रविवार, 14 मई 2017

यक्षप्रश्न -- Sakal

सकाळ- सप्तरंगपुरवणीसाठी
काय वाचताहेत मान्यवर-
 लीना मेहंदळे.
असं म्हणतात की, लहानपणी आपण जे वाचतो, ऐकतो नि पाहतो ते आपल्या स्मतृतीचित्रांमध्ये स्कॅन केल्यासारखं राहतं. किंबहुना लहानपणापासून आपण एखाद्या गोष्टीसंबंधी विचार करत असतो आणि त्यासंबंधी कुठं काही वाचायला मिळतंय का, तेही चाचपडतो. माझंही काहीसं तसंच झालं. माझे वडिल संस्कृतचे प्राध्यापक होते. त्यांच्या पुस्तकाच्या संग्रहातून मी महाभारताचं पुस्तक काढून वाचलं होतं.... या वाचनात ‘यक्षप्रश्ना’चा भाग माझ्या मनात ठाण मांडून बसला होता... याविषयासंबंधीचे विचार मनात घोळत होतेच. याच संदर्भातलं एक पुस्तक हाती लागलं ते म्हणजे- आचार्य निशांत केतूलिखित ‘सनातन यक्षप्रश्न’. हिंदी भाषेतल्या या पुस्तकात महाभारतातल्या यक्षाच्या गोष्टीचा संदर्भ आहे.
द्युतात राज्य हरून पांडव वनवासी होतात. एक दिवस त्यांच्याकडं एक ऋषि येतात. ‘यज्ञाच्या तयारीत एक हरीण वारंवार येऊन अडथळा आणतंय. त्या हरीणाचा बंदोबस्त करा,’ अशी विनंती ऋषिवर्य करतात. हरीणाचा पाठलाग करता करता या पाच भावंडांना तहान लागते. पाण्याच्या शोधार्थ सहदेवास पाठवलं जातं. तो येत नाही म्हणून पाठोपाठ नकुल, अर्जुन, भीमास पाठवलं जातं. अखेरीस युधिष्ठिरच त्यांचा शोध घेत घेत एका तळ्याकाठी येऊन ठेपतो. तिथं हे चारहीजण मृतप्राय अवस्थेत पडलेले दिसतात. त्यांचा विचार करता करता तो तळ्यापाशी पाणी प्यायला जातो. तेवढ्यात यक्षाचा आवाज येतो की,‘ माझ्या प्रश्नांची योग्य उत्तरं दिल्याखेरीज पाणी पिता येणार नाही. तसं केलंस तर तुझ्या भावांसारखीच तुझी स्थिती होईल.’ हे ऐकल्यावर युधिष्ठिर नम्रपणे म्हणाला की, मी तुमच्या प्रश्नांना माझ्या ज्ञानानुसार जमतील तशी उत्तरं देण्याचा प्रयत्न करेन.’
यक्षाने युधिष्ठिराला विचारलेल्या एकेका प्रश्नात २-३ उपप्रश्नांचा समावेश होता. असे एकूण ३४ मुख्य प्रश्न विचारण्यात आले. प्रश्नांची समर्पक उत्तरं मिळाल्याने यक्ष प्रसन्न झाला. ‘शेवटच्या प्रश्नाचं उत्तर व्यवस्थित दिलंस तर पाणी प्यायला देईन, असं तो म्हणाला. या शेवटच्या प्रश्नातही काही उपप्रश्न होतेच. माणसानं जावी अशी चांगली वाट कोणती? यावर ज्या रस्त्याने पूर्वीची आदर्श माणसं गेली ती वाट चोखाळावी, असं उत्तर युधिष्ठिराने दिलं. पुढचा प्रश्न होता- जगातलं सगळ्यात मोठं आश्चर्य काय? याचं उत्तर होतं की एक दिवस आपण मरणार, हे माहीत असूनही माणसाचा मोह सुटत नाही. यावर यक्ष खुश झाला आणि पाणी प्यायची परवानगी देऊन चारपैकी एका भावाला जिवंत करण्याचा वरही त्यानं दिला. तेव्हा युधिष्ठिराने माद्रीपुत्र म्हणून नकुलाला जिवंत करण्यास सांगितलं. याही बाबीवर संतुष्ट होऊन चारही भावांना जिवंत केलं. आपली न्यायबुद्धी जागृत असेल तर त्याचं फळ लगेच मिळतं, हेच यातून दिसतं. या गोष्टीतून युधिष्ठिराचे न्यायप्रियता, सत्यवादी असे गुण सामोरे येतात. महाभारतातला हा टॉपटेन प्रसंगांपैकीचा एक प्रसंग म्हणावा लागेल.
वाचायला सोपं नि सहज असणाऱ्या या पुस्तकात शब्दांचे अर्थ आणि मीमांसाही करण्यात आलेली आहे. या पुस्तकाची चांगली २-३ वेळा पारायणं करायचेत... तरच त्यातल्या गहन अर्थाचा कण तरी हाताशी गवसेल.
शब्दांकन- राधिका कुंटे. 


कोई टिप्पणी नहीं: