इथे  गच्चीत  उभं राहून  वाचलं .ती समोरची जाळी  आता राहिली  नाही. पण वरंच  आकाश तेच आहे. बुडणारा सूर्य  तोच  आहे. त्या आठवणींना उजाळा देणारा!
              आणि आता निघते मी अमित!  आज माझ्या  नव-याला, मुलांना खूप खूप  प्रेम देणार आहे. एका  अख्ख्या जीवनात देता येऊ शकेल एवढं  प्रेम!  
 --------------------------------------------------------------------------
                              











 















         





















           













                        














               






























           
 














             
             














          
           














                    














     













           














       














    
















कोई टिप्पणी नहीं: