मंगलवार, 28 मार्च 2017

चक्रव्यूह -- अनिता अग्निहोत्री

चक्रव्यूह
मूळ कथा: अनिता अग्निहोत्री
मराठी अनुवाद: लीना मेहेंदळे
            चकचकीत वॉश बेसिनवर हात धुता धुता कुसुमजितच्या  चेह-यावर हसू  फुटलेलं पाहून  महुआ दचकली.
            काय बरं उणं राहिल असेल आपल्या सजावटीत?.... एरवी ती आणि  कुसुमजित  एकमेकिंशी मनमोकळेपणे बोलत  असल्या आणि मैत्रिणी म्हणवत असल्या तरी कुसुमजित समोर आल्यावर  महुआला एक प्रकारचा इन्फिरिऑरिटी कॉम्पलेक्सच वाटत राहतो. ही  कधी  आपल्या  कोणत्या  गोष्टीला किंवा विचाराला खुदकन  हसेल   याचा काही नेम नाही. हिचं  असलं  हसणं व्देषबुद्धीचं किंवा  व्यंगाचं नसतं. , अगदी  सरळ मनानेच  ती हसून  चाकते हे  माहीत  असूनही तिच्या  हसण्यासाठी महुआला भीतीच वाटते.
                       जेमतेम  अर्ध्या तासापूर्वी तिचा फोन  आला होता. - " महुआ, तू  घरीच  आहेस  ना ? मी  येत्येय आठ वाजता. खूप  गप्पा  करू  आपण. आणि हे बघ ,मला भूकपण  लागलीय, सकाळपासून  जेवायला. वेळच मिळाला नाही."
                     दोन वर्षानंतर  तिचा  अचानक  फोनवर  आलेला आवाज  ऐकून  महुआ  स्तब्ध  झाली क्षणभर! तिनं  लग्न  केल्याचं  उडत उडत ऐकल पण  तिच्या स्वतःकडून  चकार  शब्द नव्हता! आणि  आज  अचानक  ती इथे ? कसंबसं  सावरून महुआने  विचारलं होतं,  "अग, कुसुमजित, होतीस कुठे ?"
                     " ते सगळं भेटल्यावर बोलू या!  See You,  बाय," अस म्हणून कुसुमजितने  फोन बंद  केला होता.
                       इकडे महुआची धावपळ सुरू झाली. ही येऊन  ठेपण्यायाआधी इतकी कामं संपवायला हवी  होती की बसून  हिच्या बद्दल  विचार  करायला वेळच नव्हता.
                   हॉलमधल्या  पसा-याची  आवराआवरी  करून शेवटचा होत तिने  स्वतः फिरवला होता.    वॉश बेसिन लख्खं केलं होत. त्याच्या  शेजारच्या प्रशस्त  ओटयावरील कुंडीत  काही पानं वाळलेली  होती म्हणून  ती कुंडीच  बदलून टाकलीही होती.  दिवसभराचा वापरलेला  नॅपकिन  बदलला होता.
          हे सगळे करताना  रामजीला  मुद्दाम  स्वयंपाकघरात पिटाळलं होतं.  बाईच्या  मदतीला  त्याला  आताशा कमी दिसतं. तो बाहेर थांबला तर महुआला साफसफाई  करू देणार नाही. त्याने  केली तर  कुठेतरी धूळ तशीच राहून जाणार!  आणि शोपिसेस आकर्षकपणे  लावून  ठेवणं  तर त्याला कधीच  जमणार नाही!
               तसं पाहिल तर कुसुमजितच्या टापटिपीपुढे  आणि उच्च  अभिरूचीपुढे  महुआचं इंटिरियर डोकोरेशन पण फिक्क वाटतं. सुदेश तसं नेहमीच  म्हणतो.  खुद महुआला पण ते जाणवलं होत.
              एकदा  ती आणि सुदेश डेहराडूनला कुसुमकडे गेले होते. मोठया प्रशस्त हॉलमध्ये  लांबत लांब गवताची चटई. नागालॅंडमधून  आणलेली.  त्यावरचे सुंदर  डिझाईन नागा कारागिरांच्या  कौशल्याची साक्ष देणारं म्हणायचं  का कुसुमच्या  अभिरूचीची?  शेजारच्या  मोठया  भिंतीवर  रवी वर्म्याच्या  एका  चित्राची  प्रतिकृती ओळीने  भाराभार पुस्तकं !  वर एक  भली थोरली  कासवाची  पाठ! बस्स एवढंच  इंटिरियर डोकोरेशन आतल्या  खोल्यांमधेही  पसारा कुठेच  नाही!
               ती एकटीच आहे  म्हणून  जमतं  तिला हे सगळं ,  अशी फक्त   आपण  आपल्या मनाची समजूत  करून घ्यायची . तिचा नोकर मात्र  अभिमानानं सांगत होता. , बाईंना पसारा अजिबात चालत नाही. स्वतः घराच्या  आवराआवरी  व सजावटीसाठी  किमान एक तास  तरी काढताताच!"
                 शिवाय तिच्या मेकपवर देखील  ती एखादा तास  रोज  घालवत  असणार असा महुआचा अंदाच.
                महुआ तिच्यापेक्षा सौंदर्यात उजवी खरी,  पण तिच्या  बांधेसूदपणाची  महुआला नेहमीच  ईर्ष्या वाटते.  पाच  फूट  तीन इंच  उंची. भव्य  कपाळ .चेह-यावर मेकप  काहीही नाही. असं  ती म्हणते,  पण महुआला  ते पटत नाही.
                साधा रफ  कापडाचा पंजाबी ड्रेस  आणि  गळ्याला स्कार्फ!  कुणाला खरे वाटेल का की ही साधी  दिसणारी , उच्च अभिरूचीने  वागणारी,  पस्तिशीत असून  एकटीच  रहाणारी आणि  कॉलेज  गर्ल दिसणारी बाई  एका जिल्हयाची कलेक्यर आहे, आणि  रात्रदिवसाचे  तिचे दौरे , बैठका, व्हीआयपी व्हिजिट वगैरे सर्व  धरून  किमान  सोळा सतरा  तास कामात  घालवते म्हणून?
         हे सर्व विचार  सर्रकन महुआच्या मनात येऊन  गेले. कुसुम अजूनही हसतच  होती.  कोप-यातल्या  लाकडी  घोडयाच्या अंगुलीनिर्देश  करून  म्हणाली, "  हे कुठून  आणून ठेवलसं?"
           "ओह! चिमूचा घोडा!" त्या टवके उडालेल्या  , रंग  विटलेल्या  लाकडी  घोड्याला पाहून  महुआ ओशाळली.
           - ही मुलं अशीच  कधीही तोंडघशी  पाडतात. खरं  तर हा लाकडी  घोडा  तिच्या  आईने मोठ्या बहिणीच्या  मुलासाठी  आणलेला. पण  एक दिवस  चिमू  आजीक़डे   जातो काय  आणि  त्याच  घोडयाला हट्ट घेतो काय !  शेवटी बहिणच म्हणाली आईला, " अंग नेऊ  दे त्याला तो घोडा - किशोर आता मोठा  झालाय. तो खेळतच नाही  घोडयाशी .'तेव्हापासून घोडा इकडे येऊन  पडलाय! चिमू भलेच खेळणार नाही.  पण रोज उठून  मात्र,  'कुठे  आहे माझा  घोडा?' म्हणून  विचारणार. असला हा बालहट्ट -महुआने  स्वतःची बाजू  सावरत सांगायचा प्रयत्न केला.
           ' असूदे असूदे, ! माझ्या आयुष्यात असल्या बालहट्टाला जागा नाही! जेवायला वाढ बाई! खूप  भूक लागली!"
           जेवायला बसली ती कुसुम अगदी गप्पच होती. चिमू  आजीकडे गेल्यांच तिला  माहित  होतं. तिने आणि  महुआने सुदेशसाठी  जेवायला थांबाव हेही अपेक्षित  नव्हतं.  सुदेशला मंत्रालयातून  परत यायला दहा-अकरा पण वाजतात. आताशा  तर तो क्लबमध्ये  पण बराच जायला लागला आहे. कुसुमजितचा निरोप  मिळाल्याबरोबर  महुआने सुदेशच्या  ऑफिसात  फोन  केला होता.  आला नसेल तर  त्याच्यासाठी  थांबून रहायच बंधन नाही हे या  दोघांत पूर्वीच  ठरलं  आहे.  तरी तिने एका  शब्दानेही  सुदेशबद्दल विचारू  नये? 
               आणि  जेवणाकडेही हिचं  लक्ष नाही. रामजीने पु-या वाढायला घेतल्या  तर हिने  आधि भातच मागितला आणि तिच्या  सवयीप्रमाणे  कोरडा तूप- भातच खात्येय.
                    रामजीने  आणलेल्या   फिशकरीलाही तिने  नाही  म्हटल्यावर  महुआ  चिडलीच.
                   "अग फिश करी  खाणार नाही तू?मी स्वतः उभी राहून  करवून घेतली."
                  " मी ते सगळं  खाणं सोडलयं! पक्की  शाकाहारी  झालेय."
                   "का पण" ?  महुआ खट्टू झाली. "   शाकाहा-यांना खाण्यासारखंच काय असतं  जगात, असं म्हणारी तू!  तू कशी  शाकाहारी  झालीस? आणि  कायगं ? तुझ्या  लग्नाची काय भानगड झाली?  त्याचा आणि  याचा संबंध नाही ना ? " लग्नाबद्दल कुणालाही आपणहून  विचारणे अशिष्टपणाचे आहे,  हे माहित असूनही  महुआला आता राहावले नाही.
                  "महुआ, गेल्या दोन वर्षात सू माझ्याबद्दल जे काही  ऐकलसं त्यात माझ्या लग्नाचा मुद्दाच तुला जास्त  महत्वाचा वाचतो? इतर काहीच ऐकलं नाहीस? कुसुम किती  अकार्यक्षम  कलेक्टर  होती, कशी  भावनाशील होती... खुद्द होमसेक्रेटरीचं मत की , बायका सदा कवितांच्या  जगात वावरतात. त्या  कधीच प्रॅक्टिकल होऊ  शकत नाहीत!  म्हणून   त्या  अकार्यक्षम ठरतात.  यातलं काहीच तू ऐकलं नाहीस?"
              महुआ गडबडून गेली. हे सगळं तिने ऐकलं होत. पण तिने मान डोलावली.
              " - मला नाही  एवढं  काही  आठवत."   
                                      चक्रव्यूह
         "तू आठवलं तरी  बोलणार नाहीस,  पण  मला रामअवतार सिंगाचे  नेमके शब्द आठवतात  -कुसुमजित  अकार्यक्षम कलेक्टर होती म्हणून  तिची बदली  केली.  असं त्यांनी प्रेसला सांगितलं.  होत."
            "आणि  सी. एम.?"  महुआने  विचारलं खरं,  पण लगेच  जीभ चावली!
             "डिव्हिजनल कमिशनेच  विरोधी  रिपोर्ट दिल्यावर  सी.एम.  काय म्हणणार? किंवा  गव्हर्नर  तरी? माझी  चूक एवढीच की मला इतरांसारखं गोड गोड  बोलता येत नाही. माझी  आई मला मधांच बोट चाटवायला विसरली होती ना!"
              महुआचा चेहरा गोरा मोरा झाला, हे मधाच्या  बोटांच प्रकरण  सुदेशनेच तिला सांगितलं होतं.  पण जवळ जवळ वर्षाने! वर्षभरात  त्या प्रकरणाचे  उलट  सुलट प्रकार ऐकून  शेवटी  तिनेच  त्याला विचारलं होतं.
               मसूरी चेहरा अकॅडमीच्या  दोन वर्षाच्या  शिक्षणाचा  शेवटचा टप्पा  म्हणून सर्व IAS   अधिका-यांना  ग्रुपने  वेगवेगळ्या  सरकारी  कंपन्यांकडे  पाठवतात. त्यावेळी  असेच एकदा रेस्ट  हाऊसच्या  बाल्कनीमध्ये केस धुऊन  ते कोवळ्या  उन्हात वाळवत  कुसुमजित उभी होती. सुदेशने कॉमेरा काढला-"कुसुमजित  एक मिनिट  तशीच पोज धरून ठेव . तुझ्या  गालावरचा  तो पाण्याचा थेंब  टिपायचा आहे."
              "आणि कुठे  अडकवणार  तो फोटो?  तुझ्या बेडरूममध्ये एनलार्ज  करून ठेवणार  असशील बहुतेक!"
                अपमानाने  क्षुब्ध  होऊन  सुदेशने  कॅमे-याचे  शटर लावून   घेतले. " तुझ्या  आईला तुला मधाचे बोट  चाटवता आले नाही  पण तू  जन्मल्यानंतर? "
         "आले ना- पण तो कडूनिंबाचा  मध होता ! "
        "बरचं  ऐकंल कुसुम,  तुला अकार्यक्षम  ठरविण्यात आलं, पण तू एका  शब्दानेही निषेध  नोंदविला नाहीस,  उलट  तू लगेच  दिल्लीचं  पोस्टिंग  कबूल केलंस . तिथून तुझ्या रजेची, नंतर  लग्नाची नंतर  घटस्फोटाची  बातमी पण ऐकली . आमंत्रण  पत्रिका तर सोड, तू  साधं  फोनने पण  कोणालाही  कळवलं  नाहीस.  सगळं कसं  झर्रकन  घडून गेल. तुझ्यात मात्र  काहीच  बदल  झालेला  दिसत नाही. तू शाकाहारी  झाल्याचं सोडल तर !"
         "मी  अकार्यक्षम  झाल्याचा तो पुरावा  वाटतो का तुला?"
        "तू कार्यक्षम असल्याचं सर्टिफिकेट तुला  राज्यपालांनीच दिलं  होत. म्हणूनच त्यांनी तुला राज्यपालांच्या  उपसचिव पदावर  घेतलं  होतं.  पण  तिथे तू फार काळ  राहिली  नाहीस  आणि  नंतरही  त्यांच्याजवळ   वाशिला लावणं  शक्य  असून  या  प्रकारानंतर  तू त्यांनी  भेटली नाहीस,  त्या अर्थी  तुझ्यातल्या  दोषांची  जाणीव तुला  होती असं बोललं जातयं!"
           "तुला कुठे  हे ऐकायला मिळाल?"
            "पंधरा दिवसांपूर्वी IAS ऑफिसर्स वाइव्हज् असोसिएशनचा कार्यक्रम होता. त्यात  मिसेस वर्मा सांगत होत्या . सध्या  मिस्टर वर्मा  जी. ए .डी . सेक्रेटरी आहेत माहीत आहे ना तुला ?"
          " तू का नाही भेटलीस राज्यपालांना?''
         "तुला माहित आहे का मी त्यांची  उपसचिव म्हणून कशी लागले.?  मेडिकल  युनिव्हर्सिटीचे  कुलगुरू भार्गव  आहेत ना?  त्यांच्या मुलीच्या लग्नाला मी गेले होते. तिथे  राज्यपाल पण आले  होते.  त्यांचा  रूबाबदारपणा  तुला माहित आहे ना?  त्यांना  जवळं माणसं पण  तशीच लागतात. भाटियांच सरळ साधं  व्यक्तिमत्व  त्यांना  अजिबात  आवडत नसे. पण सचिव म्हणून  भाटियांचा उरक खूप होता.  म्हणून  मेनन त्याना बदलत नव्हते.  त्या पार्टीत  खूप  वेळ ते माझ्याशी बोलले. माझं सर्व फॉरेनमधल  शिक्षण, केंब्रिजची  इंग्लिश लिटरेचर  मधली डिग्री , या  सर्वांचा  त्यांना  वासच आला म्हणेनास!
       " त्यांनीच मला त्या पोस्टवर मागून  घेतलं . राजभवनाच्या  रूबाबदार उपसचिव तीही स्त्री म्हणजे  कळसचं ... पण मी फक्त  एक  रूबाबदार बाहुली असेन ही त्यांची समजूत  चुकली."
           " कम ऑन कुसुम!  राज्यपालपदावर  असलेला माणूस  मुरब्बी व मुत्सदी असतो.  त्यात  मेननसारख्या पूर्वी उच्च पदे  गाजवलेल्या  राज्यपालांबद्दल बघायलाच नको. त्यांना  अक्कल नसलेला उपसचिव  घेण   परवडू  शकत नाही. तुझे सी. आर. त्यानी नक्की पाहीले असणार. तू  शोभेची  बाहुली  नसून  एत बुद्धीमान  अधिकारी  आहेस हे  बघूनच त्यांनी तुला  घेतल असणार!  पण तू त्यांच  चीज  केलं  नाही!  " सुदेशच्या मित्रांच्या  गप्पांमधले  संवाद महुआच्या उपयोगी पडत होते.
             " मी बुद्धीबद्दल बोलत नाहीये! फाइली तपायायला, त्यातल्या  समस्यांना उत्तरं शोधायला त्यांना बुद्धिमान अधिकारीच  पाहिजे . त्यातून  तो काळ  म्हणजे  अतिरेक्यांच्या  कारवायांमुळे राज्यात राष्ट्र पतींची राजवट असलेला. म्हणजेच सर्व अधिकारी  राज्यपालांकडे असलेला. त्यामुळे त्यांना अधिकारी असा पाहिजे होता,  जे त्यांच्या  मतांचं समर्थन फाईलवर उत्कृष्टपणे करू  शकेल."
              " मग त्यात काय चूक ?  तू त्यांत कमी पडलीस?"
               "नाही. पम जे घडल ते अचानक घडलेलं नाही.  हळूहळू साठत  होतं.  त्यांच टपाल मी फोडून बघत असे. त्यापैकी  महत्त्वांच मी त्यांच्याकडे  पाठवत असे. त्यांच  लोकांच्या तक्रारी  असायच्या .... त्यांचीच सूचना  होती.  की  सर्व प्रकारच्या  तक्रारी त्यांना  दाखवायच्या  . त्यांत  बायकांची पत्र असायची कुणाचा  नवरा हरवलाय, कुणाचा मुलगा, कुणाचा भाऊ! हरवलेला माणूस पंचविसीच्या आतला असायचा. लोकांचा पोलिसांवर संशय  होता.  काहींना लाल  दिव्याच्या  जीपमध्ये  बसवून  नेलं असं लोक  पहायचे, बोलायचे! पोलिस  ठाण्यांत किंवा  डी. एस. पी. च काय पण डी. एम. कडे  गेलं  तरी  चौकशी होत नाही, प्रकरण  दाबलं जात, म्हणून राज्यपालांनीच  लक्ष घालावं  अशी  कळकळून  विनंती  केली असायची. या  आणि इतर  नेहमीच्या  तक्रारी! नोकरी मिळत  नाही, जमिनीचा वाद सोडवा, बदली करून  शिक्षकाला न्याय द्या, वैगरे! सर्वावर प्रतिक्रिया एकच  , झोकदार सही-ए.एम. .... अमिताभ  मेनन अशी!
             "एक दिवस  मी सरळ सगळी फाईल उचलली- म्हणजे हरवलेल्या  तरूणांची, आणि  त्यांच्याकडे घेऊन  गेले.
             'सर,  या पत्रांवर  तुम्ही काही तरी व्ह्यू  घ्यायला हवा !"
              "अस्स, तुझा काय व्ह्यू आहे? "
             "सर पत्र तुम्हाला आहेत मला नाही!"
              " तू डिस्टर्ब झालीस या पत्रांनी? शासनात इंग्रजी कवितांच रोमॅँटिक आणि भावूक  वातावरण   चालत नाही."
               "मुळीच चालत नाही, असं नाही सर!  आणि मी  पण एसडीएम म्हणून  आणि नंतर  ट्रायबल सबप्लान ऑफिसर  म्हणून काम  केलेलं आहे,
                " तेवढ्यातच इंटरनल सिक्यूरिटीचे  डी. आय. जी.  केशरसिंग आले  आणि   राज्यपालांना सॅल्यूट करून बसले.
            ' तू पोलिसांचे गुप्त रिपोर्टस पाहिले आहेस का ?  अतिरेक्यांचा उच्छाद    किती  वाढला   आहे आणि  किती वाढू शकतो त्यांच क्वार्टरली  अनॅलिसिस परवाच  टपालात  आलं  आहे"   केशरसिंगकडे पाहात राज्यापाल म्हणाले.
                'मी ते वचालसं सर! पोलिसांचा जॉबच  असा आहे की They  have  to  think of  the wrost  possible situation  !  मोर्चा शंभर  लोकांचाचा येणार असेल  पण  पोलिसांना जर असं वाटलं  की कदाचित  शंभराचे  हजार  पण  होऊ शकतात तर पुढले  त्यांचे  रिपोर्ट  असे  असतात की जणू  हजार हीच  मोस्ट रिऑलिस्टिक फिगर आहे.They are  trained    not to  think of  the  possibility that  people may  take  a  milder attitude  That is what civillan officer has to  think, He is responsible for the well-being and the  development of the  society  which  is possible only  when  people are  ready for a  milder attitude.
 
                   चक्रव्यूह
     पण  पोलीस नेहमी  टोकाचं  काय होऊ   शकतं   यावरून   त्यांची स्ट्रेटेजी ठरवणार .पण ती  स्ट्रेटेजी फक्त  तयारीत ठेवायची असते.  प्रत्यक्ष  तितक्या  फोर्सने  वापरायची  नसते.  आणि रूटीन  बेसिसवर  तर  मुळीच नाही! If Police continuse  to  remain  aggresive  and people fear  that  it is now  a  permanent feature of  the  administration, we shall never have peace  and  improvement . police action  has  to be one-time swift act, like a  surgeon's knife. You  cannot keep people under  anesthesia for a long time.'
                  ' Too much of Cambridge. Too much...'      
            मुळीच नाही सर, यातलं  काहीच  मला  तेव्हा कळत नव्हतं.  मी खरंच रोमँटिक पोएट्रीची विद्यार्थीनी होते.  हे सर्व मला प्रशासनात आल्यावरच  शिकायला मिळालं! आणि सर. यातले,  काही विचार तर मी  मिस्टर  चीमांचे कोट  करत्येय . अवर रिटायर्ड डी. जी.!  Can you  doubt his police  acumen?"
                               "He belonged to the old generation and old values'  मध्येच केशरकिंग म्हणाले.
                             'Oid? He retired just last year!  Had he  got  the  extension, the would still  be the D.G. ..!'
     'अतिरेक्यांनी  त्यांना ठार  केलं  नसतं तर!  आपला दिपक  चौहानच घे- एस. पी. ,  किलापुर!  त्याला  अतिरेक्यांनीच  ठार मारलंय!  भेट तू त्याच्या बायकोला !      Then you will be  practical and understand the Police problems'
                          "पण तुला  सांगते महुआ! सिंग किंवा  मेनन  काही स्वतः  मिलीला भेटले  नाहीत,  पण  मी भेटले होते.  दीपकची हत्या होण्याआधीच !  माझी कॉलोजातली मैत्रिण होती ना ती  गुरूप्रीत?  ती  या मिलीची चुलत बहिण. तिचं  आणि गुरूप्रीतच अगदी गूळपीठ होतं. दीपक जॉगींगला गेला असताना त्याला अतिरेक्यांनी अगदी  जवळून  गोळ्या घातल्या. त्याचा छिन्न विछिन्न मृतदेह , दोन लहान लहान मुल, विधवा झालेली बायको  यांची  सर्व  पेपरांनी  मोठी  स्टोरी  केली.
               " पण  पेपरांना जे माहीत नाही  ते हे की  त्याच्या हत्येपूर्वी  दोन महिन्यांपासून  मिलीने  आपला बिछाना  वेगळ्या  खोलीत लावला होता.  दीपक  किलापूरसारख्या  ग्रामीण  जिल्ह्यात डी. एस. पी म्हणून  आल्यापासून  त्याच्यात बदल  होत चालला  होता.  त्याला सत्तेची झिंग चढत गेली . धरपकड, अतिरेक्यांवर हल्ले आणि प्रतिहल्ले, गावागावातून  त्यांचे अड्डे उदवस्त करणे! त्या यशाने  तोही  खुषीत होता.
             " तरी पण जिल्ह्यांत  अशांतता वाढतच  गेली. त्या  कामाचा ताण , थकवा वाढत गेला.  त्या  कामातून  दूपकला मागे  फिरता आले नाही. त्याचा जास्त  वेळ आता पोलीस कस्टडीत  आणि  टॉर्चर चेंबर  मध्ये जाऊ  लागला.  घरी  येतानाही  तो पिऊन तर्र असायचा.
             " तो अतिरेकी आठवतोय, आशीष वर्मा?  त्याच्या बोटांची  नखं  एक एक करून उपटून काढली.
              'मगच कोठे  या हराम्यांना  अक्क्ल येते.'  दीपक मिलीला सांगत होता..
                "ते पाहताना तुझ्या अंगावर  शहारे नाही  आले, ? मिलीनं विचारलं.
                 " शहारे ? काय मूर्ख आहेस! मी  स्वतः  त्याची नखं काढली!"
                 "आशिष थर्ड इयर  इंजिनियरिंगचा विद्यार्थी होता.  आणि एक दिवस  आचानकपणे गायब झाला होता. त्याच्या  वहिनीने  गुरूप्रीततच्या एका मैत्रिणीमार्फत चिठ्ठी पाठवली होती.
               " तुझा नवरा सुपरकॉम आहे. प्लीज जरा  तपास  करायला सांग.  तो पोलीस कस्टडीमध्येच कोठेतरी असेल. तो अगदी निर्दोष आहे.'
                      पुढे त्याचं प्रेत देखील  कुणाला सापडलं नव्हतं.
            'तुला स्वतःला हे सर्व काय  करायची गरज होती?  तुझी नोकरी गेली  असती का? आणि  तुझ्या  कस्टडीमधले  कित्येक निर्दोषही असू  शकतात.' मिलीने  दीपकला समजावयाचा प्रयत्न केला होता.
            " ते तूला कळायचं  नाही. आमचे  कॉन्सटेबल, पी. एस .आय. वगैरेनां कामाला लावायचं असेल, तर  हे  करावांच लागेल. हा  युद्धाचा प्रसंग आहे, तर हे  करावचं लागेल.   आणि हे  छुपे युद्ध  आहे.  आठवतं केशरसिंगने  काय सांगितल होतं.?  आपण फार  आदर्शवाद दाखवायला तर खालच्या  पोलीसांचं धैर्य कसं  वाढणार?'
              " आणि तू  आदर्शवाद ठेवला  नाहीस तर  खालचे  पोलिस जास्त मनमानी  करणार !"
              ' काहीतरी बोलू नकोस. तुला नाही समजायचं!'
               “तुला माझी किंवा पोरांची  पण   काळजी नाही वाटत’
          “दीपकन मिलीला  काहीच उत्तर दिल नव्हत.  नंतर  दोन  महिन्यातच  दीपकची  हत्या  झाली.”
               “ओ माय गॉड” महुआ सुन्न झाली. मग सावरून  तिने ताट सरकावले  आणि हात धुवायला उठली. स्वीट डीश  घेऊन  दारात उभ्या असलेल्या  रामजीला तिनं हातानेच नको म्हणून  सांगितलं. कुसुमजित  पण तिच्या पाठोपाठ बाहेरच्या हॉलमध्ये आली.
                              “हे सर्व मला माहीत होते. पण  केशरसिंग  किंवा  मेननला   हे   सांगून काय उपयोग होता महुआ    नंतर  काही  दिवसांनी  त्यांनी  पार्टीत तो  सीन केला  .मी सॉफ्ट ड्रिंक घेत बसले होते.  तिथे  केशरसिंग चारपाच अधिका-यांब रोबर आले.
                
              ‘माय बॉइज , आपल्या पोलिस पद्धती  बद्दल नक्की काय वाटतं तुम्ही  ऐकलं आहे का”


                    “ त्यात समशेर पण होता. चारपाच ग्लास  बियर नक्की घेतलेला¡  तो म्हणाला, “ तू  फार आदर्शवाद दाखवून  आमची  पंचाईत  करू नकोस . सव्हिस मेंबर  असूनही तूच असं  वागलीस  तर बाहेरची जनता कशी  आपली बाजू  घेणार’   
                       चक्रव्यूह
        "मला कळेना, माझं  काय चुकलं होतं? समशेर गव्हर्नरांचा  एसीडी होता.  अतिरेक्यांचा बीमोड  करतानांच मानवी  हक्क कसे जपता  .येतील  याची आम्ही   चर्चा करत असू . आज  त्याने  वेगळाच सूर काढला होता,  मग त्यांच खरं रूप  कोणंत समजायचं ?
                "अतिरेक्यांचा बीमोड  जितका  आवश्यक  तितकचं  आम्ही न्यायाने वागतो, कुणाला सूड  बुद्धीने वागवत नाही, जुलूम  करत नाही हे  लोकांना दाखवून  देणं  पण आवश्यक . हेच  मत  मी मांडत  होते. पोलीस धरपकडीच्या जोडीने  किंवा त्यापेक्षा  शिघ्रतेने  इतर   प्रशासन  सुधारलं पाहिजे,  याचा आग्रह  धरत होते! पण कुणीतरी  पद्धतशीरपणे  याचा वेगळा  अर्थ काढून  माझ्या  विरूद्ध  विष  रूजवत  होतं. माझ्या पाठीमागे  ही चर्चा  वरच्या  पातळीवर  पण झाली. राज्यपाल , होम  सेक्रेटरी , केशरसिंग ! बरंच काय काय  बोललं  गेलं. 'तिच्या  डोक्यात केंब्रिजची  हवा  आहे.    तिला इथून  पॅक  अप करा ' वगैरे! "
                 घडयाळात अकराचे टोले पडले.  महुआला आसा  सुदेशची  काळजी वाटू  लागली होती.  क्लबही  आता बंद झाला असणार . एक  बाररूम सोडली तर ! महुआने सोफ्यातून उठून  उगीचच एक  फेरी मारली. " तू आता इथेच  थांबतेस का कुसुम? तर तर तुला बदलायला माझा ड्रेस देते."
            कुसुम आतापर्यंत  कधीच  त्यांच्या घरी राहिलेली नव्हती. पण शिष्टाचारासाठी  तरी तिला  विचारणं भाग होतं. महुआने  आतल्या खोलीत जाऊन तिचा  सलवार- कुरता आणला.
              - ही कुसुम  तरी काय  बाई आहे? आल्यापासून  एका अक्षराने  तिने महुआची , तिच्या  मुलाची  किंवा सुदेशची चौकशी केलेली  नव्हती. महुआचा  अल्सेशियन कुत्रा  कधीच  झोपला होता.  रामजीने  त्याला जेवण  दिलं की नाही ?  तो झोपेत कण्हल्यासारखा का करतो ?  एक  न दोन,  कितीतरी  छोटे  छोटे  प्रश्न  महुआच्या डोक्यात पिंगा घालत होते.
              कुसुम  मध्येच  बाथरूमला जाऊन आली.  पण महुआने    आणून  दिलेले कपडे  तिने  घातलेले  नव्हते. ती आता  आरामात  सोफ्यासमोरच्या  टेबलावर पाय ठेवून बसली  होती.
                या नोकरी करणा-या बायकांची नेहमीच भीती वाटते महुआला. विशेषतः  नव-याच्या  बरोबरीच्या  अधिकारातील बायकांची ! गप्पा मारायला आल्या तरी  ऑफिसातल्या  गप्पा करत बसतात.  पण कुसुमजितबद्दल  ऐकलेल्या  गॉसिप  मधल्या  कुणालाही   माहीत नसलेल्या गोष्टी कुसुमजित  स्वतःच सांगायला आली होती.   ही  संधी  महुआ थोडीच सोडणार ?  कुसुमजितने  आपली कथा  पुढे चालूच ठेवली.
          " नंतर  महिनाभरातच  त्यांनी मला  सुलतानगंज जिल्यात  कलेक्टर  म्हणून पोस्ट  केसं . मेनन दिल्लीतच होते आणि मला  लगेच  जाऊन  चार्ज घ्यायला सांगितला भाटियांनी!"
           "राज्यपालांशी  इतकं बोलायला  मिळत नाही महुआ! ते जे  त्या दिवशी  इतके  बोलले  ना, तो माझा पहिला  आणि शेवटचा आऊटबर्स्ट त्यांच्या  समोरचा ! भाटियांना पण मी  ते डिस्कशन  सांगू शकले नव्हते.  म्हणून  सुलतानगंजच्या  पोस्टिंबद्द्ल  पण त्यांना विचारता आलं नाही. मला हेही माहीत आहे की  अमर महतोला हे पोस्टिंग  अजिबात  आवडलं नव्हतं.  अजूनही   होम सेक्रेटरीकडे कुठेतरी त्यांची गोपनीय  नोट सापडेल की,  ' कुसुमजितची छुपी सहानुभूती जनवादी  मोर्च्याला आहे,  म्हणून  तिला कलेक्टरची  पोस्ट देऊ नये. ' अमर  महतो  सुलतानगंजला डि. आय्. जी. होते.''
          " पम सुलतानगंजला काय नेमकं झालं ?  मला वाटतं  तू तिथे तीन महिने पण टिकली नाहीस-" महुआने पुनः  एकदा  घडयाळाकडे  पाहिलं.  सुदेश आता यायला हवा. मघाशी आवरा आवर  करून  घरी जाण्यापूर्वी  रामजीने  क्लबमध्ये सुदेशला फोन लावून पाहिलं होतं, पण क्लब बंद झाला असावा.
                 " तेव्हा आणि   अजूनही  सुलतानगंजची पोस्टींग जिवंत  ज्वालामुखी  असलेल्या  डोंगरावर  पिकनिकला जाण्यासारखंच  आहे. तिथे जनवादी  मोर्च्याचा जोर  हळू हळू  वाढतच होता.  वेगवेगळ्या  गावांत ते लोकांना  संघटित  करू  शकले होते.  जिल्ह्यात सात आठ AK-47 रायफली  स्मगल होऊन  आल्याची  वंदता  होती. हरिपूर , गदलपूर  सारख्या  काही गावांमध्ये गावठी  बंदुका बनवण्याचा छुपा  उद्योग जोराने सुरू होता. मुख्य म्हणजे  या जिल्ह्यात  कित्येक मोठया  शेतजमिनी  अतिरिक्त  म्हणून  घोषित  झाल्या  होत्या.  पण कागदोपत्रीच!  काही मोठया जमीनदारांकडून  भूमिहीन शेतक-यांना  सीलींगचा कायदा  होण्याआधीच  सुगावा  लागून त्यांनी  चलाखीने  खोतेफोड  करून घेतली होती.  किंवा जमिनीचा  बेनामी  नावं  लावून स्वतःची  जमीन सिलींग मधून  वाचवली होती.  त्यांच्यावर  देखील  या भूमिहीन मजुरांचा रोख होता.
               "मुख्य म्हणजे तिथे वेठबिगार  व बॉन्डेड लेबर खूप होते.  मग सरकारी  आकडेवारी  काहीही म्हणो.  त्या लोकांना  मालकांविरूद्ध  संघटित करणं कठीणं होतं.  कारण मालकांनी  त्यांच्यावर  देखरेख  करण्यासाठीच  दादा मंडळीपण  ठेवली होती.  त्या दादांचा डोळा चूकवून  जनवादी मोर्चा काम करत होता.
              "सामान्य लोकांची   सहानूभूती निश्चित  जनवादी मोर्चाला होती.  ऑब्सेंटी लॅन्ड लॉर्ड , त्यांनी बाळगलेले दादा, त्यांच्या  दबावाखाली  वावरणारे बंधुआ शेतमजूर , इतर सरप्लस  जमीन   बळावलेले  पण ती  कसू न शकणारे शेतकरी, काही लहान शेतकरीस काही जनवादी मोर्चाचे  बाहेरील कार्येकर्ते... त्यात  पोलीसांची   घालमेल ... असे  जबरजस्त तणावाचे वातावरण  असायचे. सुदेशने कधी  कृषी खात्यात किंवा  कलेक्टर म्हणून काम केलेले नाही. म्हणून  तुला त्याचा खाचा  खोचा कळणार नाहीत,  कदाचित    जसेजसे कापणीचे  दिवस जवळ  येऊ लागले. अमर महतो. डि. आय. जी.  होते.  त्यांनी  बाराबणीवरून  जादा कुमक मागवली.
                " मी माझ्या  परीने  काम करत  होते.    रेशनधान्य , शिक्षण आणि  हॉस्पिटल यामधली  कार्यक्षमता  यावर मी  लक्ष केंद्रीत केलं होतं. सामान्य माणसाला  कमी त्रासाने अन्नधान्य  , रॉकेल  मिळावं, मुलं जास्तीत जास्त  संख्येने  शाळेत  येत रहावीत  आणि  लागेल ती मेडिकल हेल्प  चटकन मिळावी  असा प्रयत्न  मी करत  होते. म्हणजे मग खूपसे  शांतताप्रिय  लोक तक्रारी  किंवा  दंगा  करण्याकडे  वळत नाहीत. .कर्फ्यू किंवा फॅल्ग मोर्चा काढलाच  तर त्याचा काळ  कमीत  कमी  ठेवा   अशा सूचना मी पोलिसांना  दिल्या होत्या आणि  तरूण  मुले  हरवल्याची  तक्रार आली की, मी  त्याची वेगळी  यादी करून  या मुद्यावर  लक्षं द्यायचं  ठरवत  होते.  इन  फॅक्ट मी दिल्लीला मिस्टर चिमांना पण भेटून  आले होते.  तुला  माहीत नाही महुआ,  ही इज  सो प्रिन्सीपल्ड, की त्यांना अतिरेक्यांची थ्रेट असूनही   त्यांनी आता  रिटायरमेंट  नंतर पोलिस  सिक्युरिटी घेतली  नाही.  He says  that  he  wants an  attention-free quiet life ?''
            "आणि ते उत्तमच  काय  प्रकरण  होतं? "
            ते रामायण वेगळंच  घडलं . मी  मुख्यमंत्र्यांच्या  बैठकीसाठी  इकडे  आले  होते.  दुपारी मी एक  बातमी ऐकली की  अमर महतोने  एक  ताताडीची  प्रेस  कॉन्फरन्स  बोलावली होती. त्यामध्ये एका आंतरराज्य  गँगच्या  अतिरेक्यांचे धागेदोरे सापडल्याचा दावा केला होता.
                 " त्यांनी एका तरूण अतिरेक्याला पकडलं  होतं  व त्यांने हळू हळू बोलायला सुरवात केली होती. मला आश्चर्य वाटलं कालपर्यंत असा  एकही  रिपोर्ट नव्हता. आज  अचानक  ही आंतरराज्य गँग कुठून  उपटली?
               "मी ऑफिसला फोन करून  पी. ए. ला  विचारलं  .त्याने जे  सांगितल ते भलतंच  काहीतरी  होतं.  माझ्या  एसडीमला अमर  महतोकडून  फोन आला होता.  त्या तरूणाला सर्किट हाऊस मध्ये  ठेवलं होतं, पोलिस कस्टडीत नाही. सर्किट हाऊसमध्ये पोलिस अधिकारी आले होते.  अचानकपणे  फायरिंग  वगैरे  ऑर्डर काढाव्या लागल्या किंवा मॅजिस्ट्रे
पुढे जबाब नोंदवावा  लागला तर  आयत्या वेळी  खोळंबा नको म्हणून  एसडीएमने  रात्री नऊ नंतर  सर्किट हाऊसवरच थांबावं असा  निरोप होता. 
           " पण मोर्चा काढण्याची  कुणाची  नोटीसदेखील नव्हती, मग फायरिंग ऑर्डर कशाला लागणार होती.? तरीही  रात्री  एखादी   ऑर्डर करावी  लागली  तर कदाचित गंभीर प्रकरण  होऊ शकेल म्हणून एसडीएमने माझ्या पी. ए. ला फोन केला होता.
                 " मी लगेच सुलतानगंजला रवाना झाले. माझं डिनर करायला  सर्किट हाऊसवरच  सांगितलं. म्हणजे तेव्हाच  मला पोलिसांबरोबर रिव्ह्यू घेता अला असता. पण शहरात मी  वायरलेसच्या रेंज मध्ये  आल्याबरोबर पहिला कंट्रोलकडून, की  मी  सर्किट हाऊस वर जाऊ नये.
                " मी त्यांना बरं म्हटलं  खरं,  पण मला शंका वाटू लागली. मी थेट  सर्किट हाऊसकडेच  गेले. स्वीट  नंबर  एकच्या बाहेरच एका इन्सपेक्टरनने मला अडवायचा प्रयत्न केला.
              'मॅडम डी. आय. जी. साहेब आत बसलेत, पार्टी चाललीय, आपण आत जाऊ  नये.'
             " पण मी त्याला बाजूला  केले आणि  धाडकन दार  लोटून  आत गेले. तिथे जे पाहिलं...."
            " काय पाहिलंस?" महुआला आता  तिच्या गोष्टीत रस वाटू  लागला. होता.
             " तू विचारलंस ना मी शाकाहारी  का झाले? तिथे जे  पाहिलं त्यामुळेच. ते दृश्य  मी जन्मात विसरू  शकणार नाही. अजूनही  आठवलं  की माझ्या पोटात ढवळंत. एक तरूण मुलगा उलटा पालटा होऊन पडला होता. हाडकुळा, गौरवर्ण, छोटीशी दाढी, धुळीने भरलेले केस, निळी जिन्स आणि जागोजागी फाटलेला हिरवा  शर्ट.  त्याचे दोन्ही हात पाठीशी बांधलेले होते. पायपण बांधले होते.  नाका तोंडातून रक्त  वाहिलेलं होतं.  मी आत शिरले तेव्हाच अमर महतोने त्याच्या पाठीत लाथ घातली आणि तो कळवळला.
             " मी न राहवून ओरडले -'बंद करा हे सगळं!'
             माझा लोकल एस. पी केशवनाथ तिथेच  होता- आणि एक बाराबणीचा एस. पी.
            " केशवने मला बाहेर घेऊन  जाण्याचा प्रयत्न  केला. 'मॅडम प्लीज, तुम्हाला पाहवणार  नाही.'
           'मी रागाने लाल झाले होते.
            सर्किट हाउसमध्ये अशा गोष्टी? हा एवढाचा पोरगा...? ...माझ्या डोळ्यांसमोर हरवलेल्या  तरूणांची  यादी  चमकून गेली.
                "  अमर महतो झोकांडया देत  पुढे आले. ' कओ पोरगा?  तो भयानक अतिरेकि आहे. त्याच्या बॅगेत आम्हाला अत्याधिनिक हत्यार सापडली."
               "कोणती हत्यारं? दाखवा मला! '
               "अभावितपण  अमर महतोची नजर कोप-यातल्या  शबनम बॅगेकडे गेली.  मी  चपळाईने कोप-यात झडप घालून  शबनम  बॅग  उचलली.  तर त्यात  काय होतं?  एक भूमितीचे  धडे शिकवायचं गाईड, एक रेल्वे टाइमटेबल, एक पथनाट्यचं पुस्तक, दोन कपडे, एक  टॉवेल!
            " ही हत्यारं?  हा खोटेपणा? आधी सर्वांनी  निघा इथून बाहेर!" 
               "मॅडम, मला तुमच्याविरूद्ध सरकारला रिपोर्ट पाठवावा लागेल.  तुम्ही शासनाच्या  कामात  अडथळा आणत  आहात. मी  या  अतिरेक्याला पोलिस स्टेशनला घेऊन  जातोय.  "
                 अमर महतो दाणदाण पावले आपटत कॉन्सटेबलवर ओरडले-
                  ' चला त्याला घेऊन:"
               'नाही! त्याला कुठेही  हलवायचं नाही. उद्या त्याला मॅजिस्ट्रेटसमोर हजर करीपर्यंत तो  इथेच राहिल आणि मी पण "
           " केशव पुनः म्हणाला-
             "मॅडम, एवढं इमोशनल होऊ नका, हे  प्रकरण नीट  हाताळलं नाही तर आपल्या सर्वांची  नोकरी जाईल."
                 " याच केशवबरोबर मी कितीतरी टुरिंग केलं होतं.- त्याच्या बायकोने पाठवलेला डबा  शेअर केला होता.
                 " खड्यात गेली तुमची नोकरी !"
           "एव्हाना माझा एडीएम आणि पर्सनल बॉडीगार्ड पण आत   आले होते. तेवढयात बाराबणीहून आलेला अधिकारी म्हणाला-
         "मॅडम, आम्हाला त्याची  झडती तर घ्यावीच  लागेल. त्याला आत बाथरूममध्येच नेतो.'
            " नाही काय तपासणी करायची  ती इथेच करा. माझ्यासमोर."
             "आम्हाला त्याचे  सर्व  कपडे  काढावे लागतील."
             'मला  चालेल.'
           "मग मात्र सर्व पोलिस तिथून निघून गेले. अमर महतो तडक बाराबणीला रवाना झाले.
           - मुख्यमंत्र्यांना भेटायला! मात्र जाताना मला इशारा  देऊन  गेले-
              ' त्याला विचारा तो इथे काय करत   होता!"
              ' छान, पुढे तुम्ही विचाराल, मी इथे काय  करत होते! मला स्वतंत्र  देशाचा  नागरिक आहे आणि  त्याला  सुलतानगंजला येण्याची बंदी नाही."
            " ते गेल्यावर मी उत्तम चौकशी केली . त्याचं नाव मला  तेव्हाच  कळलं . तो भूगोलाचा  दुस-या वर्षाचा विद्यार्थी होता. आणि  शेजारच्या  प्रांताचा होता. फम त्याचा  भाऊ  आणि वहिनी  बख्तियारपूरला नामांकित डॉक्टर होते.  हा जनवादी  कार्यकर्त्यांमध्ये  पथनाटया बसवून  घ्यायला आला होता. 
                  " मी त्याच्या  घरच्यांना  खबर देऊन  उत्तमसाठी प्रायव्हेट डॉक्टर बोलावून  घेतला. त्याला दुस-या दिवशी  सकाळीच कोर्टापुढे उभं  केलं!  माझ्यासमोर तरी   दुसरा काय  उपाय होता?  पत्रकारांनी मला गराडा घातला. त्यांना  उत्तरे देताना मी मानवी हक्कांबद्दल बोलले. पण काही अधिका-यांच्या   भाषेत मानवी  हक्कांबाबत बोलणे  म्हणजे अतिरोक्यांची बाजू घेणे असा  अर्थ होतो.
             मी त्याच्या  राज्यातल्या पोलिसांकडे  विचारणा केली. उत्तरादाखल  दुस-या दिवशी संध्याकाळी त्यांचा फॅक्स पण  आला  की  त्याच्यावर  तिकडे  कोणतीही केस दाखल नव्हती.  मग हा  आंतरराज्य अतिरेक्यांच्या  गँगमधला  कसा म्हणायचा?
             "  पण  हे फारसं मी काही  करायच्या  आधीच  रामअवतार सिंगनी सूत्र हातात घेतली  त्यांनी मला बोलीवून  घेतलं.
              " त्याला नॅशनल  सिक्यूरिटी  ऑक्ट (NSA) लावून  टाक.'
                            "पण सर, त्याच्याविरूद्ध काहीही रिपोर्ट नाही. त्याच्या  राज्यातले पोलिस म्हणतात की  कॉलेजात त्याचे  रेप्युटेशन  एक सज्जन मुलगा  म्हणून  आहे.'
              'तुला काय  सिद्ध करायचे आहे ?  अमर महतोने प्रेस  कॉन्सफन्समध्ये आंतरराज्य  टोळीचा उल्लेख केला आहे. त्याला तोंडघशी पाडायचे का?  तू काहीही करण्यापूर्वी माझ्याशी  का नाही  बोललीस?"
                "अमर महतोने प्रेस कान्फरन्स  घेतली तेव्हा मला विचारलं  होतं?  किंवा  तुम्हाला? आणि  आज उत्तमला NSA लावायला सांगण्यापूर्वी  तरी तुम्ही माझं मत विचारलं का? '
             ' तुझ्याकडून  अशा  जातीयवादी संकुचित दृष्टिकोनाची अपेक्षा  नव्हती. निव्वळ तो तुझ्या जातीचा  आहे म्हणून  तू त्याला वाचवू  पाहतेस!" 
            " मी आभाळातून   खाली पडले!
                 ' सर, तुम्हाला असं  म्हणायचं आहे का,  की तो माझ्या जातीचा आहे म्हणून  मी त्याला आगीत   ढकलावं?  तो भूमिहार असता तर तुम्ही तसं केलं असतं का? "
               ' शट अप, तू  तूझ्या डिव्हिजन कमिशनर बरोबर  बोलते आहेस.  तुझी बदली अगदी या  क्षणीसुद्धा  होऊ  शकते. तू  सरकारी मर्जी आहे तोवरच  डिक्ट्रिक्ट
                                                      चक्रव्यूह
        "ते मला पूर्ण  माहित आहे. पण सर , एखाद्या कुत्र्याला गोळी घालण्यापूर्वी तो वेडा आहे असं  उठवतात. उत्तमबाबात  तुम्ही  त्च चालवलय . त्यात मी  सामिल  होणार नाही, मी  सरकारच्या  मर्जीने  डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट असेन,  पण जोपर्यंत  त्या पदावर आहे तोपर्यंत  मानवी  हक्कांच्या  रक्षणाची  माझी  जबाबदारी विसरणार  नाही.  तुम्ही  कुसुमजित या अधिका-याची  बदली  करू शकाल. पण कुसुमजित या व्यक्तीला वाकवू  शकत नाही.'
             " मी त्यांच्या बंगल्यातून निघून  तडक सुलतानगंजला जायला निघाले . निघताना  त्यांच्या प्रशस्त  आवारातील हिरवळीचा स्पर्श आणि  बकुळफुलांचा सडा माझी वाकुल्या  दाखवून  चेष्टाच करत होते जणू!  इतक्या प्रशस्त आवारात एवढं कोतं मन राहू शकतं?
            " दुस-याच दिवशी माझ्या बदलीचे आदेश आले.मी  ऑडिशनल कलेक्टरकडे चार्ज द्यायचा होता.  पेपरास सर्वत्र चर्चा होती . जिल्यात सुव्यवस्था किती  धोक्यात  होती, किती  जमीनदारांना पोलिस  प्रोटेक्शन द्यावं  लागतं होतं. .... सुव्यवस्था की मानवी हक्क?   असे मथळे होते.
                " उत्तम सरकारी दवाखान्यात होता. त्याचे  ऑपरेशन उरकून  आणि बेल मिळवून  मगच त्याचा भाऊ  त्याला नेऊ  शकणार होता.  मी  त्याला पहायला दवाखान्यातच जात असे . तिथली अस्वच्छता, अकार्यक्षमता आणि त्यावरच अबलंबून असलेलं त्यांच जीवन! तिथे तर कुठे मानवी हक्क जपण्याची गॅरंटी होती?
          " सर्किट हाऊस वर त्याच्या पथनाट्यच्या वहित एक कविता होती- हीर आणि रांझाची;
                           हीर आणि रांझा, उठा
                           आजचे दिवस वणव्याचे आहेत
                          प्रेमासाठी  आकाशीचा चंद्र नको
                           तो थंडगार पडला आहे
                          पण जीवनाला चहूबाजूने ज्वालांनी घेरलयं
                          लाल पिवळ्या ज्वाळा...
                          त्यांत चंद्राचे अश्रूसुद्धा जळून काळे ठिक्कर पडतील !
                        
           " त्यानंतर मी  मंत्रालयात हजर झाले खरी. पण माझं मन था-यावर  नसे. मला भयंकर  डिप्रेशन आले.  सगळ्यांना माझी गंमत पहाण्यात मजा येत होती.  मला विचारीत, काय झालं,  पण त्यातली सहानुभूती कोरडीच  असायची.
             "शेवटी फक्त दलबीर, माझा धाकटा भाऊ  आला आधार द्यायला. माझा रजेचा अर्ज  पोचवण्यापासून तो सामान बांधणं , दिल्ली डेप्युटेशनचे कागद पाठवणं, सगळी धावाधाव त्यांनच केली  . आई  वडील तिथेच होते. मग मात्र त्याला बर्कलेला  परतावं लागलं.
            " घरी माझी आई बरी नव्हती. तिला सारखा दम्याचा  त्रास  व्हायचा. दोघं म्हतारी होत होती.  त्यांचा एकत्र  घोशा होता की मी लग्न  करावं मला काही  सुचत नव्हतं. मला जातीयवाद ठरवून  रामअवतार सिंगना काय  मिळालं  होतं?   आणि आता माझं व्यक्तिगत  स्वातंत्र्य हिरावून  आई  वडिलांना काय मिळणार होतं?
            " शेवटी भांडण झालं. वडील म्हणाले. तू, लग्न केलंच पाहिजे, मग वाटलं तर घटस्फोट घे,

             "मला मार्ग सुचला मी लग्नाला हो म्हणून टाकलं."
           " केलसं तू लग्न? कुणाशी केलेस?"
           महुआला प्रश्न आवरला नाही. कुसुमजितच रहस्य आज उघडणार होतं.
               " नाही .तुला नाव नाही सांगणार तू ऐकलेलं पण नाहीस. मला मॅच म्हणून योग्यच  होता- पैसेवाला, रूबाबदार कविता पण वाचतो  माझ्या विम्याचे आणि प्रॉव्हिडंट फंडाचे   नॉमिनी कोण असं लग्नाच्या  पहिल्या दिवशीच विचारत होता. ! त्याला पाहतानांच मला वाटलं हे बरं  आहे, याच्याशी आपलं लग्न  चार  महिन्यांवर   टिकणार नाही. प्रेताला सजवावं तसं  मी स्वतःला सजवत  होते.  आणि मनाशी  म्हणत  होते. बस चार महिने नंतर नाही.
             " तेच झालं खरं म्हटलं तर मला या लग्नाची जरूर नव्हतीच  मला स्वतःला वेळ   हवा होता. पण माझे आई-वडील, कलिग ऑफिसर्स, नवरा कोणी तो मिळू द्यायला तयार नव्हते.  पण जेव्हा मी सावरले तेव्हा मात्र लगेच  घटस्फोट घेऊन  टाकला. सुदैवाने  नव-याने  त्या बाबतीत खळबळ केली नाही. करू   शकला  नसता हेही त्याला कळलेलं असावं.
               " बस? " महुआचा विरस झाला होता. यात तर काहीच मसाला नाही-
                  घडयाळाने एकचा टोळा वाजवला. आता  या वेळी  कुठे  शोधायचं सुदेशला?  महुआकडे पोलिस स्टेशन  किंवा हॉस्पिटलचे नंबर पण  नाहीत.  तरी पण कुठेतरी सुदेशला शोधायची सुरवात करायलाच पाहिजे.
              कुसुमजित नुकच्याच  उगवलेल्या  पिवळसर तुटक्या  चंद्राकडे पहात म्हटले-
              " महुआ, मी  दमून  गेलेय... दोन प्रश्नांचा शोध घेता घेता... गेली दहा वर्ष मी उत्तर शोधण्यात  घालवली.
             दहा वर्षापूर्वी नोकरीत  लागताना मला  जातीयवादी लोकांची  चीड यायची. आय येत नाही. वाटतं.  त्यांचंच बरोबर असावं.  माझ्याआत्मविश्वासाला जणू उंदीर कुरतडत आहेत. माझा घर्म , माझी  जात यावरून  या  लोकांनी इतकं भांडवल कसं केलं मी  जाती व   धर्म याच्यापासून  अलिप्त होते.  पण मला ,सारखी  सारखी माझ्या  जातीची  जाणीन देऊन  यांनी मला असं कोंडीत  पकडलयं की वाटतं, मी मानवी हक्कांबद्दल बोलते  म्हणून जर जातीयवादी ठरले असेन तर  पुढचा पर्याय काय? मानवी हक्कांबद्दल बोलणं की जातीयवादाचा शिक्का स्वीकार करणं?

                     चक्रव्यूह
         आणि या दहा वर्षात  मी हे पण पाहिलयं की एखाद्या बाईच्या  खाजगी  आयुष्यात  डोकावून  बघायला, तिचं  व्यक्तिस्वातंत्र्य  हिरावून  घ्यायला पुरूष  मंडळी  किती उत्सुक असतात.  तिने एखाद्या माणसाचा  आधार घेणार  नाही म्हटलं  तर सर्वांना - अगदी  घटस्फोटित नव-यापासून  ते तिच्या  शरीराची हाव धरणा-या बॉयफ्रेंडपर्यंत सगळ्यांना - वाटतं की ही कुणी  विचित्र बाई  आहे का.  हिने एकटं रहावं? नक्की  ही मेंटल केस असणार!"
           महुआ सुदेशच्या येण्याने वैतागून गेली होती.  आवंढा  गिळत  ती म्हणाली, " नक्कीच आहेस तू मेंटल केस . आल्यापासून  पहात्येय- स्वतःचीच बडबड चालवली आहेस. एक वाजला तरी सुदेश  आला नाही, पण तुला  त्याचे काहीच नाही !"
                             "ओ ,महुआ" कुसुमच्या  आवाजात  खरोखर सहानुभूती होती. " काळजी करू नकोस. तो हॉटेल सबेरा मध्ये आहे- रूम  नं.२०२. सकाळ  झाली की येईल. सांगते मला कसं माहीत ते. माझी इथे ऑफिसची  मिटींग  निघाली  आणि परवा  सुदेशचा फोन आला-  माझ्या दिल्लीच्या ऑफिसात म्हणाला,
           ' महुआ दोन दिवस  तिच्या आईकडे जाणार  आहे- आपण एक  रात्र एकत्र  घालवू  या '
           माझ्या घटस्फोटाबद्दल त्याला वाईट वाटतं, पण आता मी स्वच्छंद पक्षी आहे-  असं तो  म्हणाला  मला कसला बंध नाही.  अधूनमधून  तो जेव्हा तुला चुकवू  शकेल तेव्हा  आम्ही मजेत  रात्र घालवायची - एवढा अधिकार  तो दोस्त म्हणून  गाजवू  पहात  होता.
                  ".... तुला  त्याने सांगितल ता महुआ, नऊ  वर्षावूर्वी याच सुदेशला मी एका रेल्वे क्मपार्टमेंटच्या  एकांतवासात  मी लग्नाचं प्रपोजल दिलं होतं.?  तेव्हा सुदेशने  माझा चेहरा  त्याच्या मांडीवरून  अलगद  बाजूला सारला  होता.
             'नाही कुसुममजित, आपल्या दोघांच्या  जाती वेगळ्या आहेत.  माझ्या घरात  मला वादळ उठवायचं नाहीये.'
             "नंतरमहिन्यातच तुमच लग्न झालं. पण आज तुझ्यापासून  लपवून  माझ्याबरोबर  रात्र  घालवण्यात  त्याला गैर वाटत नाही! माझी जात वेगळी  असून  सुद्धा! पण मला सांग, तू आईकडे का गेली नाहीस?"
           महुआ थरथरत होती . कसंबसं  म्हणाली
          - " मला सुदेशला सरप्राईज द्यायचं होतं.  पण मी खरंच  आईकडे गेले असते तर..."
           " मी  आधी तिथेच फोन केला होता. काही तरी निमित्त काढून तुला इथे बोलवायला! पण तू  इथेच थांबलीस  असं तुझे   वडील म्हणाले. आणि आज  नाही तर कधी  तरी तुला हे सर्व  सांगावच  लागणार होतं  मला.... निघते आता  मी महुआ."
         कुसुमजितने उभं राहून  खिडकिबाहेर बघितलं अंगणात गडद काळोख  दाटून  आला होता.  तिच्या मनासारखच! पण कधी  तरी त्यातूनच  सकाळ  उजाडणार  होणार होती.
 --------------------------------------------------------------------------        लीना मेहंदळे    


                                     





































       














































 













  














             















 














       














      




















   
              














                                         













               
















                          





















  














  













   














           
  















                                      














    











  












            














     













 

                 

कोई टिप्पणी नहीं: